प्रदिर्घ कालावधीनंतर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक

0
152

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आज मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहेत. गेल्या गुरुवारी पर्रीकर यांचे अमेरिकेहून गोव्यात आगमन झाले होते. शुक्रवारी मंत्रिमंडळ बैठक घेण्याची त्यांनी तयारीही केली होती. मात्र, शुक्रवारी मंत्रिमंडळ बैठक होऊ शकली नव्हती.

आज सोमवारी संध्याकाळी ५.३० वाजता पर्वरी येथील सचिवालयात मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. गेल्या सव्वातीन महिन्यांपासून मंत्रिमंडळ बैठका झाल्या नसल्याने कामे तुंबून पडलेली असून ती हातावेगळी करण्याची जबाबदारी पर्रीकर यांना पार पाडावी लागणार आहे.सध्या राज्यातील खाणबंदीचा प्रश्‍न ऐरणीवर असून खाणी सुरू होत नसल्याने खाणपट्ट्यात प्रचंड नाराजी आहे. खाण अवलंबितानी पणजीत धरणे आंदोलनही सुरू केलेले आहे. या पार्श्‍वभूमीवर पर्रीकर लवकरच खाण अवलंबितांची बैठक बोलावून त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. मात्र, ह्या बैठकीची तारीख अद्याप ठरली नसल्याचे खाणपट्ट्यातील एक आमदार नीलेश काब्राल यांनी काल सांगितले. पर्रीकर सोमवारी (आज) अथवा मंगळवारी (उद्या) खाण अवलंबितांची बैठक बोलावून त्यांच्याशी चर्चा करतील, असे वृत्त होते. मात्र, काब्राल यांना त्यासंबंधी काल विचारले असता ह्या बैठकीची तारीख अद्याप ठरली नसल्याचे स्पष्ट केले.

विकासकामांच्या फाईल्स घेऊन
येण्याचे मंत्र्यांना निर्देश
दरम्यान, पर्रीकर यांनी उद्या मंगळवारपासून आपल्या सहकारी मंत्र्यांना त्यांच्या विकासकामांसाठीच्या फाईल्स घेऊन आपणाकडे येण्यास बजावले आहे. तुमची जी कामे अडून पडली आहेत त्या कामांच्या फाईल्स घेऊन आपणाकडे या अशी सूचना पर्रीकर यांनी आपले सहकारी मंत्री व महामंडळाच्या अध्यक्षाना केली आहे. त्यामुळे मंगळवारपासून वेगवेगळे मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे मंगळवारनंतर वेगवेगळी खाती व महामंडळाच्या कामांना गती मिळणार आहे.