गेल्या २७ फेब्रुवारी रोजीच्या हवाई चकमकी दरम्यान आपले एफ-१६ विमान पाडले गेले नाही असा दावा करणार्या पाकिस्तानला काल भारतीय हवाई दलाने त्यासंदर्भातील पुरावे सादर करून उघडे पाडले. भारतीय हवाई दलाचे एअर व्हाईस मार्शल आर. जी. कपूर यांनी काल प्रसारमाध्यमांसमोर या प्रकरणीची तपशीलवार माहिती पुराव्यांसह मांडली.
पाकचे एफ-१६ विमान भारतीय हवाई दलाच्या मिग-२१ बायसन या विमानानेच या चकमकींवेळी पाडल्याचे या पुराव्यांद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
२७ फेब्रुवारीच्या हवाई चकमकींवेळी दोन विमाने कोसळली. त्यामध्ये एक होते भारतीय हवाई दलाचे मिग-२१ बायसन आणि दुसरे होते पाक हवाई दलाचे एफ-१६ हे विमान. कपूर यांनी पत्रकारांसमोर पुरावे सादर करताना २७ रोजीच्या हवाई चकमकीतील रडार छायाचित्रेही जाहीर केली. मात्र सुरक्षितता व गोपनीयतेच्या कारणास्तव आणखी माहिती देण्याचे आपण आतापर्यंत टाळले असल्याचे कपूर यांनी सांगितले.