![Private bus falls into a gorge](https://navprabha.com/wp-content/uploads/2019/06/20bus.jpg)
हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यात बंजार भागात काल एका खासगी प्रवासी बसला झालेल्या भीषण अपघातात २५ जण मृत्यूमुखी पडले असून ३५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. कुल्लूच्या पोलीस अधीक्षक शालिनी अग्निहोत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार ५०० फूट खोली दरीत कोसळून ही दुर्घटना झाली आहे.
सदर बस बंजर येथून गदगुशानी येथे जात होती. कुल्लू जिल्ह्याच्या बंजारजवळ हा अपघात झाला. बसमध्ये ७० प्रवासी होते. अग्निहोत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार ३५ जखमी प्रवाशांना नजीकच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
दुर्दैवी बसमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात होते. सदर विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून परतत होते. दुर्घटनाग्रस्त बसमधील बहुतेक प्रवासी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या मतदारसंघातील असल्याचे सांगण्यात आले.
दुर्घटनास्थळावर मदतकार्यात प्रशासकीय यंत्रणेबरोबरच स्थानिक लोकही गुंतले आहेत. संध्याकाळी उशिरापर्यंत १८ महिला, ७ लहान मुले व १० युवकांना वर काढण्यात आले आहे.
पिकअप कालव्यात पडून
उत्तर प्रदेशात ७ बुडाले
उत्तर प्रदेशच्या लखनौनजीक काल दुपारी ३ वाजता एक पिकअप व्हॅन नाल्यात कोसळून झालेल्या दुर्घटनेत ७ मुले पाण्यात बेपत्ता झाली असून त्यापैकी तिघांचे मृतदेह वर काढण्यात आले आहेत. विवाह समारंभ आटोपून सदर वाहनाने २९ जण घरी परतत असताना ही दुर्घटना घडली. २२ जणांना सुखरूप वाचविण्यात यश आले. वाहून गेलेल्या ७ मुलांचा शोध घेण्यासाठी पाणबुड्यांचे सहाय्य घेण्यात आले, अशी माहिती जिल्हा दंडाधिकारी कौशल राज शर्मा यांनी दिली.