रितुपर्णा, सौरभ उपांत्यपूर्व फेरीत

0
85

रशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील गुरुवारचा दिवसही भारतासाठी यशपूर्ण ठरला. रितुपर्णा दास, मिथुन मंजुनाथसह एकूण पाच भारतीयांनी एकेरीतून आगेकूच करताना उपांत्यपूर्व फेरीत काल प्रवेश केला.

महिला एकेरीत रितुपर्णाने सर्वांत सनसनाटी निकालाची नोंद करताना द्वितीय मानांकित मलेशियाच्या यिंग यिंग ली हिला १३-२१, २१-१७, २१-१९ असे पराभूत केले. जागतिक क्रमवारीत ली ३८व्या तर रितुपर्णा १३२व्या स्थानी आहे. वृशाली गुम्माडीने केवळ २४ मिनिटांत कोरियाच्या ब्योल लिम ली हिचा खेळ खल्लास करताना २१-११, २१-१३ असा विजय प्राप्त केला. सातव्या मानांकित मुग्धा आग्रे हिला मात्र तिसर्‍या फेरीत गाशा गुंडाळावा लागला. तिला अमेरिकेच्या इरिस वांग हिने २१-४, २१-१३ असे पराजित केले. पुरुष एकेरीत मिथुन मंजुनाथने जपानच्या कोजी नायटो या नवख्या प्रतिस्पर्ध्याला २१-१६, २१-१३ अशी धूळ चारली. पाचव्या मानांकित शुभंकर डे याने आपलाच देशबंधू सिद्धार्थ प्रताप सिंग याला २१-११, २१-१९ असा परतीचा रस्ता दाखविला. आठव्या मानांकित सौरभ वर्माने रशियाच्या सर्जेई सिरांत याला एकतर्फी लढतीत २१-११, २१-९ असे अस्मान दाखविले. उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना इस्रायलच्या मिश्‍चा झिल्बरमन याच्याशी होणार आहे.

दुहेरीतील भारताच्या तिन्ही जोड्यांनी काल विजयाला गवसणी घातली. अरुण जॉर्ज व सन्यम शुक्ला यांनी कॅनडाच्या जेफ्री लाम व इंग्लंडच्या हिन शुन वांग यांना २१-१२, २१-१३ असे हरविले. मिश्र दुहेरीत द्वितीय मानांकित कुहू गर्ग व रोहन कपूर यांनी आलेक्सी पानोव व पोलिना माकोविना या रशियन जोडीला केवळ १९ मिनिटांत २१-१०, २१-१४ असा दणका दिला. सौरभ शर्मा व अनुष्का पारिख या तिसर्‍या मानांकित जोडीलादेखील अधिक घाम गाळावा लागला नाही. त्यांनी आर्टेम सेर्पियोनोव व अनास्तासिया पुस्तिनस्काया यांना २१-६, २१-१२ असे पराभूत केले.