किनारपट्टीस ‘लुबानचा’ पुन्हा फटका

0
128
मोरजी किनारी दुसर्‍या दिवशी झालेली स्थिती.

पणजी, पेडणे, वास्को (प्रतिनिधी)
लुबान वादळाचा गोव्याच्या किनारपट्टीवर बुधवारपासून सुरू झालेला प्रभाव काल गुरुवारीही बर्‍याच प्रमाणात कायम राहिला. राज्यातील उत्तर तसेच दक्षिण गोव्यातील विविध समुद्रकिनार्‍यांवर दुपारपासून पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढून किनार्‍यांमधील शॅकमध्ये पाणी घुसल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले.
किनार्‍यांवर बुधवारपेक्षा काल पाण्याच्या पातळीत अधिक वाढ झाल्याचे दिसून आले. मोरजी, हरमल, कांदोळी, कळंगुट, सिकेरी, वागातोर, हणजूण तसेच दक्षिणेतील बायणा, बाणावली, कोलवा, पोळे आदी किनार्‍यांवरही सलग दुसर्‍या दिवशी किनारी शॅकना फटका बसला. बर्‍याच व्यावसायिकांनी आपापल्या शॅकमधील मौल्यवान साहित्य हलविल्याने काल त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले.
प्रशासनाने किनार्‍यांवर धोक्याचा इशारा दर्शविणारे झेंडे लावले आहेत. तसेच जीवरक्षकांनाही सूचना दिल्या आहेत. मात्र कोलव्यातील जीवरक्षकांसाठीचा मनोरा पाण्याखाली गेला होता.
बायणा किनार्‍याला फटका
बायणा येथे समुद्राच्या पाण्याची पातळी काल बरीच वाढली. समुद्रकिनार्‍यावर पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने उपजिल्हाधिकारी महादेव आरोंदेकर यांनी येथील मच्छिमारांना पाण्यात मासेमारीसाठी न जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच येथील जीवरक्षकांना लोकांना पाण्यापासून दूर ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. आपत्तकालीन व्यवस्थापन याविषयी लक्ष ठेवणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकार्‍यांनी दिली.
बायणा समुद्रकिनार्‍यावर पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने गजबजणारा समुद्रकिनारा काल सुनसान झाला होता. जीवरक्षक प्रत्येक माणसावर लक्ष ठेवून होते. तसेच पाण्यात न जाण्याचा त्यांना सल्ला देत होते.
दुसर्‍याही दिवशी मोरजीत
पाण्याचा धोका कायम
मोरजी किनारी दुसर्‍याही दिवशी समुद्राच्या पाण्याचा धोका कायम राहिल्याने पर्यटन व्यावसायिकांमध्ये घबराट पसरलेली आहे. ऐन पर्यटन हंगामात समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून किनारी भागातील शॅकमध्ये घुसल्याने पर्यटनावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे.
समुद्राच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढत असल्याने सरकार आणि पर्यंटन खात्याने यावर गांभीर्याने विचार करून हंगामी शॅक घालण्यास जागा दिली जाते ती जागा वरच्या बाजूला देण्याची मागणी वाढत आहे.