
>> ८०० मीटरमध्ये जिन्सन जॉन्सनला रौप्य
ऍथलेटिकच्या ट्रॅक प्रकारांमध्ये भारताने काल शानदार कामगिरी केली. ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीतही भारताचे धावपटू मनजीत सिंग आणि जिन्सन जॉन्सन यांनी पदकांचा डबल धमाका करत इतिहास रचला. मनजीतने १ मिनिट आणि ४६.१५ सेकंदात ८०० मीटर अंतर कापत सुवर्ण पदक पटकावले. ८०० मीटरमध्ये १९८२ साली भारताने शेवटचे सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे मनजीतची कालची कामगिरी खास ठरली. कतारचा अब्दुल्ला अबुबाकर १.४६.३८ सेकंद अशा वेळेत तिसर्या स्थानी राहिला. मनजीतने वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करताना आंतरराष्ट्रीय पातळीवरील आपले पहिलेच पदक जिंकले.
जून महिन्यात झालेल्या राष्ट्रीय आंतरराज्य ऍथलेटिक स्पर्धेत श्रीराम सिंग यांचा ८०० मीटरमधील ४२ वर्षांपूर्वीचा राष्ट्रीय विक्रम मोडलेला जॉन्सन दुसर्या स्थानी राहिला. जॉन्सनने १ मिनिट आणि ४६.३५ सेकंदात हे अंतर कापत रौप्य पदकाची कमाई केली. पात्रता फेरीत जिन्सन याने १.४७.४९ अशी वेळ नोंदवून पहिल्या स्थानासह अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविली होती तर मनजीत शेवटच्या आठव्या स्थानी राहिला होता. त्याने १.४८.६४ अशा वेळेची नोंद केली होती. पुरुषांच्या ८०० मीटरमध्ये एकाचवेळी दोन पदके जिंकण्याची भारताची ही तिसरी वेळ आहे. १९५१ साली रणजीत सिंग (सुवर्ण) व कुलवंत सिंग (रौप्य) तर १९६२ साली दलजीत सिंग (रौप्य) व अमृतपाल (कांस्य) यांनी अशी पदके पटकावली होती.