>> कला अकादमीतर्फे गोमंत रंगभूमीदिन साजरा
>> नाट्यकलाकारांना पुरस्कारांचे वितरण
कला हा गोमंतकीयांचा श्वास आहे. आपण वेगवेगळ्या क्षेत्रात असलो तरी कलेचे भोक्ते आहोत. कला अकादमीतर्फे होणार्या नाट्य स्पर्धांत नवीन नाट्य संहिता सादर करण्यासाठी संहिता मिळणे कठीण होते. या पार्श्वभूमीवर नवीन नाट्यसंहिता लिहील्या जाव्यात व त्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून नवीन नाटकांचा महोत्सव कला अकादमी आयोजित करणार आहे. त्यासाठी नाट्य संस्थांचा निर्मितीचा खर्च कला अकादमीतर्फे उचलण्यात येणार आहे अशी घोषणा कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी काल केली.
कला अकादमी गोवातर्फे गोव्याचे आद्य नाटककार कृष्णंभट बांदकर यांच्या जयंती प्रित्यर्थ साजरा केला जाणारा ‘गोमंत रंगभूमी दिन’ काल अकादमीच्या मा. दीनानाथ कला मंदिरात पार पडला. त्यावेळी अध्यक्ष स्थानावरून गोविंद गावडे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ख्यातनाम नेपथ्यकार बाबा पार्सेकर तर सन्माननीय पाहुणे म्हणून कला संस्कृती खात्याचे सचिव दौलतराव हवालदार उपस्थित होते. व्यासपीठावर अकादमीचे सदस्य सचिव गुरुदास पिळर्णकर, कार्यकारी मंडळाचे सदस्य रवींद्र आमोणकर व राजीव शिंदे उपस्थित होते.
या सोहळ्यात कृष्णंभट बांदकर पुरस्काराचे २०१७ चे मानकरी आश्विनी जांबावलीकर (संगीत दिग्दर्शन व अभिनय), तुळशीदास राऊत, नामदेव शेट, शिवाजी देसाई (अभिनय), रामकृष्ण सुर्लकर (संगीत दिग्दर्शक), नारायण (नाना) आसोलकर (संगीत दिग्दर्शन), २०१८ चे मानकरी- विनायक देसाई, नारायण नाईक, केशव कामत, रामानंद जोशी, रघुवीर सावर्डेकर, मंगला जांभळे (अभिनय) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
जागतिक रंगभूमी दिन रंगसन्मान – २०१७ पुरस्कारांचे मानकरी गौरी कामत, राजीव हेदे, ज्योती कुंकळकर (अभिनय), प्रसाद गुरव व ज्ञानेश मोघे (अभिनय व दिग्दर्शन), एकनाथ नाईक मंगेशकर (रंगभूषा), २०१८ चे मानकरी राजेश पेडणेकर, सम्राज्ञी मराठे, रघुनाथ साकोर्डेकर, दिगंबर परब (अभिनय), प्रशांत म्हार्दोळकर (अभिनय, दिग्दर्शन, नाट्यलेखन) व जीवन मयेकर (अभिनय व दिग्दर्शन) यांना मान्यवरांहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
अनुवादित नाट्यसंहितेला
यंदापासून पारितोषिक
यंदाच्या वर्षीपासून अकादमीच्या नाट्य स्पर्धांत उत्कृष्ट अनुवादित नाट्य संहितेला विशेष पारितोषिक देण्यात येईल अशीही घोषणा मंत्री गोविंद गावडे यांनी यावेळी केली.
दुर्मिळ फोटो, मॉडेल्स
अकादमीला देईन : बाबा पार्सेकर
बाबा पार्सेकर यांनी आपल्याकडे रंगभूमीशी संबंधित दिग्गज कलाकारांचे फोटो, नेपथ्याचे मॉडेल्स असा लाखाच्या घरात संच आहे. त्याचा योग्य उपयोग व्हावा म्हणून कला अकादमीने तो स्वीकारावा असा प्रस्ताव अकादमीसमोर ठेवला.