एसएससी लोटली अंतिम फेरीत

0
113

एसएससी लोटली संघाने राय स्पोर्टिंग क्लबचा टायब्रेकवर २-१ अशा गोलफरकाने पराभव करीत फोंडा फुटबॉलर्स आयोजित ३१व्या सेंट ऍनीस फेस्टिव्हल आंतरग्राम फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

कुर्टी फोंडा येथील ऍनिमल हस्बंडरी मैदानावर खेळविण्यात आलेला हा सामना पूर्ण वेळेत गोलशून्य बरोबरीत संपला होता. या सामन्याच्या प्रारंभीच राय स्पोर्टिंग क्लबने एक धोकादायक चाल रचली होती. परंतु एल्डनकडून मिळालेल्या अचूक पासवर ऑयलेकनसने घेतलेला जोरकस फटका थोडक्यात गोलपोस्टवरून गेला. तर एसएससी लोटलीच्या मार्कने केलेल्या प्रयत्नातील चेंडू रायच्या गोलरक्षकाने पंच करून बाहेर टाकला. रायने आणखी एक गोल करण्याची सुवर्णसंधी गमावली. यावेळी रायच्या लॉयडने बचावफळीला भेदत चेंडू विल्फ्रेडकडे पास केला होता. परंतु विल्फे्रडने घेतलेला फटका एसएससी लोटलीच्या गोलरक्षकाने सुरेखपणे थोपवित संघावरील संकट टाळले.

टायब्रेकवर विजयी ठरलेल्या एसएससी लोटलीकडून प्रिस्को आणि मार्क यांनी गोल नोंदविले. तर राय स्पोर्टिंगचा एकमेव गोल सॉकीने नोंदविला.
एसएससी लोटलीचा गोलरक्षक मेबेन फर्नांडिसची स्पार्क सामनावीर पुरस्कारासाठी निवड झाली. त्याला माजी फुटबॉलपटू मार्टिन पिरीस यांच्याहस्ते सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला.