
अरपिंदर सिंग याने पुरुषांच्या तिहेरी उडी प्रकारात १६.७७ मीटर अंतर पार करताना भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये या प्रकारात तब्बल ४८ वर्षांनी सुवर्ण प्राप्त झाले आहे. २०१४ साली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य जिंकल्यानंतर अरपिंदरला आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक बहुक्रीडा प्रकारांचा समावेश असलेल्या स्पर्धांमध्ये रिक्तहस्ते परतावे लागले होते. काल बुधवारी त्याने तिसर्या प्रयत्नात सुवर्णावर शिक्कामोर्तब केले. पहिला प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर अरपिंदरने दुसर्या प्रयत्नात १६.५८ मीटर अंतर कापले. तर चौथ्या प्रयत्नात त्याला केवळ १६.०८ पर्यंत जाता आले.
आर्यन वेट्टिल राकेश बाबू १६.४० मीटर अशा कामगिरीसह सहाव्या स्थानी राहिला. उझबेकिस्तानचा रुसलान कुरबानोव १६.६२ मीटरसह दुसर्या स्थानी राहिला. चीनच्या शुओ काओ याने १६.५६ मीटरसह कांस्य पदक आपल्या झोळीत टाकले. २०१४ सालच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अरपिंदरला पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले होते. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या राष्ट्रीय आंतरराज्य ऍथलेटिक स्पर्धेत अरपिंदरने १७.०७ अशी कामगिरी केली होती. त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीदेखील १७.१७ अशी आहे. त्यामुळे या दोन्ही प्रदर्शनांच्या जवळपास न जाऊनही त्याने सुवर्णकमाई केली. १९७० साली मोहिंदर सिंग गिल यांनी तिहेरी उडीमध्ये भारताला सुवर्ण मिळवून दिले होेते. यानंतर कोणालाही या कामगिरीच्या जवळपासही जाता आले नव्हते.