अफगाण संघाचे राशिदकडे नेतृत्व

0
136

लेगस्पिनर राशिद खान याच्याकडे अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. विश्‍वचषक स्पर्धेत गुलबदिन नैब याच्या नेतृत्वाखाली संघाला सर्व सामने गमवावे लागल्यानंतर त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले आहे. विश्‍वचषकापूर्वी कर्णधारपदाहून हटविण्यात आलेला असगर अफगाण संघाचा नवीन उपकर्णधार असेल.

अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने विश्‍वचषक स्पर्धेपूर्वी मोठे फेरबदल करताना असगर अफगाण याचे कर्णधारपद काढून नैबकडे वनडे संघाचे नेतृत्व सोपविले होते. तसेच राशिद खान (टी-ट्वेंटी) व रहमत शाह (कसोटी) यांनादेखील कर्णधार नेमले होते.
अष्टपैलू नैब याने फलंदाजीत २१.५५च्या सरासरीने केवळ १९४ धावा केल्या होत्या तसेच गोलंदाजीत ४६.६६ अशा महागड्या सरासरीसह व ६.३९च्या इकॉनॉमीने ९ बळी घेत टुकार प्रदर्शन केले होते. कर्णधारपदाचा फारसा अनुभव गाठीशी नसल्याची किंमत त्याला मोजावी लागली. सामन्या दरम्यान निर्णय घेताना तो असगर अफगाण याच्याशी सल्लामसलत करत असल्याचे वारंवार दिसून आले. नैबपूर्वी कर्णधार असलेल्या अफगाण याच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्ताने वनडे क्रिकेटमध्ये ३१ विजयाची नोंद केली आहे.

टी-ट्वेंटीमध्ये ४६ पैकी ३७ लढतीत अफगाणिस्तानने विजय मिळविला आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली अफगाणिस्तानने आयर्लंडला नमवून आपला पहिलावहिला कसोटी विजय नोंदविला होता. २००९ सालापासून तो संघाचा अविभाज्य घटक असून वनडेमध्ये २०१३ व टी-ट्वेंटीत १०५६ धावा त्याने केल्या आहेत. बांगलादेशविरुद्ध सप्टेंबर महिन्यात होणारा एकमेव कसोटी सामना राशिदच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानचा पहिलाच असेल. यानंतर बांगलादेश व झिंबाब्वेचा समावे असलेली तिरंगी मालिका, वेस्ट इंडीजविरुद्ध भारतात होणारी तीन टी-ट्वेंटी सामने, तीन वनडे व एक कसोटी सामन्याची मालिका राशिदच्याच नेतृत्वाखाली होणार आहे.