कोस्टाने पुन्हा स्पेनला तारले

0
103

डिएगो कोस्टाने दुसर्‍या सत्रात नोंदविलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर स्पेनने इराणचे आव्हान १-० असे मोडित काढत विश्चचषक फुटबॉल स्पर्धेतील आपल्या पहिल्या विजयासह ब गटात ४ गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

आपल्या सलामीच्या सामन्यात स्पेनला पोर्तुगालविरुद्ध ३-३ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. ३-२ असे आघाडीवर असताना अंतिम क्षणात स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियाने रोनाल्डोने फ्री-कीकवर गोल नोंदविल्या सामना ३-३ असा बरोबरीत सुटला होता. त्यामुळे गुणतक्त्यात स्पेन पोर्तुगाल आणि इराण पाठोपाठ तिसर्‍या स्थानी होती व आजच्या सामन्यात त्यांना विजयाची अत्यंत आवश्यकता होती.

पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत राहिले. या सत्रात दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला होता. परंतु दोघांना गोलकोंडी सोडविण्यात अपयश आले होते. आपल्या सामन्यात मोरोक्कोवर मात केलेल्या इराणने या स्पेनच्या तोडीसतोड खेळ केला. कझान स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात इराणने स्पेनला चांगली टक्कर दिली. त्यांनी काही धोकादायक चाली रचत गोल करण्याच्या संधीही निर्माण केल्या होत्या. परंतु स्पेनच्या बचावफळी व गोलरक्षकाने त्या हाणून पाडल्या.

दुसर्‍या सत्रात ५४व्या मिनिटाला स्पेनने आपले खाते खोलले. चेंडू क्लियर करण्याच्या प्रयत्नात इराणच्या खेळाडूने घेतलेला फटका स्पेनच्या डिएगो कोस्टाच्या पायावर आदळून गोलपोस्टमध्ये जाऊन विसावला. इराणच्या गोलरक्षकोने उजवीकडे झेपावर गोल रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचे प्रयत्न अपुरे पडले. कोस्टाचा हा या स्पर्धेतील हा तिसरा गोल ठरला आहे.

इराणनेही एक गोल मारला होता. परंतु ऑफसाइडमुळे रेफ्रीने व्हिडीओ सहाय्यय रेफ्रीने तो बाद ठरविला. ३ गुणांसह तिसर्‍या स्थानी असलेल्या इराणचा पुढील महत्त्वाचा सामना आता सोमवार २५ रोजी बलाढ्य पोर्तुगाल संघाशी होणार आहे. तर त्याच दिवशी स्पेनची लढत लढवय्या मोरोक्को संघाची पडणार आहे.