वास्को (न. प्र.)
श्री शिर्डी साईबाबांच्या १००व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून सारवाडा, केंकरे कॉलनी-मडगाव येथेश्री साईस्थानात गुरुवार दि. १८ ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर श्री साई चरणी पूजा-पाठ, अभिषेक व इतर धार्मिक विधी संपन्न होणार असल्याची माहिती साईप्रचारक शाहू महाराज यांनी दिली.
वास्को येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत कला विशारद पुणे विद्यापीठ निवृत्त स्थापना अधिकारी बाबूराव रेडकर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना शाहू महाराज म्हणाले, गोमंतकीय सुपूत्र कै. वसंतशास्त्री ऊर्फ आबाजी पणशीकर यांचा जन्म पेडणे-पणशीवाडा, कर्मभूमी मुंबई ठाकूरद्वार फणसवाडी, साईमंदीर या योगे संत गाडगेमहाराज, साने गुरुजी, दापोलीचे फाटक गुरुजी, अशा महान विभूतींचा प्रत्यक्ष सहवास आणि ह. भ. प. दासगूण महाराज यांचे आशीर्वाद यामुळे ‘सबका मालिक एक’ या अद्वैत सिध्दान्ताचे कार्य करणार्या माझ्या तीर्थरूप आई-वडिलांच्या पुण्याईने मला गुरुबळ लाभले. ‘तू माझा मानसपुत्र आहेस धार्मिक सामाजिक कार्यक्रम’, असा आदेश देऊन पू. पणशीकरांनी १९८० साली मडगावी, सारवाडा केंकरे कॉलनीत साई गादीची स्थापना केली. या साईस्थानात वर्षपध्दतीप्रमाणे गुरुवार दि. १८ ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर श्री शिर्डीसाई बाबांची १०० वी पुण्यतिथी महोत्सव साईभक्ती प्रचारक या नात्याने माझ्या पौरोहित्याखाली विविध धार्मिक विधी पार पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळपासून सुरू होणार्या या श्री साईबाबांच्या १००व्या पुण्यतिथी महोत्सवी कार्यक्रमात श्री गणेश पूजन, सच्चिदानंद साईंची गंधपूजा, चांदीच्या प्रासादिक पादुकावर अभिषेक, समाधी अध्याय वाचन अशा अनेक धार्मिक विधीनंतर दुपारी १२.३० वाजता गोमंतकातील साईभक्तांच्या भव्य उपस्थितीत सामुदायिक महाआरतीचा कार्यक्रम व नंतर मंत्रपुष्प, सांगणे-मागणे व साई महानैवेद्य होईल, अशी कार्यक्रमाची रूपरेषा सांगताना दसर्यानिमित्त संध्याकाळी ४ वाजता केंकरे इमारत येथून श्री साई प्रतिमेची मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. मिरवणूक शिरवडे मार्गे, राष्ट्रोळी जागेश्वर उड्डाण पुलावरून सार्वजनिक गणपती पिंपळवेडा, जुने रेल्वे स्टेशन रोड, मशिदरोड, स्टेटबँक, राममंदिर, दामोदर साळ, कोंबवाडा, विठ्ठल मंदिर, महिलानूतन हायस्कूल, दामोदर विद्याभवन, पेडा मारूती मंदिर खारेबांध मार्गे पालखी मुळस्थानी येईल व आरती, तीर्थप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पालखी मिरवणूक मार्गावर साई भक्तांनी रांगोळी घालून श्री साई पालखीची आरती ओवाळणी करून पालखीचे भव्य स्वागत करावेे, असे आवाहन पूज्यश्री शाहू महाराज यांनी केले. दसरादिनी भाविकांसाठी रात्रौ १० वा. पर्यंत साईदर्शन सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.