Home बातम्या पावसाच्या बासरीचे सूर…

पावसाच्या बासरीचे सूर…

0

– डॉ. सोमनाथ कोमरपंत

बालपणापासून पाऊस मला अत्यंत आवडतो. आजही तो मला तितकाच भावतो. पाऊस नित्यनूतन आहे. पाऊस नवोन्मेषशाली आहे. पाऊस अचेतनाला सचेतनत्व देणारा आहे. पावसाने ‘सा’ लावताच अंतर्मनात अनामिक धून उठते. भावतंद्रीकडे नेणारी ती अनोखी अनुभूती. जलतत्त्वाचे हे मनोहारी रूप न्याहाळताना भान हरपून जाते. वैशाखवणव्याने म्लान झालेली सृष्टी पहिल्या पावसाने सुस्नात होताच क्षणार्धात कात टाकते. नवी कांती धारण करते… पहिल्या पावसाची सर… त्याच्या स्पर्शाने अंगांगावर पसरलेली आनंदाची लहर…. मातीच्या गंधाच्या उन्मादाने उमललेले मन…. पहिलेपणाचा प्रत्येक स्पर्श असाच गहिरा… उत्कट… भावकोमल… शीतल… अनिर्वचनीय अनुभूतीचा…. पहिल्या पावसाची ही पहिली ललकारी… सप्ताहाच्या आतच उजाड, रुक्ष माळरानावर हिरव्या स्वस्तिकचिन्हांची नक्षी उमटविणारी… अक्षतांसारखी शोभायमान झालेली तिच्यावरील पांढरीशुभ्र फुले… कधी निळी… कधी जांभळी. त्यांवर इथे-तिथे उडणारी चिमुकली पिवळसर वर्णाची फुलपाखरे.

मागाहून येतात पावसाच्या सरींमागून सरी… पुन्हा एकदा बालपणाकडे घेऊन जाणार्‍या… हरपलेल्या श्रेयाचे ते माहेर… स्वानंदाचे जिव्हार… आत्मसुखाच्या अंगणात विहार करायला लावणारी ती रमणीय पहाट.

बालपणी पावसाच्या सरी सरसरून यायच्या… पागोळ्यांवरून निथळायच्या…. अंगण चिंब चिंब व्हायचे… आम्हीही ओलेचिंब होत असू… शरीराने अन् मनानेही… वाटायचे ः निळ्या नभातील निळ्या घनांतून ओघळणारा हा उत्सव! हे सत्य, स्वप्न की केवळ आभास? संवेदनेला चिमटा घेऊन पाहिल्यावर त्या गोजिरवाण्या थेंबांच्या सर्वांगस्पर्शाने ते सत्य असल्याची जाणीव व्हायची… पण ते स्वप्नच वाटायचे… कारण स्वप्नातच बागडायचे, स्वप्नामध्ये स्वप्न पाहण्याचे ते सोनपंखी दिवस होते ना! पंखांत उडण्याचे बळ नव्हते; तरीदेखील उडावेसे वाटायचे… जमिनीवरून चालण्याची इच्छाच होत नव्हती…. आसमंत बहरलेला असे… दोडक्याच्या, पडवळाच्या वेलींसाठी घातलेला मांडव भिजायचा… पानन्‌पान भिजायचे… दोडक्याची पिवळीधमक फुले फुलायची… गुलबक्षीच्या झाडांवर गुलाबी, पिवळी, पांढरी आणि काही ठिकाणी पांढर्‍या पाकळ्यांवर कुंकुम सांडल्यासारखी फुले फुलायची… फुलपाखरांची भिरी त्यांवरून उडायची.

आज या आठवणींच्या लडीमागून लडी उलगडल्या जातात आणि काळाचा प्रवाह उलटा-सुलटा होतो. पाऊस आणि पावसाची त्यावेळची रूपे न्याहाळण्यात मी तन्मय होतो. तेव्हाची ती तम्यता… ती उत्कटता आताशा भंग पावलेली आहे… पण या खुळ्या पावसाच्या प्रेमाचा दंश एकदा झाला तर तो आयुष्यभर टिकतो. म्हणून आजही कधीकधी एकदा मनमुक्त भिजावेसे वाटते…

लहानपणापासूनच्या पावसाच्या अनेक आठवणी मी मनाच्या सांदीकोपर्‍यांत साठवून ठेवल्या आहेत. पाळोळे ते चाररस्ता… वाटेत लागणारे ‘माजाळीच्या भोळ्या’चे छोटेसे नागमोडी वळण… त्याच्या नजीकचा ‘परंगरा’… वाटेतून खुणावणारी उंच डोंगरांची रांग आणि नारळीतरूंची रांग… मित्रमंडळीसह रमत-गमत शाळेत जाण्याचे दिवस… पुन्हा एकदा गतकाळाची सय येते… छत्रीला न जुमानता डोंगरदर्‍यांतून कोसळणारा मुसळधार पाऊस झोडपून काढायचा. ओलसर कपड्यांनी शाळेत प्रवेश करणे अनेकदा घडायचे… आठवते ते असे… एखाद्या दिवशी आभाळ काळेकुट्ट व्हायचे… संततधार लागायची… काही तासांनंतर सुट्टी जाहीर व्हायची… एका दिवशीच्या सुट्टीचा आनंद… मुक्तीचा आनंद…. मुक्तपणे पाऊस आणि पावसाची रूपकळा न्याहाळण्याचा आनंद. वहीची पाने दुमडून होड्या करण्याचा आणि त्या पाण्यात सोडण्याचा आनंद! त्या अचेतनाची पाण्यात विहार करण्याची ती चेतना पाहून मन उल्हसित व्हायचे… नाना पक्ष्यांच्या किलबिलाटाने आसमंत गजबजून जायचा. घराशेजारच्या आम्रवृक्षाच्या ढोलीत साळुंखी आपल्या पिल्लांना चारा देण्यात गढून जायची. बेडकांचा आवाज यायचा. मधून कोकिळेता पंचम आपला गहिरा सूर भरायचा. नाना पक्षी… नाना स्वर… मध्येच येणारा काकस्वर. संध्यासमयी गाईगुरांचे कळप घराकडे परतायचे. रानातून परतताना त्यांच्या हंबरण्याने वातावरण निनादून जायचे.

शाळेच्या मार्गावर आम्हा मुलांचे जथेच्या जथे असायचे. सृष्टीत पक्ष्यांचा किलबिलाट… ठरावीक वेळेला मुलांचा किलबिलाट… बालपण हा हा म्हणता ओसरले… कुमारवय आले… पण पावसाविषयीचे प्रेम ओसरले नाही.

पहिलीच्या पाठ्यपुस्तकात ः

देवा तुझे किती सुंदर आकाश

सुंदर प्रकाश सूर्य देतो

या ओळी वाचल्या. त्या अत्यंत भावल्या. याच आदिप्रेरणेतून आकाशातून पाऊस कोसळतो अशी त्या वयात मनाची समजूत होती. वाढते ज्ञान कधीकधी आपल्या आनंदात अडथळा निर्माण करते याचाही अनुभव आला.

पावसाचा उगम आणि उत्पत्ती शाळेत शिकविली जाऊ लागली. सूर्याच्या प्रखर उष्णतेने समुद्राच्या अन् अन्य जलाशयांतील पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणात होते… ती हलकी असल्यामुळे वातावरणात ऊर्ध्व दिशेकडे जाते… बाष्पीभवन होते… विशिष्ट गोठणबिंदूमुळे तिचे घनीभवन होते… वातावरणातील थंडी लागून त्याचे द्रवीभवन होते… ते पाण्याच्या थेंबांच्या रूपाने पृथ्वीतलावर कोसळते… कधीकधी ते गारांच्या रूपातही वर्षाव करते.

– या शास्त्रीय माहितीमुळे काही बिघडले नाही. रसमयता जाऊन रुक्षता आली खरी; पण मनाच्या आनंदसाम्राज्यावर कुणी मात करू शकत नाही. गंगेचे दान अखेरीस गंगेलाच प्राप्त होते, हा त्याचा इत्यर्थ एवढे कळले… पर्जन्य सृष्टीला जीवन देणारा… संजीवन देणारा हे उमगले.

************

सृजनाचा सखा असलेल्या पर्जन्याची प्राणिमात्र उत्कंठतेने वाट पाहत असतात. ‘जलदसमय एष प्राणिनां प्राणहेतु|’ असे कालिदासाने ‘ऋतुसंहार’मध्ये म्हटलेले आहे. पावसाळा दरवर्षी नेमाने येत असल्यामुळे काहींना त्याची अपूर्वाई वाटत नाही. पण प्राचीन काळातील ऋषिमुनींपासून आजच्या नव्या पिढीतील कवींपर्यंत अनेकांनी पाऊस आणि पावसाच्या अनेक कळा शब्दांत चिरबद्ध करून ठेवल्या आहेत. पावसाची प्रत्यक्ष अनुभूती जशी आल्हाददायी; त्याच्यात सचैल भिजण्याचा जो आनंद असतो तसाच आनंद कविनिर्मित पर्जन्यसूक्तात असतो. महाकवी वाल्मिकींनी वर्षा, शरद आणि वसंत या ऋतूंची समरसून वर्णने केलेली आहेत. कालिदासाच्या ‘ऋतुसंहार’ आणि ‘मेघदूत’ या काव्यात जी पर्जन्यचित्रे रेखाटलेली आहेत त्यांना तुलनाच नाही. अम्लान सौंदर्यविलासाचे चित्रण त्यात आहे. पावसातील सृष्टीच्या मनोहर रूपाचे तन्मयतेने वर्णन करणार्‍या कविता रवींद्रनाथांनी लिहिल्या आहेत. ‘वर्षायापन’, ‘नववर्षा’ आणि ‘आषाढ’ या त्यांच्या अप्रतिम कविता आहेत. ‘हृदय आमार नाचिरे आजिके, मयुरेर मत्तो नाचे रे’ अशी पावसाच्या सान्निध्यात त्यांची भावावस्था होते. बा. भ. बोरकरांची पर्जन्यसूक्ते या अभिजात परंपरेशी नाते जोडणारी आहेत. त्यांच्या ‘सरींवर सरी आल्या ग!’, ‘झाडे झाली निळी निळी’, ‘जलद भरुनी आले’, ‘घन बरसे रे’, ‘क्षितिजीं आले भरते ग’ आणि ‘खिडक्यांवर वाजे वारा’ या सरसरमणीय कविता याची साक्ष देतात. मंगेश पाडगावकरांच्या पावसावरील कवितांतील रूप-रस-गंध-स्पर्श-नादमय प्रतिमाविश्‍व मनाला आल्हाद देणारे. त्यांचा श्रावणात बरसणारा निळा घन सृष्टीचा श्रावणातील गहिरेपणा वाढवितो… प्रतिभावंतांच्या विदग्ध रसवृत्ती अशा दग्ध लौकिक जीवनावर मात करतात… अलौकिकाच्या अनुभूतीचा सर्वांगस्पर्श प्राप्त करून देतात… वसंत सावंतांच्या ‘श्रीरंग’ या कवितेतील अम्लान अक्षरे आसमंतातील चित्राला चिरस्मरणीय स्वरूप प्राप्त करून देतात ः

दूर नभाच्या पल्याड आहे उभा कुणी श्रीरंग

उधळित पिंजर तरल धुक्याची… झाडांवरती रंग

सूर्यबिंब झाकलें ढगांनी झरझरतो पाऊस

किरणांच्या छायेंत अनामिक कलाबतूंचे भास

उगवाईचा कळस दडाला ढग आले रांगांनीं

सह्याद्रीला कुणी फाशिलें भस्म नवें शैवांनी

त्यांची ‘आनंदगौरी’ अशीच आंबोलीच्या सौंदर्याचे शब्दशिल्प रेखाटणारी.

अशा कवितांचा आस्वाद घेताना मला नेहमीच कालिदासाच्या ‘अभिज्ञानशाकुन्तला’तील श्‍लोकाची आठवण होते.

रम्याणि वीक्ष्य मधुरांश्‍च निशम्य शब्दान्

पर्युत्सुकीभवति यत्सुखितोऽ जन्तुः|

तच्चेतसा स्मरति नूनमबोधपूर्वं

भावस्थिराणि जननान्तरसौहृदानि॥

रमणीय दृश्ये पाहिल्यावर आणि मधुर सूर ऐकल्यावर, मनुष्य असूनसुद्धा त्याला हुरहुर लागते. तिचे कारण असे की कसलीही स्पष्ट जाणीव नसताना, गतजन्मातील संस्काररूपाने स्थिर असलेल्या भावबंधनांची त्याच्या मनाला स्मृती होत असते.

पर्जन्योत्सवाच्या नितांत रमणीय रूपकळेने आणि सृजनोत्सवाच्या प्रतिबिंबात्मक रूपदर्शनामुळे अशीच नेमकी भावावस्था होत असते.

पर्जन्याच्या अमृतधारेने ओलीचिंब झालेली इंदिरा संतांसारखी मनस्विनी कवयित्री-

 

 

मेघश्याम पालाणानें

झाकोळला अवकाश

रेषा वार्‍याची हलेना

झिम्मा धरला पाऊस

संथ पावसाचे झोत

पानपाऊस वरून

झाडावरती पाखरू

घट्ट फांदीला धरून

निथळते ओले पंख

डोळे घेतले मिटून

कसे सामावून गेलें

थेंब धारेचा होऊन

असे उद्गारते तेव्हा त्या अनुभूतिदर्शनाने शब्दातीत आनंद होतो.

सुमित्रानंदन पंत यांच्यासारखा प्रतिभासंपन्न कवी अशाच प्रकारच्या निसर्गसमाधीनंतर उद्गारतो ः

रिमझिम-रिमझिम क्या कहते बूँदों के स्वर,

रोम सिहर उठते, छूते वे भीतर अन्तर!

धाराओं पर धाराएँ झरतीं धरती पर,

रज के कण-कण में तृण-तृण की फुलकावलि भर!

बहिणाबाई चौधरी, आरती प्रभू, ना. धों. महानोर, अनुराधा पाटील, अरुणा ढेरे, नलेश पाटील, पुष्पाग्रज, उत्तम कोळगावकर, चित्रसेन शबाब, मधुकर केचे, प्रभा गणोरकर आणि ग्रेस या वेगवेगळ्या कालखंडांतील आणि वेगवेगळ्या वृत्ती-प्रवृत्तींच्या कवी-कवयित्रींनी हे क्षितिज संपन्न केले आहे.

वसंत आबाजी डहाके यांच्यासारखा कोसळत्या शतकातील समर्थ कवी ‘पावसाच्या झाडाखाली’ या कवितेत आपला आत्मस्वर आगळ्या-वेगळ्या अनुभूतींने टिपतो. ही आशयघन कविता आपली जाणीव समृद्ध करणारी आहे.

पावसाच्या झाडाखाली कवि उभा असतो.

तो ऐकतो पावसाच्या पानांचं हिंस्र सळसळणं.

पाऊस पडत असतो कवीच्या उजाड माथ्यावर,

निर्मनुष्य डोळ्यांवर,

उघड्या पसरलेल्या तळहातांवर.

डॉ. अनुजा जोशी ही कवयित्री ‘नितळ निःश्‍वास’ या कवितेत म्हणते ः

पावसाशिवाय

काहीही नाही कळत फुलांना

फुलण्यापासून झुलण्यापर्यंत

चोचींना कुठेही नाही थारा

पावसाशिवाय

श्‍वासापासून निःश्‍वासापर्यंत

आधुनिक स्त्रीमन किती प्रगल्भ जाणिवांनिशी व्यक्त होऊ पाहते आहे याचे आश्‍वस्त रूप या आशयात दिसून येते; शिवाय पर्जन्याची चिरंतन धून येथे काळीजवेळ म्हणून जपलेली आहे याचाही प्रत्यय येतो.