![First session of 17th Lok Sabha](https://navprabha.com/wp-content/uploads/2019/06/19om-birla.jpg)
भाजपचे खासदार तथा एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला यांची काल लोकसभेच्या सभापतीपदी एकमताने निवड करण्यात आली. या पदासाठी कोणत्याही विरोधी पक्षाने उमेदवार उभा केला नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या उमेदवारीचा ठराव सभागृहात मांडल्यानंतर तो आवाजी मतदानाने संमत झाला. हंगामी सभापती वीरेंद्र कुमार यांनी बिर्ला यांची निवड झाल्याची घोषणा केली. पंतप्रधान मोदी यांच्यासह विरोधी नेत्यांनीही यावेळी बिर्ला यांना सभागृहाचे सुरळीत कामकाज होण्यासाठी पूर्ण पाठिंबा व्यक्त केला.
कॉंग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी, द्रमुकचे टी. आर. बालू, तृणमूल कॉंग्रेसचे सुदिप बंडोपाध्याय यांनीही बिर्ला यांना पूर्ण पाठिंबा व्यक्त करताना निष्पक्षपणे सभागृहाचे कामकाज चालविण्याचे आवाहन केले. ५६ वर्षीय बिर्ला पंतप्रधान मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्ती मानले जातात.
बिर्ला यांना पाठिंबा देणारे १३ ठराव पटलावर होते. विरोधी कॉंग्रेसने वेळ संपल्यानंतर म्हणजे दु. १२ नंतर पाठिंब्याचा ठराव सादर केला. तरीही हंगामी सभापतींनी विशेष बाब म्हणून तो ठराव स्वीकारला.
नव्या सभापतींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आसनापर्यंत नेले. यावेळी भाजपबरोबरच कॉंग्रेस, द्रमुक, तृणमूल, कॉंग्रेस या विरोधी पक्षांचेही अनेक नेते त्यांच्यासोबत होते. त्यानंतर सत्ताधारी तसेच विरोधी नेत्यांनीही बिर्ला यांचे अभिनंदन करणारी भाषणे केली. त्या सर्वांना उत्तर देताना बिर्ला यांनी आपण निष्पक्षपणे सभागृहाचे कामकाज चालवणार असल्याचे सांगितले.