राशिद, मोईन कसोटी संघात

0
102

>> पहिल्या सामन्यासाठी इंग्लंड संघ जाहीर

भारताविरुद्धच्या एजबेस्टन येथे १ ऑगस्टपासून होणार्‍या पहिल्या कसोटीसाठी लेगस्पिनर आदिल राशिद व ऑफ ब्रेक गोलंदाज मोईन अली यांना १३ सदस्यीय इंग्लंड संघात स्थान देण्यात आले आहे. इसेक्सचा वेगवान गोलंदाज जेमी पोर्टर याला प्रथमच निवडण्यात आले आहे.

ऍशेस मालिकेतील खराब कामगिरीमुळे मोईन अली याला वगळण्यात आले होते तर राशिदने यॉर्कशायरशी केवळ मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी करार केल्याने या द्वयीची निवड चर्चेचा विषय ठरत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणार्‍या जॅक लिच, डॉम बेस या फिरकीपटूंकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष एड स्मिथ यांनी या द्वयींच्या निवडीचे समर्थन करताना ऑस्ट्रेलिया व भारताविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या सामन्यांतील कामगिरीच्या जोरावर या दुकलीची निवड केल्याचे स्पष्ट केले आहे. आयपीएलमधील कामगिरीच्या आधारे जोस बटलर याची कसोटी संघात केलेली निवड यशस्वी ठरल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यॉर्कशायर क्रिकेटचे संचालक मार्टिन मॉक्सन यांनी ईसीबी व स्मिथ यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. काऊंटीत एकही ‘रेड बॉल’ सामना न खेळताना रशीदला निवडल्याबद्दल यॉर्कशायरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क आर्थर यांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे. इंग्लंड लायन्स संघातील खेळाडू पोर्टर याला मात्र सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ मिळाले आहे. इसेक्सला २०१७च्या मोसमात विजेतेपद मिळवून देताना ७५ बळी घेतल्यामुळे ख्रिस वोक्सऐवजी त्याला पसंती देण्यात आली आहे.
इंग्लंड संघ ः ज्यो रुट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बॅअरस्टोव, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, ऍलिस्टर कूक, सॅम करन, किटन जेनिंग्स, डेव्हिड मलान, जेमी पोर्टर, आदिल रशीद व बेन स्टोक्स.