जुने गोवेतील घर पाडल्याप्रकरणी एसटी-एससी आयोकडून दखल

0
88

गोवा एसटी आणि एससी आयोगाने ओल्ड गोवा येथील एसटी समाजातील पर्वतकर यांच्या घर जमीनदोस्त प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून बांधकाम खाते व संबंधितांना दहा दिवसात अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे, अशी माहिती उटाचे सचिव रवींद्र गावकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

ओल्ड गोवा येथील पवर्तकर कुटुंबीयांच्या निवासाची पर्यायी व्यवस्था न करता गेल्या १७ ऑगस्ट रोजी पावसाळ्यात त्यांचे राहते घर मोडण्याचा प्रकार निंदनीय आहे. पर्वतकर यांचे घर रस्ता रुंदीकरण क्षेत्रात येत आहे. त्यांच्या घराचा भूखंड ६८२ चौरस मीटर असताना त्यांना केवळ ३०० चौरस मीटरचा भूखंड उपलब्ध करण्यात आला आहे. सदर भूखंड हा पुरातत्त्व खात्याच्या नियंत्रणाखालील क्षेत्रात येत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी घर बांधताना काही समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. सरकारने पर्वतकर कुटुंबीयाना घर बांधून द्यावे, अशी मागणी गावकर यांनी केली.
उटा संघटनेने एसटी समाज बांधवासाठी सरकारने तयार केलेल्या विविध योजनांच्या जनजागृतीसाठी पाच तालुक्यात खास मेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष नामदेव फातर्पेकर यांनी दिली.

एसटी समाज बांधव आदिवासी खात्याच्या विविध सरकारी योजनांबाबत अनभिज्ञ आहेत. १ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ३ वाजता तळसय – धारबांदोडा, २ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजता करमळी तिसवाडी, ४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ३ वाजता श्रीस्थळ काणकोण, ५ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजता केपे आणि ६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजता सांगे येथे मेळावे घेण्यात येणार आहेत. या मेळाव्यातून समाज बांधवांच्या समस्या, तक्रारी सुध्दा जाणून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असेही फातर्पेकर यांनी सांगितले.