खराब हवामानाचा मासेमारीला फटका

0
130

राज्यातील मासेमारीला सुरुवात होऊन वीस दिवसांचा कालावधी उलटला तरी वादळामुळे समुद्र खवळलेला असल्याने बहुतांश मासेमारी ट्रॉलर्स मासेमारीसाठी समुद्रात गेलेले नाहीत. मोठ्या प्रमाणात ट्रॉलर्स जेटीवर नांगरलेले दिसून येत आहेत. आता, नारळी पौर्णिमेनंतर मासेमारी ट्रॉलर्स मासेमारीसाठी समुद्रात जातील, अशी शक्यता मच्छीमारी क्षेत्रातील व्यावसायिक हर्षद धोंड यांनी काल व्यक्त केली.
राज्यातील मासेमारीला १५ ऑगस्टनंतर खर्‍या अर्थाने प्रारंभ होतो. परंतु, गेल्या काही दिवसांपासून समुद्रातील वादळी वार्‍यामुळे मच्छीमारी ट्रॉलर्स समुद्रात गेलेले नाहीत. पावसाळ्यातील दोन महिन्यांच्या बंदीनंतर राज्यातील मासेमारीला १ ऑगस्टपासून सुरुवात होते.

मासळी आयात घटली
मागील आठ दिवसांपासून परराज्यांतून येणार्‍या मासळीच्या प्रमाणात घट झाली आहे. केरळ, कर्नाटक आदी भागातील वादळाचा मच्छीमारीवर परिणाम झाला आहे. २२ ऑगस्ट रोजी सकाळपर्यंत पोळे तपासणी नाक्यावर ३५ आणि पत्रादेवी तपासणी नाक्यावर १७ वाहनांतील मासळीची तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल पत्रकारांना पाठविलेल्या संदेशाद्वारे दिली. राज्यात ४ ऑगस्टपासून परराज्यांतून सुमारे १३२९ ट्रक मासळी आणण्यात आली आहे.