पुन्हा एकदा आपली अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या सरचिटणीसपदी वर्णी लागलेली असली व आपणावर ईशान्येकडील राज्यांचे प्रभारीपद सोपवण्यात आले असले तरी मागच्या वेळच्याप्रमाणे आपण यावेळी नवी दिल्लीत राहणार नाही. गोव्यात राहूनच ही जबाबदारी सांभाळणार आहे, अशी माहिती नावेली मतदारसंघाचे आमदार लुईझिन फालेरो यांनी काल दिली.
मागच्या वेळी एआय्सीसीचे सरचिटणीस असताना आपण नवी दिल्लीत राहत होतो. त्यावेळी आपण आमदारही नव्हतो. मात्र, आपण दर शुक्रवारी गोव्यात यायचो व सोमवारी परत जायचो असे फालेरो यांनी काल ह्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. त्यावेळीही आपणावर ईशान्येकडील राज्यांची जबाबदारी होती आणि तेव्हा झालेल्या निवडणुकीत ईशान्येकडील राज्यांत कॉंग्रेस पक्षाचा विजय झाला होता, असे फालेरो म्हणाले. आता परत एकदा आपणावर ती जबाबदारी येऊन पडली असल्याचे सांगून एक सच्चा कॉंग्रेसजन ह्या नात्याने आपण ती स्वीकारली असल्याचे ते म्हणाले.