हेप्टाथ्लॉनमध्ये स्वप्नाला गोल्ड

0
91
India's Swapna Barman celebrates winning the women's 800m heptathlon athletics event during the 2018 Asian Games in Jakarta on August 29, 2018. / AFP PHOTO / Jewel SAMAD

भारताच्या २१ वर्षीय स्वप्ना बर्मन हिने प्रतिकुल परिस्थितीवर मात करताना हेप्टाथ्लॉन प्रकारात ६०२६ गुणांची कमाई करत सुवर्ण जिंकले. आशियाई क्रीडा स्पर्धेत हेप्टाथ्लॉनमध्ये सुवर्ण जिंकणारी ती भारताची पहिली खेळाडू ठरली. दातदुखीने त्रस्त असतानादेखील तिने स्वतःला झोकून देत स्वतःच्या दुखण्यापेक्षा देशाला पहिली पसंती दिली. १०० मीटरमध्ये पाचवे स्थान मिळवून तिने ९८१ गुणांची कमाई केली. यानंतर उंच उडीत पहिल्या स्थानी राहताना १००३ गुण आपल्या खात्यात तिने जमा केले. गोळाफेकमध्ये दुसरे स्थान मिळाल्याने ७०७ गुणांचा लाभ तिला झाला.

२०० मीटरमध्ये सातव्या स्थानी समाधान मानावे लागल्याने केवळ ७९० गुण तिला मिळाले. परंतु, यानंतर लांब उडी (दुसरे स्थान, ८६५ गुण), भालाफेक (पहिले स्थान, ८७२ गुण) व ८०० मीटर धावणे (८०८ गुण, चौथे स्थान) तीन प्रकारात कामगिरी उंचावली. ५९२४ गुणांसह चीनची वांग क्विंगलिंग दुसर्‍या व जपानची यामासाकी युकी ५८७३ गुण मिळवून तिसर्‍या स्थानी राहिली. ५८३७ गुण घेतलेल्या पूर्णिमा हेंबाराम हिला चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले. बंगालच्या सोमा बिस्वास, कर्नाटकची जेजे शोभा व प्रमिला अय्यपा यांनी या प्रकारात भारताला यापूर्वी पदके मिळवून दिली आहेत. २००२ साली बिस्लाव व शोभा यांनी दुसरे व तिसरे स्थान मिळविले होते तर २००६ साली प्रमिलाने कांस्य पदकाची कमाई केली होती.