पंतप्रधानपदाची उमेदवारी खुली ठेवण्याचा प्रयत्न

0
117
  • ल. त्र्यं. जोशी (नागपूर)

विरोधी आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचे नाव निवडणुकीआधी जाहीर होणार नाही यासाठी पवारसाहेब पुरेपूर प्रयत्न करतील. त्याची सुरुवात त्यांनी पुण्यातून केली आहे. कॉंग्रेसेतर विरोधकांना किती जागा मिळतात हे उघड झाल्यानंतर ते आपले नाव समोर आणण्याच्या हालचाली सुरु करतील.

गेल्या आठवड्यामध्ये ‘पवारांचे पंतप्रधानपदः इजा, बिजा, तिजा’ हा माझा लेख नवप्रभेच्या याच पानावर प्रसिद्ध झाला होता. पंतप्रधानपद त्यांना हुलकावणीच देत आले आहे, पण म्हणून त्यांनी त्या पदाची आकांक्षा सोडली आहे असे म्हणता येणार नाही. जाहीरपणे ते काहीही म्हणत असले तरीही. कारण त्यांना हे पक्के ठाऊक आहे की, नियती ते पद कुणाला, केव्हा देईल याचा अजिबात भरवसा नाही, असे मी त्यात म्हटले होते.

आता शरद पवार यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदासाठी स्वतःची दावेदारी मांडण्याची संधी प्राप्त होण्याची शक्यता निर्माण होत आहे, कारण भाजपाविरोधी संभाव्य आघाडीत पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवर अनेकांचा डोळा असला तरी पंतप्रधान बनण्याची क्षमता मात्र शरद पवार यांच्यामध्येच आहे. त्यांच्याजवळ राजकारण कौशल्य आहे, लोकसंग्राहक वृत्ती आहे, प्रशासकीय कौशल्य आहे आणि प्रदीर्घ अनुभवही आहे. त्यांची अडचण एकच आहे व ती म्हणजे त्यांच्या मागे असलेले खासदारांचे अल्प बळ. पण ते आपले नाव आताच पुढे करणार नाहीत. त्याबरोबरच कुणाचेही नाव पुढे केले जाणार नाही याचीही ते काळजी घेतील. त्याचे सूतोवाच त्यांनी मागील रविवारी पुणे येथे झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापनदिन समारंभातच केले.

ते म्हणाले ‘मोदींच्या पर्यायाचे उत्तर आताच शोधण्याचे कारण नाही. १९७७ मध्ये जनता पक्षाने कुठे आपल्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची घोषणा केली होती? ती निवड निकालांनंतर झाली. तसेच यावेळीही करता येईल.’ पण त्यांचा हा विचार इतर विरोधी पक्षांना कितपत मान्य होईल हा प्रश्नच आहे, कारण कॉंग्रेस वगळता इतर कोणत्याही पक्षाला राहुल गांधींची उमेदवारी मान्य होऊ शकत नाही. त्यातही डाव्या पक्षांनी अप्रत्यक्षपणे मायावतींच्या उमेदवारीबद्दल पसंती दर्शविली असावी असा संकेत मिळतो, कारण रविवारी टाइम्स ऑफ इंडियामध्ये डाव्या विचारांच्या पत्रकार सागरिका घोष यांनी लेख लिहून ‘मोदीविरोधी आघाडीसाठी मायावती हा सर्वोत्तम पर्याय असल्याचा निर्वाळा दिला आहे व त्याची कारणेही सांगितली आहेत. पण कॉंग्रेस सहजासहजी राहुल गांधींचे नाव मागे घेईल अशी शक्यता दिसत नाही, कारण भाजपानंतर कॉंग्रेस पक्षच सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर येण्याची शक्यता अधिक आहे व त्या स्थितीत आपणच पंतप्रधानपदाचे दावेदार राहू हे लक्षात घेऊन कर्नाटकातील प्रचार काळात राहुल गांधींनी आपली उमेदवारी जवळपास जाहीरच करुन टाकली आहे. आता विरोधी पक्षांच्या संयुक्त उमेदवारीतून त्यांना आपले नाव मागे घेणे अवघड जाणार आहे.

२०१४ च्या निवडणुा्रकीत कॉंग्रेसला मिळालेल्या जागा आणि ममतांना मिळालेल्या जागा यात खूपच कमी अंतर होते. पण त्या स्थितीतही त्यांनीच काय पण राष्ट्रवादीसह इतर पक्षांनी कॉंग्रेससोबत आघाडी केली नाही व तिला अधिकृतपणे विरोधी पक्षाचा दर्जाही मिळू दिला नाही. ते विरोधी पक्ष आता राहुल गांधींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला आतापासून पाठिंबा देतील याची शक्यता नाही. मायावतींसारखीच स्थिती ममता बॅनर्जी वा अखिलेश यादव यांचीही राहणार असल्याने तेही मायावतींच्या उमेदवारीला पाठिंबा देतील याची शक्यता वाटत नाही. त्यामुळे पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचा प्रश्न खुला ठेवण्याचाच कॉंग्रेसेतर विरोधी पक्षांचा प्रयत्न राहील. अडचण फक्त एकच आहे की, सर्व विरोधी पक्ष मोदींना हटविण्यासाठी इतके उत्सुक आहेत की, त्यासाठी ते काहीही करू शकतील.
खरे तर बंगरुळुमध्ये विरोधी ऐक्याचे प्रदर्शन करण्यात आले असले तरी विरोधी पक्षांची एकच आघाडी राहील की दोन आघाड्या राहतील हे अद्याप स्पष्ट झाले नाही.तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव व ममता बॅनर्जी यांनी फेडरल फ्रंट हे नाव अद्याप मागे घेतलेले नाही. दरम्यान कॉंग्रेसने मात्र फेडरल फ्रंटचा विरोध न करता पण तिला शह देण्यासाठी नवी रणनीती हाती घेतली आहे. ती म्हणजे राष्ट्रीय पातळीवरील आघाडीसाठी प्रयत्न न करता प्रादेशिक पातळीवर राज्यनिहाय तडजोडी करण्याचा तिचा सपाटा. त्या दृष्टीने उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानात बसपाशी युती करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्याच मालिकेतील कर्नाटकातील जदसे कॉंग्रेस युतीची तर घोषणाही झाली आहे. तशीच युती बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाशी, पश्चिम बंगालमध्ये भाकपा माकपाशी, तामीळनाडूमध्ये द्रमुकशी, आंध्र प्र्रदेशात तेलगू देसमशी, महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसशी ते करु शकतात, जेणेकरुन इतर विरोधी पक्षांना कॉंग्रेसच्या आघाडीत सामील होण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी आणि चंद्रशेखर राव फेडरल फ्रंटबाबत किती आग्रही राहतील हा प्रश्नच आहे. पण तूर्त तरी त्यांच्या त्या दिशेच्या हालचाली दिसत नाहीत. कॉंग्रेससाठी हा शुभ संकेतच म्हणावा लागेल.

मात्र तरीही विरोधी आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचे नाव निवडणुकीआधी जाहीर होणार नाही यासाठी पवारसाहेब पुरेपूर प्रयत्न करतील. त्याची सुरुवात त्यांनी पुण्यातून केली आहे. कॉंग्रेसेतर विरोधकांना किती जागा मिळतात हे उघड झाल्यानंतर ते आपले नाव समोर आणण्याच्या हालचाली सुरु करतील. त्यांच्या सुदैवाने कॉंग्रेसेतर विरोधी पक्षांना कॉंग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या तर ते आपली उमेदवारी जाहीर करायलाही मागेपुढे पाहणार नाहीत, कारण राहुल गांधी आणि ते यांच्यातून एकाची निवड करायची झाल्यास आपल्याच नावाला पसंती मिळेल याची त्यांनाच काय पण त्यांच्या विरोधकांनाही खात्री आहे.

दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तरीही राहुल गांधीच पंतप्रधानपदाचे उमेदवार झाले तर ते पंतप्रधान होतील की, नाही हा प्रश्न वेगळा, पण त्या स्थितीत इतर विरोधी नेत्यांच्या पंतप्रधानपदाच्या आकांक्षा समाप्त होतील. यामुळेच पंतप्रधान होणे हा नंतरचा प्रश्न, पण त्या पदाच्या रांगेत आपला पहिला क्रमांक लागावा यासाठी विरोधी नेत्यांमध्ये स्पर्धा निश्चितच आहे. जनमताच्या दबावापुढे तिचे काय होते हा प्रश्न अर्थातच वेगळा. कारण घोडामैदान आणखी एक वर्ष पुढे आहे आणि राजकारणात केव्हाही, काहीही होऊ शकते हे सर्वांनाच ठाऊक आहे. सर्वार्थाने ही दमाची लढाई आहे. कुणाच दम केव्हा उखडतो तेच आता पाहायचे.