Home बातम्या गोल छिद्रं अन् चौकोनी खुंट्या..

गोल छिद्रं अन् चौकोनी खुंट्या..

0

– प्रा. रमेश सप्रे

मराठीत एक मजेदार म्हण आहे, ‘आग रामेश्‍वरी, बंब सोमेश्‍वरी.’

पूर्वीच्या एका विनोदी हिंदी चित्रपटात एक गाणं होतं, ‘जाते ये जापान, पहुँच गये चीन, समझ गये ना?’

इंग्रजीत एक सुंदर शब्दप्रयोग आहे, ‘स्क्वेअर् पेग्ज इन राउंड होल्स’(म्हणजे गोल छिद्रात चौकोनी खुंट्या)!’

या सार्‍याचा तसा आजच्या विषयाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध आहे. एकूण अर्थ काय तर समस्या एका ठिकाणी, पण त्याचं उत्तर शोधायचं दुसर्‍या ठिकाणी. किंवा क्षमता (ऍबिलिटी) एका प्रकारची आणि संधी शोधायची दुसर्‍या प्रकारची. यामुळे होतं काय की आपण भलत्याच ठिकाणी पोचतो. नको ते करत राहतो. नको ते शिकत राहतो …यातून निर्माण होतात ताण – निराशा अन् वैफल्य!

सारं चुकल्याचुकल्यासारखं वाटतं.. यातून मार्ग काय याचा विचार सुरू होतो… कधी कधी खूप उशीर झालेला असतो.. पण अनेकांच्या जीवनात असं घडतं मात्र खरं..

आपण विचार करणार आहोत मुलांनी उच्च शिक्षणासाठी निवडायच्या शाखेबद्दल. दहावी – बारावीचे निकाल तर लागले. तसे खूप चांगले लागले. गेली काही वर्षे निकालाची टक्केवारी वाढतेय. त्यामुळे अनेकांसमोर शैक्षणिक संस्थातले प्रवेश सोडाच पण पुढच्या शिक्षणाच्या ‘कोर्स’ची निवड अवघड होऊन बसलीय; आणि चुकीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वाढलीय.

प्रूचंच बघा ना. (मूळ नाव प्रिया..तिचं लाडकं रूप प्रियू..पण मैत्रिणी म्हणतात प्रू! असो.) शाळेत असल्यापासून तिच्या ‘अंगी नाना कळा’ दिसून आल्या. शाळेत कोणतीही स्पर्धा असो, प्रूचा सहभाग ठरलेला नि पारितोषिकही ठरलेलं. क्रीडा, चित्रकला, संगीत, अभिनय, वक्तृत्व, हस्तव्यवसाय सर्वच क्षेत्रात तिला चांगली गती होती. सर्वांना ती आवडायची. अखंड उत्साहात, उमेदीत तिचं शालेय जीवन सुरू होतं. प्रू म्हणजे मूर्तिमंत ऊर्जा (शक्ती)! अशीच तिची प्रतिमा निर्माण झाली होती. अभ्यासातही ती हुशार होती. एस्‌एस्‌सी परीक्षेत चांगले गुण मिळाले म्हणजे ऐंशी टक्क्याहून अधिक. साहजिकच चर्चा सुरू झाली – पुढे कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा? आजपर्यंतची तिची वाटचाल नैसर्गिकपणे सुचवत होती की तिनं कला शाखेत (आटर्‌‌स) प्रवेश घ्यावा. तिच्या अंगच्या कलागुणांचा, वाङ्‌मयाच्या आवडीचा (हो, तिला खूप आवड होती वाचनाची. ती कविता करायची नि छोट्या छोट्या गोष्टीही लिहायची.) विचार करता तिनं कला शाखा निवडावी हे योग्य होतं. पण जास्त गुण पडल्यामुळे आई वडलांच्या अपेक्षा, इतरांच्या सूचना वाढल्या अन् ती विज्ञान शाखेत केव्हा जाऊन पोचली हे तिचं तिलाही कळलं नाही. तसा तिनंही विज्ञानशाखेत जाताना फारसा विरोध केला नाही. भावी करिअरची स्वप्नं तीही पाहू लागली…

.. हे सारं वाचताना तुमच्या मनात शंका नाही ना डोकावली की हे सारं ‘अशी होती .. तशी होती’ असं भूतकाळात लिहिलंय.. म्हणजे प्रूचं काही बरंवाईट तर झालं नाही ना? ..अगदी तसंच नाही कारण बारावीनंतर ती इंजिनिअरिंगला (अभियांत्रिकी) गेली .. अगदी सर्वांना हव्या असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स ह्या शाखेत प्रवेशही मिळवला…पण अगदी खरं सांगायचं तर शाळेतली ती हसरी, खेळती, उत्साहमूर्ती प्रू काळाच्या ओघात कुठं वाहून गेली याचा पत्ताही लागला नाही. विज्ञानशाखेतली ती निरनिराळ्या विषयांवरची व्याख्यानं, ती प्रॅक्टिकल्स नि ती जर्नल्स यांच्या चरकात पिळवटून – पिचून गेली. निःसत्त्व, निस्तेज दिसू लागली. आता तर हळूहळू तिच्या बोलण्यातही चुकीची शाखा (विज्ञान) निवडल्याबद्दलची खंत दिसून येते. म्हणजे तशी ती अभ्यास करते पण मनाविरुद्ध .. भावी आयुष्याबद्दल फार सकारात्मक (पॉझिटिव्ह) रीतीनं बोलत नाही. आता तर कधी कधी कोर्स पुरा झाल्यावर ती इंजिनिअर म्हणून नोकरी – ते यंत्रांबरोबरचं जीवन या सार्‍याच्या कल्पनेनंच तिच्या अंगावर काटा उभा राहतो.

अशा अनेक ‘प्रू’ अवतीभवती जगत असतात. मन मारून जगत असतात! इथं एक मोठी चूक झाली ती म्हणजे शालेय जीवनातील कामगिरी व मनाचा कल लक्षात न घेता; पुढच्या शाखेच्या योग्य निवडीसाठी त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन न घेता निर्णय घेतला गेला. तो चांगल्या हेतूनंच नि योग्य विचारानंच घेतला होता. मग चूक कुठे झाली? या निर्णयासाठी जो आधार होता – एस्‌एस्‌सी चे गुण – तोच फसवा होता. चुकीचा होता.

खरोखर एस्.एस्.सी. चे गुण, टक्केवारी, श्रेणी (ग्रेड) काहीही असो ती अत्यंत निसरडी व बेभरवशाची असते. फक्त या गुणांचा विचार करून घेतलेले निर्णय खूपदा चुकीचे ठरतात. यासाठी घ्यायला पाहिजे उच्च शिक्षण, भावी कोर्स व करिअर यासंबंधीचं मार्गदर्शन व समुपदेशन (गाइडन्स व कौन्सेलिंग).

याउलट तेजसची कहाणी बघा. ती एक यशाची कहाणी (सक्सेस स्टोरी) आहे. शाळेत असल्यापासून त्याचं एक वेगळंच स्वप्न होतं. हिंदी चित्रपटक्षेत्रात शिरण्याचं. पण नट किंवा खलनायक म्हणून नव्हे. दिग्दर्शक किंवा संगीतकार म्हणूनही नव्हे तर पटकथा लेखक (स्क्रिप्ट राइटर) म्हणून. पुढे प्रगती करून अगदी हॉलिवूडच्या एखाद्या चित्रपटासाठी कथा – संवाद लिहिण्याचं त्याचं स्वप्न होतं. शाळेत असताना कोणत्याही दोन सजीव – निर्जीव व्यक्ती वा वस्तूंमध्ये प्रभावी संवाद तो लिहीत असे.

‘कहाणी दोन पानांची’ नि ‘कथा दोन ढगांची’ हे त्याचे संवाद खूप गाजले. एक हिरवं पिंपळाचं पान. मोठ्या वृक्षाला चिकटून असलेलं. मोठा देठ व लांब टोक असलेलं ते पान वार्‍यानं सळसळायचं तेव्हा जागच्या जागी पंख फडफडवत उडणार्‍या पक्षासारखं दिमाखदार दिसायचं. तर दुसरं पिवळं पान त्याच झाडाचं पण झाडापासून निखळलेलं. वार्‍यावर तरंगणारं. इकडे तिकडे झेपावणारं. अशा दोन पानातला संवाद तेजसनं अप्रतिम लिहिला होता. हिरव्या पानाला आधार होता पण स्वातंत्र्य नव्हतं. तर पिकलेल्या पिवळ्या पानाला मुक्त संचाराचं स्वातंत्र्य होतं. पण ते काहीसं निराधार होतं.

ही दोन पानं प्रतीकं होती वृक्षरूप आईवडील, शिक्षक आणि मुलं-विद्यार्थी, त्यांना द्यावयाच्या स्वातंत्र्याची, आधाराची नि त्यांच्यावर घडवायच्या संस्कारांची. विशेष म्हणजे हे रूपक छान उलगडून दाखवलं होतं तेजसनं संवादापूर्वीच्या प्रास्ताविक परिच्छेदात. तसेच ते दोन ढग..एक चमकदार पांढरा पण जलहीन, काहीसा वांझोटा .. तर दुसरा कुरूप काळा पण मोठा जलकुंभच जणू! स्वतः संपून पृथ्वीला सुजलाम् सुफलाम् करणारा. त्यांच्यातला संवाद एक सुंदर रूपक म्हणून शाळेच्या स्नेहसंमेलनात सादर केला तेव्हा प्रेक्षक-श्रोत्यांनी त्याला डोक्यावर घेतलं.

एस्.एस्.सी.ला खूप छान गुण मिळवले तेजसनं. पण कलाशाखेत जाण्याचा त्याच्या निर्णयाला तो घट्ट धरून राहिला. आईवडलांनी आग्रह करून पाहिला. पण नंतर एका समुपदेशन केंद्रातील अभिक्षमता कसोटीच्या (ऍप्टिट्यूड टेस्ट) आधारे नि त्या क्षेत्रातील जाणकारांच्या सल्ल्यानं त्याला गोव्यातील एका कला शाखेच्या चांगल्या उच्च माध्यमिक विद्यालयात घातलं. पण खरी कथा नि व्यथा इथंच तर सुरू झाली. कोणती कथा?

तेजसबरोबर जी मुलं कला शाखेत शिकत होती ती अत्यंत सामान्य कामगिरी केलेली होती. कारण प्रवाहच तसा आहे… भरपूर गुण म्हणजे विज्ञान शाखा. साधारण गुण – वाणिज्य शाखा आणि अगदी पोटापुरते किंवा थोडे जास्त गुण म्हणजे कला शाखा… याला काही अपवाद जरूर असतात. पण ते अपवादच! चर्चा करावी, स्पर्धा करावी, परस्परांच्या लेखनाचं रसग्रहण करावं, एकमेकाच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी असं कोणीही आजूबाजूला आढळलं नाही. ‘नकोच ते शिक्षण’ या विचारापर्यंत आलेल्या निराश तेजसला सुचवलं गेलं, ‘मुंबईला का नाही जात?’..या वेळेपर्यंत जुलै महिना सुरू झाला होता. वाटलं एवढे गुण आहेत. सहज मिळेल प्रवेश कलाशाखेसाठी! मुंबईच्या पण काही चांगल्या महाविद्यालयात शेवटचा कलाशाखेचा प्रवेश पंच्याऐंशी टक्क्यांएवढा वरचा होता. शेवटी ओळखीनं प्रवेश मिळवला नि सर्वार्थानं बहरू लागला आपला तेजस! वाङ्‌मय मंडळ, लेखक-कविंच्या भेटी, मान्यवरांच्या (सेलेब्रिटीज) मुलाखती, आकाशवाणी – दूरचित्रवाणी कार्यक्रम, वृत्तपत्रं व इतर माध्यमातून संधी … तेजस अगदी रमून गेला. रंगून गेला. उदास तेजस उत्साही बनला…त्याचं लेखनही प्रकाशित होऊ लागलं. एकंदरीत मजेत होती स्वारी!

परवा भेटला तेव्हा म्हणाला सहाय्यक दिग्दर्शक व संवाद लेखक म्हणून संधी मिळालीय. एक हटके (ऑफ्‌बीट) कथाबीज मनात आहे. ते खुलवण्याचं, फुलवण्याचं काम सुरू आहे. खूप बरं वाटलं.. तेजसला नवव्या ढगावर (नाइन्थ क्लाउड) पाहून! अत्यंत आनंदात पाहून!

आपण दोन उदाहरणं पाहिली. प्रूचं नि तेजसचं! तशी प्रातिनिधिक उदाहरणं. आजूबाजूला दिसणारी. अनेक घरात सापडणारी. प्रूच्या आईवडलांचं फारसं चुकलं नाही. पण तेजसच्या आईवडलांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचं धाडस व सुज्ञपणा दाखवला. एक म्हणजे त्याला कलाशाखेत घातलं आणि प्रयत्न करून त्याचं महाविद्यालय बदललं. त्याला तळ्यातून महासागरात पोचवलं.

कोणता बोध घ्यायचा यापासून?

0 आपल्या मुलांचा कल लहानपणापासूनच लक्षात घ्यायला हवा. यासाठी त्यांना नियोजित पद्धतीनं शाळा, इतर संस्था यांच्या सहकार्यानं विविध संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात.

0 शिक्षक व पालक एकत्र येऊन त्यांनी मुलांच्या भवितव्याचा विचार अधिक जागरूकतेनं व सक्रियतेनं करायला हवा. पालक – शिक्षक संघाच्या माध्यमातून या दृष्टीनं अत्यंत प्रभावी समुपदेशनाची योजना राबवता येईल.

0 मुलांची बुद्धी, भावनिक स्थिरता (इमोशनल स्टॅबिलिटी), सामाजिक जाणीव व क्षमता (सोशल कॉन्शसनेस व ऍबिलिटी) यावर आधारित कसोट्या व निरनिराळ्या साधनांद्वारे परीक्षा करणं आवश्यक आहे. विशेषतः आठवीनंतरच्या मुलांसाठी व उच्चमाध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी अशी सोय संस्थेनंच करणं आवश्यक आहे. काही संस्था एकत्र येऊन असा प्रयोग करू शकतील. महिन्यातून एक मार्गदर्शनपर व्याख्यान करिअर तज्ज्ञांकडून झालं तर छान होईल.

0 ‘आतली हाक (इनर कॉल)’ ऐकायला शिकवून मुलांना व्होकेशनल गाइडन्स दिल्यास एकूण समाजाचं चित्र वेगळं दिसेल. सध्या व्यवसायाची क्षेत्रं व संधी याबद्दलच माहिती दिली व मिळवली जाते. त्याऐवजी समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून मुलांच्या अभिक्षमतांचा वेध घेणं आवश्यक आहे.

0 सरकारनंही याविषयी निश्‍चित धोरण व नियोजन (पॉलिसी अँड प्लॅनिंग) केलं पाहिजे. मुलांच्या पुढील जीवनाचीच नव्हे तर राष्ट्राची उभारणी या तरुणोदय काळातील मार्गदर्शनानं होऊ शकेल.

0 आवडेल ते मिळेल असं नाही, म्हणून मिळेल ते आवडलं पाहिजे. हे खरं असलं तरी योग्य अनुकूल असेल ते मिळवून देण्याचा प्रयत्न वडील मंडळींनी का करू नये?

0 शिक्षकांचं नि निवडक पालकांचं योग्य ते उद्बोधन (ओरिएंटेशन) करून, त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देऊन त्यांच्यातूनच ‘अनवाणी (सामान्य) समुपदेशक (बेअरफुट कौन्सेलर्स)’ तयार करणं चांगलं नाही का? म्हणजे प्रत्येक शाळात पुरेसे समुपदेशक मिळून प्रत्येक मुलाच्या जीवनाला योग्य दिशा व मार्ग मिळू शकेल.

… असं झालं तर आगीचा बंब रामेश्‍वरलाच (आगीच्या ठिकाणी) जाईल. आपली युवा मंडळी जपानलाच (योग्य मुक्कामी) पोचतील नि गोल छिद्रात गोल खुंट्याच घट्ट नि िफिट्टं बसतील, हो ना?