कुजिरा शैक्षणिक संकुलाच्या विकासासाठी १४ कोटी खर्चणार

0
101

>> पार्किंग, वाहतूक, पाणी समस्या सुटणार

>> जीएसआयडीसीतर्फे निविदा जारी

बांबोळी येथील कुजिरा शैक्षणिक संकुलाचा अंदाजे १४.०८ कोटी रुपये खर्चून विकास केला जाणार आहे. साधनसुविधा महामंडळातर्फे हे काम हाती घेण्यात येणार आहे. या नवीन आराखड्यामुळे कुजिरा शैक्षणिक संकुलाचा कायापालट होणार आहे.
गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाने कुजिरा शैक्षणिक संकुलाच्या विकासासाठी काल निविदा जारी केली आहे.

कुजिरा शैक्षणिक संकुलात योग्य साधनसुविधा उपलब्ध नसल्याने गैरसोय होत आहे. पार्किंग, वाहतूक या प्रमुख समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पणजी शहरात शैक्षणिक संस्थांमुळे होणारी वाहतूक व इतर समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकारने कुजिरा, बांबोळी येथे शैक्षणिक संकुल सुरू करण्याचा निर्णय घेतला. पणजी शहरातील शैक्षणिक संस्थांना कुजिरा येथे भूखंड उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

शहरातील भूखंड दिलेल्या अनेक खासगी शैक्षणिक संस्थांनी कुजिरा येथे नवीन इमारती उभारून तेथे वर्ग घेण्यास प्रारंभ केला आहे. कुजिरा शैक्षणिक संकुलात आवश्यक पार्किंग, वाहतूक, पाणीपुरवठा आदींची सोय नसल्याने त्रास सहन करावे लागत आहेत.

गोवा साधनसुविधा विकास महामंडळाने कुजिरा शैक्षणिक संकुलातील समस्या सोडविण्यासाठी एक विकास आराखडा तयार केला आहे. या विकास आराखड्याचे काही महिन्यांपूर्वी सादरीकरण करण्यात आले होते. या आराखड्यानुसार कुजिरा शैक्षणिक संकुलात आवश्यक साधनसुविधा उभारण्यात येणार आहेत.
क्रीडा प्राधिकरणाच्या जागेचा विकास करून तेथे पार्किंगची सोय केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना आपल्या शैक्षणिक संस्थांत जाण्यासाठी खास पदपथाची सोय केली जाणार आहे. मोकळ्या जागेत पालकांना बसण्यासाठी आणि मुलांना खेळण्यासाठी जागा विकसित केली जाणार आहे. तसेच संकुलातील नाल्याचाही विकास केला जाणार आहे.