Home बातम्या ‘गोव्यातून निर्यात वाढविण्यास वाव’

‘गोव्यातून निर्यात वाढविण्यास वाव’

0

गोव्यातून होणारी निर्यात ही अत्यंत निराशाजनक असून एकूण राष्ट्रीय निर्यातीपैकी गोव्याची निर्यात ही फक्त ०.७ टक्के एवढी आहे. येणार्‍या काळात गोव्याला किमान २ टक्के एवढ्या निर्यातीचे उद्दिष्ट गाठायचे झाल्यास त्यासाठी गोवा सरकारला आपले निर्यात उत्तेजन धोरण आखावे लागेल, असे भारतीय निर्यात महासंघाचे अध्यक्ष रफिक अहमद यांनी काल कांसावली येथील पंचतारांकित हॉटेलात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून बोलताना सांगितले.

येऊ घातलेल्या काळात जर गोव्याला २ टक्के निर्यातीचे उद्दिष्ट गाठायचे असेल तर त्यासाठी आवश्यक ती साधनसुविधा गोवा सरकारला उभारावी लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात शीतगृहे, अन्नप्रक्रिया युनिट्‌स, पॅकेनिंग सुविधा, वाहतूक सुविधा उभारण्यावर लक्ष केंद्रित करावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गोव्यातून फेणी, काजू, आंबा, फणस, केळी व हस्तकला यांची निर्यात वाढवण्यास फार मोठा वाव असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. राज्यातून होणारी लोहखनिज निर्यात घटल्याने गोव्याच्या निर्यातीवर अनिष्ट परिणाम झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गोवा सरकारने निर्यात उत्तेजन धोरण तयार करावे यासाठी महासंघ गोवा सरकारशी बोलणी करणार असल्याचेही यावेळी रफिक अहमद यांनी सांगितले. पर्यटन हा गोव्याचा कणा असून गोव्याने शेती व क्रीडा पर्यटनाला वाव देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. भारताच्या निर्यातीत आपला वाटा २ टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट येत्या ५ वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष सरकारने ठेवायला हवे. काजूगर, आंबा, केळी, फणस, अननस, भाजी व हस्तकला यांच्या निर्यातीत उत्तेजन देण्यासाठी भारतीय निर्यात महासंघ निर्यात उत्तेजन धोरण तयार करण्यास गोवा सरकारला आवश्यक ती मदत करण्यास तयार असल्याचे ते म्हणाले. भारताने २०११-१२ या आर्थिक वर्षासाठी ३०० अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या निर्यातीचे जे उद्दिष्ट ठेवले होते ते पूर्ण केले असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, २०१३-१४ या वर्षासाठी जे ५०० अब्ज अमेरिकी डॉलर्सचे उद्दिष्ट ठेवले आहे ते गाठण्यासाठी निर्यातीत ३१ टक्के एवढी वाढ गाठावी लागणार असून जागतिक व्यापारात असलेली मंदी, युरो झोनमधील आर्थिक संकट तसेच मध्य पूर्वेतील अनिश्‍चितता या पार्श्‍वभूमीवर ते उद्दिष्ट गाठणे हे निश्‍चितच सोपे नसेल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

निर्यातीचे हे उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्यानाही महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार असल्याचे ते म्हणाले. निर्यात क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करीत असते असे सांगून अतिरिक्त १० अब्ज अमेरिकी डॉलर्स एवढी निर्यात वाढण्यात १० लाख लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो, अशी माहितीही त्यांनी दिली. भारतीय निर्यात महासंघाच्या गोव्यात झालेल्या परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.