Home बातम्या कृतज्ञतेची ओंजळ

कृतज्ञतेची ओंजळ

0

डॉ. सोमनाथ कोमरपंत

आदरणीय कविश्रेष्ठ कुसुमाग्रज

ऊर्फ

तीर्थरूप तात्यासाहेब शिरवाडकर यांस,

आदरपूर्वक अभिवादन.

गंगाजलासारखे पवित्र, महासागरासारखे विशाल, अथांग आणि हिमालयासारखे उत्तुंग असे तुमचे व्यक्तिमत्त्व. या चतुर्विध गुणांचा संगम तुमच्या कवितेतही झालेला आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात निर्माण झालेल्या प्रबोधनपर्वातून प्रेरणा घेतलेली, राष्ट्रवादाचे अन् समाजवादाचे संस्कार झालेली, पण कोणत्याही विचारप्रणालीच्या जोखडाखाली न दबलेली व मानवताधर्मात परिणत झालेली तुमची कविता.

२७ फेब्रुवारी १९१२ रोजी तुम्ही जन्म घेतला. ‘कुसुमाग्रजस्पर्शाची, वज्रनिर्धाराची आणि कुसुमकोमल कविता मागे ठेवून या लौकिक जगाचा १० मार्च १९९९ रोजी तुम्ही निरोप घेतला. तुमच्या अस्तित्वस्पर्शाने मराठी माती पुनीत झाली. खर्‍या अर्थाने मातेचे ऋण तुम्ही फेडले. पण तुमचे कविमन मराठी मातीपुरते सीमित राहिले नाही. तुमच्या कवितेने विश्‍वाला पालाण घातले. म्हणूनच तुमचे प्रिय मित्र आणि मराठीतील अग्रगण्य समीक्षक प्रा. वा. . कुलकर्णी म्हणतात ः

‘…कुसुमाग्रज हे मन अस्सल भारतीयभारतीयच नव्हे तर मराठी मातीतून वर आलेलं मन आहे. त्याची श्रद्धास्थाने, त्याचा मूल्यविचार, त्याची स्वप्ने या मातीने घडविली आहेत. या मातीचा गंध, रंग, स्पर्श त्या मनाच्या अभिव्यक्तीतून जाणवत आहे. इतर अनेक कवींपेक्षा कुसुमाग्रज हे मराठी मनाला जवळचे वाटतात हे यामुळेच.’ (कुसुमाग्रज ः एका मनाचा शोध/ मराठी कविता ः जुनी आणि नवी/पृ. १९४)

तात्यासाहेब, तुमच्या जन्मशताब्दीचा प्रारंभ झालेला आहे. म्हणून तुमच्या कवितेचे बोट धरून केलेला हा संवाद. तुमच्या कवितेच्या सान्निध्यात राहणे, तिचे भावस्मरण करणे म्हणजे तुमच्या मनाशी केलेला हृदयसंवाद. यासंदर्भात तुम्हीच म्हटलेले आहे ः

साहित्य म्हणजे अखेर एका जिवंत व्यक्तित्वातून पल्लवित झालेले दुसरे जिवंत व्यक्तित्व असते.’

तात्यासाहेब, तुम्ही लौकिक जगात खूप पाहिले, खूप भोगले. पण या दुःखव्यथांचे व्रण मनावर कायम ठेवले नाहीत. जीवनश्रद्धा ताजी, टवटवीत ठेवली. तिच्या प्रसन्नतेचे प्रतिबिंब तुमच्या मुखावर सदैव विलसत राहिले. पार्थिव जगातील सुखदुःखसंमिश्र अनुभूतीतून अपार्थिवतेचे वरदान घेऊन आलेली तुमची अम्लान कविता. हा तुमचा आत्मस्वर. माती आणि आकाश यांमधील संघर्ष तसा सनातन. पण त्याच्या चिंतनातून नित्यनूतन आनंदानुभूतीचे उन्मेष पकडणे हा कवीचा धर्म. तुमच्या शब्दांतच हे सांगावे लागेल ः

आकाशपण

हटता हटत नाही

मातीपण

मिटता मिटत नाही

आकाशमातीच्या

या संघर्षात

माझं जखमांचं देणं

फिटता फिटत नाही

तात्यासाहेब, तुम्ही ज्यावेळी या जगाचा निरोप घेतला तेव्हा यापुढे हे निरागस, अम्लान हास्य दिसणार नाही या विचाराने नेत्र डबडबलेहुंदका आवरता आला नाहीपण तुम्हीच असंख्य रसिकांच्या पाठीवरून हात फिरवीत सांत्वन करीत असल्याचा भास झालाडोळ्यांतून पाझरणारे अश्रूंचे थेंब आम्ही थोपविलेतुमच्याकडे द्रष्टेपण होतेतुमची वृत्ती स्थितप्रज्ञ महर्षीची.. तुमचे उद्गार आठवले ः

आकाशात फुललेली

मातीतली एक कहाणी

———–

ती शून्यामधली यात्रा

वार्‍यातील एक विराणी

गगनात विसर्जित होता

डोळ्यांत कशाला पाणी?

तुमच्याविषयीचे कविवर्य वसंत बापट यांचे शब्द आठवले…. धीर आला ः

तुम्ही विहंग

अनंत गगनाचे

तुम्हा असावी

बंद

मृत्यूची दारे

तो प्रवास सुंदर होताहे तुमचे कृतकृत्यतेचे उद्गार आठवले. मनाने ठरवलेआता शोक आवरायचातीर्थरूप चरणांना अखेरचे वंदन करून तुमचा निरोप घेतलाजीवनकलहाच्या गतिमान प्रवाहात पुन्हा मग्न झालो. मृत्यूने दार ठोठावले असतानाही निर्वाणीच्या क्षणाचे तुमचे आत्मनिर्भर शब्द मनात निनादत होते ः

जाता जाता गाईन मी

गाता गाता जाईन मी

गेल्यावरही या गगनातील

गीतामधुनी राहीन मी.

तुम्ही लौकिक जगातून गेलात; पण चिरंजीवी कविता मागे ठेवून. कविश्रेष्ठ बा. . बोरकर आणि तुम्ही समकालीन कवी. बाकीबाबांच्या जन्मशताब्दीची सांगता झाली आणि लगोलग तुमच्या जन्मशताब्दीचा प्रारंभ झाला. बोरकरकुसुमाग्रज हा मराठी कवितेतील इतरेतर द्वंद्व समास. तुम्हा दोघांच्या भावस्मरणामुळे मराठी साहित्याच्या प्रांगणात कवितेचा उत्सव होत राहावा असा नियतीचा संकेत दिसतो. बाकीबाबांनी अखंड आयुष्यात चांद्रायणव्रत आचरले अन् तुम्ही सूर्यतेजाचे उपासक झालात. मराठी काव्यक्षितिजावर तुम्हा दोघांचे नाव कायमचेचिरकाल टिकणारे. तुमच्या ८५ व्या वाढदिनी एक आनंददायी घटना घडली. भारतीय खगोलशास्त्रज्ञ डॉ. श्रीकांत लागू यांनी नवीन तार्‍याचा शोध लावला. स्वित्झर्लंड येथील आंतरराष्ट्रीय ग्रहतारे नोंदणी संस्थेने नव्याने शोधलेल्या या तार्‍याला कुसुमाग्रज ताराहे नाव देऊन आगळावेगळा सन्मान केला. तुमच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा आणि प्रतिभाशालित्वाचा हा गौरव होता.

भाऊसाहेब खांडेकर हे तुमच्या तेजस्वी कवितेचे निस्सिम चाहते. तुमचा जीवनलहरीहा कवितासंग्रह १९३३ मध्ये प्रसिद्ध झाला. तुमच्या वर्धिष्णू प्रतिभेकडे त्यांचे लक्ष होते. अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहून विशाखाकवितासंग्रह रसिकांपर्यंत येण्यासाठी भाऊसाहेबांचा सिंहाचा वाटा. भाऊसाहेब खांडेकर हे मराठीतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले साहित्यिकदुसरे तुम्हीहादेखील एक शुभसंकेत!

तात्यासाहेब, कविता हीच तुमच्या जीवनाची सखी. तापत्रयाच्या वेळी तिनेच तुम्हाला त्राण दिले. कविकुलगुरू केशवसुतांनंतरचे समाजमनस्क कवी म्हणून तुमच्याकडेच तर्जनी दाखविली जाते. केशवसुतांच्या कवितेची महत्ता अधोरेखित करताना तुम्ही म्हटले होते ः

केशवसुतांचे क्रांतिकारकत्व यात आहे की त्यांनी काव्यांतर्गत आत्मनिष्ठा जीवनाच्या सर्व प्रांतांना स्पर्श करण्याइतकी व्यापक केली…. केशवसुतांची सामाजिक कविता याच व्यापक आत्मनिष्ठेतून अथवा अनुभवातून निर्माण झाली आहे. संस्कृतिविकासाच्या उषःकालीन प्रकाशात जागृत झालेल्या त्यांच्या मनाला भोवतालच्या जगातील अन्याय, असत्य आणि अगतिकता यांची तीव्र जाणीव झाली.’

मराठी कवितेत सामाजिक आशयप्रगल्भ जाणिवेतून व्यक्त करणार्‍या प्रवासाच्या पाऊलखुणा तुमच्या आत्माभिव्यक्तीत दिसतात. तुमची कविता म्हणजे आत्मभान आणि समाजभान यांचे संतुलन. एका परीने हा स्वान्तशोध. तुमच्यासारख्या कविश्रेष्ठाने आपल्या जीवनाचे प्रेयस्आणि श्रेयस्शोधले होते. पुढील शब्दांत ते नेमकेपणाने व्यक्त झालेले आहे ः

समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा

कोठून फुलापरि वा मकरन्द मिळावा?

जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा

तव आन्तर अग्नी क्षणभर तरि फुलवावा

तव आन्तर अग्नी क्षणभर तरि फुलवावाहे भावसत्य राजकीय क्षेत्रात, समाजकारणात, कवितेच्या प्रांतात आणि रसिकतेच्या प्रदेशात प्रकर्षाने प्रत्ययास आले. बॅरिस्टर नाथ पै यांच्यासारख्या रसिकाग्रणी व राजकारणी पुरुषोत्तमाला विशाखाने जीवनमंत्र दिला. नानासाहेब गोरे यांच्यासारख्या प्रज्ञावंताला आणि शैलीसंपन्न साहित्यिकाला कारागृहाच्या भिंतीआड असताना अजोड मनोधैर्य दिले. पु. . देशपांडे यांच्यासारख्या सव्यसाची साहित्यिकाला विशाखानक्षत्रावर आपल्या तरुणाईचा शोध लागला. बा. . बोरकरांसारख्या तुमच्या जिव्हाळ्याच्या मित्राला आणि समर्थ कवीला विशाखाआवडत असे. आपल्या सार्थ भावना त्यांनी मुखर केल्या आहेत.

हा भागिरथिचा ओघ दिव्य शब्दांचा

यज्ञदग्ध उज्ज्वल अश्रुंचारक्ताचा

संजीवक प्राणच ये तव वितळुनि किंवा

उद्धार कराया दलित सगरपुत्रांचा

(कुसुमाग्रजांस/बोरकरांची कविता)

तुमच्या संवेदनशील कविप्रकृतीचा आणि कविप्रतिभेचा त्यांनी मर्मदृष्टीने घेतलेला हा कलात्म वेध.

वा. रा. कान्त, श्रीकृष्ण पोवळे, कृ. . निकुंब, वसंत बापट आणि मंगेश पाडगावकर या प्रतिभावंत कवींना विशाखाने प्रभावित केले. संवेदनक्षम वयात मंगेश पाडगावकरांना विशाखामधील कवितांनी झपाटून टाकले होते. ते म्हणतात ः

हा संस्कार म्हणजे सामाजिक वास्तवाकडे उघड्या डोळ्यांनी पाहण्याचासामाजिक जाणिवेला काव्यरूप देणे हा एक अत्यंत महत्त्वाचा कलात्मक अनुभव आहे हे आम्हाला त्या वयात विशाखाने शिकविले.’

तात्यासाहेब, तुम्हाला ही अमोघ, ओजस्वी वाणी, दलितांविषयीची कणव, अन्यायाविषयीची चीड, उत्तुंग कल्पनाविलास, भव्यदिव्यमंगलउदात्त यांविषयीचे ममत्व, मातृभूमीविषयीचा अपार जिव्हाळा आणि अवघ्या जीवनाचा सारांश सांगणारी कवित्वशक्ती कुणी दिली? तुमच्या जीवनाच्या खडतर साधनेतूनच जीवन म्हणजे काय?’ याची तुम्हाला संथा मिळाली. श्रद्धेय मूल्यांची उपासना करण्याचा मार्ग दाखविला. केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज, भा. रा. तांबे व माधव ज्युलियन यांसारख्या समृद्ध कवींचा वारसा तुम्ही ममत्वाने जपला. तुमच्या संवेदनक्षम वयात नाशिकची भूमी मंत्रभारलेली होती. तिळभांडेश्‍वराच्या बोळात मेणबत्तीप्रमाणे माणसे शिलगावणारे स्वातंत्र्यवीर सावरकर मातृभूमीच्या मुक्तीसाठी धीरोदात्त मनाने वावरत होते. एकेकाळी तो ऊर्जास्रोत होता. अंतःप्रेरणा निर्माण करणार्‍या मृत्युंजय ज्योती येथे फुलल्या होत्या.

सुंदर मी होणार

….आता सुंदर मी होणार

जुनी इंद्रियें, जुना पिसारा सर्व सर्व झडणार

नव्या तनूचे नव्या शक्तीचे पंख मला फुटणार

त्या पंखांनी कर्तृत्वाच्या व्योमीं मी घुसणार

देशहिताच्या पवनसागरीं पोहाया सजणार

सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेवर मात करून आत्मनिर्भर वृत्तीने उभ्या ठाकलेल्या कवी गोविंदांनीही तुमच्या अंतःप्रेरणेला जागविले. तुमच्या जडणघडणीचा आलेख पूर्वीच्या विरामचिन्हेमध्ये आणि नंतरच्या वाटेवरच्या सावल्यामध्ये न्याहाळावा. ‘वाटेवरच्या सावल्यामधील कवितेच्या उगमाकडे’, ‘नदीआणि प्रॉमिथिअसहे तुमचे संस्मरणात्मक लेख म्हणजे काव्याची बलस्थाने मनात मुरवून तन्मयतेने केलेला रसिकसंवाद. ‘एका पिढीचे आत्मकथनमधील तुमचा आत्मचरित्रात्मक लेखही असाच मनोवेधक. प्राणांचे पलिते प्रज्वलित करणारी क्रांतीचा जयजयकारसारखी कविता तुम्हाला कशी सुचली याचे उगमस्थान या उत्कट मनोगतात सापडते.

गोदावरीच्या या पाषाणबद्ध किनार्‍याने कमलावराप्रमाणे मला अनंत हस्तांनी अनंत दिले आहेया शब्दांत तुम्ही आपल्या मनातील कृतज्ञता प्रकट केली आहे. गंगेचे दान गंगेलाच अर्पण करावे त्याप्रमाणे तुम्ही छंदोमयीहा तुमचा कवितासंग्रह नाशिकच्या परिसरातील गोदावरीस अर्पण केला आहे.

मानवी जीवन समृद्ध करणार्‍या, उन्नयनाची दिशा दाखविणार्‍या प्रज्ञावंतांविषयी आणि प्रतिभावंतांविषयी आत्मीयतेचा भाव प्रकट करणार्‍या कविता तुम्ही लिहिल्या. लोकमान्य टिळक, बालकवी, बायरन, उमर खैयाम, छत्रपती शिवाजी, बाजी प्रभू, सैगल, ज्योतिराव फुले, विवेकानंद, बाबा आमटे आणि तुकाराम या महापुरुषांचा गौरव करणार्‍या कविता तुम्ही लिहिल्या. पण त्या एकाच ठशाच्या नाहीत. अनेक विभ्रमांच्या त्या कविता आहेत. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासातील सुखदुःखाच्या ज्या घटना घडल्या, त्याविषयीची स्पंदने तुम्ही प्रकट केली आहेत. खानदेशच्या जमिनीवर पाय ठेवताच जगन्मातेच्या दुधाळ वात्सल्याने थबथबलेले सानेगुरुजींचे श्‍वास तुम्हाला जाणवतात. दरिद्री शाळेच्या दुभंगलेल्या पायर्‍या चढणारा केशवसुतांचा आत्ममग्न झपूर्झा जाणवतो. स्टीम एंजिनच्या राक्षसी चाकाखाली चिरडले जाणारे बालकवी नावाचे तारकांचे गाणे तुम्हाला जाणवते. जमिनीला स्पर्श करणारी तुमची पावले मग शरमिंदी होतात. तुमच्या कुसुमकोमल शब्दकळेची आणि संवेदनशील मनाची ही अनोखी निर्मिती आहे. यामुळेच मनाच्या तळघरात देहूचा वाणीही तुमची कविता घुमत राहते ः

दृष्टीला उसण देणारा एक प्रचंड विस्तार

निळ्याजांभळ्या मेघांचा विराट मेळावा

सहस्रावधी विजांचे आणि वादळांचे

पंख पालवीत,

इंद्रधनुष्यांचे रसरशीत तुकडे उधळीत

अंतराळातील शून्याच्या साम्राज्याला

प्रखर अस्तित्वाची देणगी देत

अनंताच्या रहस्यमय मंदिराकडे

मार्गक्रमण करणारा.

तुम्हाला घडलेले तुकारामांचे हे अत्यंत विलोभनीय आणि त्रिमितियुक्त दर्शन आहे.

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती

कथा या खुळ्या सागराला

अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा

किनारा तुला पामराला!

या कोलंबसाचे गर्वगीतमधील मानवाच्या विजिगीषू आकांक्षांच्या परमोच्च बिंदूचे विस्मरण काव्यरसिकांना कसे होईल?

कशास आई, भिजविसि डोळे, उजळ तुझे भाल

रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल

सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते

उठतिल त्या ज्वालांतुन भावी क्रांतीचे नेते

लोहदण्ड तव पायांमधले खळाखळा तुटणार

आई, खळाखळा तुटणार

हा तेजाचा स्फुल्लिंग संवेदनशील मनाला निरंतर प्रेरणा देत राहील. ‘रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकालया उद्गारात सुभाषिताची महत्ता आहे.

परी भव्य ते तेज पाहून पूजून

घेऊ गळ्याशी कसे काजवे

नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा

तुझी दूरता त्याहुनी साहवे!

पृथ्वीचे प्रेमगीतमधील मनस्विनीचा प्रीतिभाव येथे उत्कटतेच्या परिसीमेपर्यंत गेलेला आहे.

तात्यासाहेब, तुमची कविता अशी विविधरूपिणी, नवोन्मेषशालिनी, सौंदर्यशालिनी, ओजस्विनी आणि अम्लान रूपकळेने संपन्न झालेली. तिची महत्ता संक्षेपाने कशी वर्णावी? ती एकान्तात वाचावी. मनात साठवावी. अंतर्मुखतेच्या प्रवासास सुरुवात करावी.

कवितेप्रमाणेच कथा, कादंबरी, नाटक, ललित निबंध, आस्वादक समीक्षा आणि अनुवाद हे वाङ्‌मयप्रकार तुम्ही लीलया हाताळले. त्यात अपूर्व यश संपादन केले. तुमची प्रतिभा अशी सप्तरंगांच्या इंद्रधनूसारखी! ‘समुदित मदनाया जातीचा उपयोग करून तुम्ही केलेला मेघदूताचा अनुवाद संस्मरणीय आहे.

प्रकाशयुगाचे सामगायन करणार्‍या कविश्रेष्ठा, तुमच्या कवितेच्या रसतीर्थात न्हाऊन निघाल्यानंतर मनात उमटलेले तरंग व्यक्त करावेसे वाटतात. श्रद्धा दाखवू नये आणि लपवूही नये. तुमच्या कवितेची प्रथम भेट कधी झाली? १९५५५६ चे ते शालेय वर्ष होते. दुसरीच्या पाठ्यपुस्तकात तुमची उठा उठा चिऊताई…’ ही कविता होती. तारस्वरात कविता पाठ करण्याचे ते दिवस.

उठा उठा चिऊताई

सारीकडे उजाडले

डोळे तरी मिटलेले

अजूनही|

कविता म्हणजे काय? कवीचे मोठेपण कशात असते? हे न कळण्याच्या वयातही कविता भेटली. कवीचे नाव अनुक्रमणिकेत कुसुमाग्रजअसे होते. कवितेची लय आवडली. ती तोंडपाठ झाली. आपल्या घरट्याच्या दारापाशी सोनेरी दूत आले असता झोपायचे नसते हेही कळले. कवीचे नाव आवडले. बालपणीच मनात रुजले. ते कायमचेच. पद्मा मोरजे यांनी संपादित केलेल्या बालबोध मेव्यातील कुसुमाग्रजया पुस्तकात कित्येक वर्षांनंतर ती कविता आढळली. वाचली. पुन्हा बालपणात शिरलो. चिमण्या विश्‍वात विसावा देणारी ती कविता. कळी खुलली. पुढे समिधाया ललित गद्यसंग्रहात ही चिऊताई किती प्रौढ झाली होती! ‘आकाशाचे ओझे पंखांवर घेऊन पिंपळावर बसून राहिली होती.’ अधूनमधून कुसुमाग्रजांची कविता भेटत गेली. आल्हाद देऊ लागली. आठवीला साहित्यप्रभाहे पाठ्यपुस्तक होते. तुमच्या किनारासंग्रहातील माझा हिंदुस्थानही कविता त्यात होती. प्रियतम भारताच्या वैभवशाली भूगोलाचे आणि समृद्ध परंपरा असलेल्या इतिहासाचे तुम्ही अमोघ शब्दांत वर्णन केले होते. ‘वागीश्‍वरिचें विहारमंदिर देखा तेथ विशालया ओळीभोवती मन रुंजी घालू लागले. आमचा वारसा कळला.

त्याच वर्षी गोवामुक्तीचा मंगलदिन १९ डिसेंबर १९६१ रोजी उजाडला.

रात सरे, ये प्राचीवरती तेजाची रेषा

नव्या मनूचा घोष घुमे हा दुमदुमतात दिशा

जागृत झाल्या दलित जगाच्या बलशाली आशा

स्वातंत्र्याचे, समसत्तेचे उन्नत होय निशाण

माझा हिंदुस्थान

हे तुमच्याआमच्या प्रचितीचे उद्गार झाले. योगायोगाने वसंत बापट यांची शतकानंतरही कविता त्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट होती. ‘शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाटच्या पठणाने ज्या आनंदानुभूतीचा आस्वाद घेतला, तो शब्दांतून वर्णन करणे कठीण! पुन्हा या काळातील आठवणीत शिरायला हवे.

दिसामासाने कवितेविषयीचे प्रेम वाढतच गेले. आमचे शालेय जगतही या भाववृत्तींचे पोषण करणारे होते. मुख्याध्यापक ह. रा. प्रभू हे राष्ट्रीय वृत्तीचे. वाङ्‌मयाचे निस्सीम उपासक. त्यांच्या प्रोत्साहनाने कोलंबसाचे गर्वगीत’, ‘अहिनकुल’, ‘पृथ्वीचे प्रेमगीत’, ‘स्मृतीआणि गोदाकाठचा संधिकालया तुमच्या कविता वाचनात आल्या. प्रा. गं. भा. निरंतर यांनी संपादित केलेले मधुघटहे पुस्तक आम्हा विद्यार्थ्यांना ते देत असत.

२० ऑक्टोबर १९६२ ला चीनने आमच्या देशावर आक्रमण केले. सर्वत्र प्रक्षोभाची लाट पसरली. वृत्तपत्राच्या पहिल्या पृष्ठावर तुमची आवाहनही कविता झळकली.

बर्फाचे तट पेटुनि उठले सदन शिवाचें कोसळतें

रक्त आपुल्या प्रिय आईचें शुभ्र हिमावर ओघळते!

असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचें पुण्य मळे

अशा घडीला कोण करंटा तटस्थतेनें दूर खळे

कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयांत जळे

साममंत्र तो सरे, रणाची नौबत आतां धडधडते

रक्त आपुल्या प्रिय आईचें शुभ्र हिमावर ओघळतें!

या तुमच्या कवितेने पुन्हा एकदा रणसंग्रामपर्वाची आमच्या कुमारवयात आठवण करून दिली. . दि. माडगूळकरांचे माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमचे सुरूआणि वसंत बापट यांचे उत्तुंग अमुची उत्तरसीमा इंच इंच लढवूही समरगीते सर्वतोमुखी झाली होती.

पुढे चौगुले महाविद्यालयात बी..च्या अभ्यासक्रमात विशाखाहा तुमचा कवितासंग्रह लावला होता. आमचे मराठीचे प्राध्यापक डॉ. प्रल्हाद वडेर यांनी तो तन्मयतेने आणि मर्मज्ञतेने शिकविला. त्याच वर्षी रसयात्राहा तुमच्या निवडक कवितांचा संग्रह प्रसिद्ध झाला. प्रारंभीची तुमच्या विदग्ध रसवृत्तींचे अवगाहन करणारी प्रा. शंकर वि. वैद्य यांची प्रसन्न शैलीतील अभ्यासपूर्ण प्रस्तावना आणि कविश्रेष्ठ बा. . बोरकर यांनी रसज्ञतेने लिहिलेली तुमच्या निवडक कवितांची रसग्रहणे वाचून अभ्यासाचा विषय ध्यासाचा झाला. हा त्रिवेणी संगम होता. या संगमतीर्थात सचैल स्नान करण्याचा योग आला. याहून भाग्ययोग तो दुसरा कोणता? अशा प्रकारचा आनंदानुभव बा. . बोरकर यांनी लिहिलेल्या आनंदयात्री रवींद्रनाथया चरित्रवाचनामुळे घेतला होता. पु.लं.च्या प्रस्तावनेमुळे तिथे समसभा संयोग झाला होता.

तात्यासाहेब, तुमची क्रांतीचा जयजयकारआणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची स्वतंत्रतेचे स्तोत्रया दोन कविता म्हणजे मराठीच्या काव्यप्रांगणातील अम्लान फुले आहेत. मलाही ती अत्यंत प्रिय आहेत.

तात्यासाहेब, जीवनभर तुम्ही कवितेची साधना केली. देश पारतंत्र्यात असताना आत्मसमर्पणशीलतेचा मंत्र कवितेतून दिला. स्वातंत्र्य मिळाले, पण उराशी बाळगलेली सारीच स्वप्ने सफल झाली नाहीत. अनेकांचा भ्रमनिरास झाला. या विसंवादावरही तुम्ही प्रहार केला. तुमच्या कवितेची रूपकळा बदलली. पण आत्मिक स्पंदनाचे रूप तेच राहिले. ‘जीवनलहरीपासून सुरू झालेला प्रवास महावृक्षापर्यंत येऊन थांबला. तुमच्या या परिणतप्रज्ञ प्रवासाकडे एका तपस्वी महर्षीची परिक्रमा म्हणून बघायला हवे. कारण या महावृक्षाच्या सावलीतच अनेकांना जीवनाचा अर्थ कळलेला आहे. तुम्ही जीवनकलहात आणि भोवतालच्या कोलाहलात आमच्या यःकश्‍चित जीवनात आनंदाचे बेटनिर्माण केले आहे. तुमचा हा मिणमिणता दिवानसता तर आमच्या जीवनात हाहाकार आणि अंधकार निर्माण झाला असता. म्हणून तुमच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ही कृतज्ञतेची ओंजळ वाहत आहे. तुम्हाला त्रिवार वंदन!