- अशोक ज. तिळवी
(कार्याध्यक्ष, गोवा प्रदेश साने गुरूजी कथामाला)
साने गुरूजी कथामालेचे अरविंद नेवगी सर म्हणून सारा गोवा ज्यांना ओळखतो, एवढेच नव्हे तर अर्ध्याअधिक महाराष्ट्रातील साने गुरूजी परिवार त्यांना कथामालेचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणूनही ओळखतो. गोवा प्रदेश साने गुरूजी कथामालेच्या इतिहासाची काही पाने निश्चितपणे ज्यांच्या अमोल कार्याने भरलेली आहेत त्या अरविंद नेवगींचा हा परिचय अनेकांना मार्गदर्शक ठरेल. श्री. अरविंद नेवगी समाजावर सुसंस्कार करणारे संस्कारदीप आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यांच्या जीवनप्रवासाबद्दल थोडेसे…
दि. ६ नोव्हेंबर १९४२ या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीपर्वात श्री. अरविंद नेवगी यांचा जन्म एका स्वातंत्र्यसैनिकाच्या घरी झाला. त्यांच्या बालपणी त्यांचे घर गोवामुक्ती लढ्याच्या वातावरणाने भारलेले होते. भूमिगत चळवळीचे बेत आखले जायचे. गोवामुक्ती लढ्यातील अनेक घटनांचा छोट्या अरविंदच्या संस्कारक्षम मनावर विलक्षण परिणाम होत होता. सन १९५७ साली त्यांच्या वडलांना अस्नोडा येथे पोर्तुगीज पोलिसांनी गोळी घालून ठार मारले. त्यानंतर घरची परिस्थिती फार गरिबीची. प्राथमिक शिक्षण गावातच झाले. पुढे माध्यमिक शिक्षण म्हापसा येथे झाले. एस.एस.सी. पास झाल्यानंतर जून १९६१ मध्ये अवर लेडी ऑफ ग्रेस हायस्कूल, डिचोली येथे शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. खरे पाहता त्यांच्या सार्वजनिक कार्याला १९६२ पासून सुरुवात झाली.
१९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा पोर्तुगीजांच्या राजकीय जोखडातून मुक्त झाला. गोव्याची जनता राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात मुक्त वातावरणात संचार करू लागली. मडगावच्या महिला व नूतन मराठी विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या श्री. माधव पंडित यांना पुण्यात गेले असताना कथामालेच्या कार्याची ओळख झाली होती. लहान मुलांचं भविष्य घडविण्याच्या दृष्टीने साने गुरूजी कथामाला महत्त्वाची वाटू लागली. १ ऑगस्ट १९६२ ला टिळक पुण्यतिथीच्या मुहूर्तावर गोव्यात पहिली कथामाला शाखा सुरू झाली. परंतु कथामालेचा खरा विस्तार झाला तो १९६३ साली कै. सदाशिव देसाई व शिक्षक मधुकर नवाथे यांच्यामुळे! डिचोली येथे कथामाला शाखा सुरू झाली. लहानपणीच समाजकार्याचे व देशसेवेचे बाळकडू मिळालेले अरविंद नेवगी यांनी या कार्यात स्वतःला संपूर्णपणे झोकून दिले. कथामालेच्या कार्यात काम करण्यापूर्वी राष्ट्रसेवादलात काम करण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी होताच. राष्ट्रसेवा दल, साने गुरूजी कथामाला व आंतर-भारती या तिन्ही संघटनांच्या शिबिरे, सभा, अधिवेशने, सहली, गाठीभेटीतून व प्रत्यक्ष भाग घेऊन श्री. अरविंद नेवगींनी जवळजवळ सारा भारत देश पालथा घातला. आनंदवन, सोमनाथ, गुजरातमधील आंतर भारतीचा दौरा, विश्व युवक केंद्र, दिल्ली येथील शिबिरात ते अनेक वेळा सहभागी झाले.
शांतादुर्गा हायस्कूल, डिचोली येथे जून १९६६ मध्ये शारीरिक शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. १९७० मध्ये पू. साने गुरूजी ज्ञानोपासना मंदिर या शैक्षणिक संस्थेची स्थापना झाली. यात श्री. नेवगी यांचा सिंहाचा वाटा होता. सचीव म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. याच संस्थेतर्फे मराठी माध्यमाच्या राधाकृष्ण हायस्कूलची जून १९७० मध्ये स्थापना करण्यात आली. शांतादुर्गा हायस्कूलमध्ये राजीनामा देऊन राधाकृष्ण हायस्कूलमध्ये रुजू झाले. याचवेळी त्यांनी गोव्यात व गोव्याबाहेर अनेक ठिकाणी गीतगायन, कथाकथन, कथाकथन तंत्रमंत्र, विद्यार्थी-शिक्षक शिबिरे, कार्यशाळा यात स्वतःला झोकून दिले. त्यांनी राधाकृष्ण हायस्कूलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापक म्हणून काम केले.
गोव्याच्या कानाकोपर्यात पू. साने गुरूजींचा संदेश कथामाला केंद्राच्या रूपाने पोचविण्याचा प्रयत्न झाला. सारा गोवा कथामालेच्या कार्यक्रमांनी ढवळून निघाला. श्री. नेवगी यांच्याच प्रेरणेने आजपर्यंत एकूण १८ केंद्रे सुरू आहेत. गोवा प्रदेश सानेगुरूजी कथामालेच्या स्थापनेपासून समर्पित भावनेने त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. त्यांच्या अथक परिश्रमाने, कल्पक व कुशल मार्गदर्शनाने कथामालेचे कार्य अव्याहतपणे गोव्यात चालू आहे. प्रदीर्घ अनुभव, शिस्तप्रियता, उत्कृष्ट आयोजन, गीतगायन अशा विविध पैलूंचा समावेश त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होतो. त्यांना गोड गळ्याची दैवी देणगीच आहे. भक्तिगीतापासून स्फूर्तीगीतापर्यंत सर्वदूर त्यांचा गळा अलगद साकारतो. गीतातील भावभावना मुलांपर्यंत पोचविण्याचे विलक्षण कसब त्यांच्याकडे आहे. त्यांच्या गोड, मधुर आवाजाने बालवृंद, शिक्षक व पालकांनाही मंत्रमुग्ध करून ठेवले आहे. आजही ते अनेक कार्यक्रमातून, शिबिरांमधून, बाल-मेळाव्यातून कथामालेची व राष्ट्रीय एकात्मतेची गीते शिकवितात. १९७७ साली डिचोली येथे साने गुरूजी बालमंदिर त्यांनी स्वखर्चाने सुरू केले. सर्वण-डिचोली येथे साने गुरूजी ज्ञानोपासना मंदिराची दुसरी शाखा- गोविंद गुणाजी हायस्कूल स्थापनेत त्यांचा प्रमुख वाटा होता. परंतु कथामालेच्या कार्यात मात्र त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. कथामाला म्हणजेच अरविंद नेवगी हे एक समीकरण झाले. कथामाला म्हणजे त्यांचा श्वास व ध्यास झाला. कार्यक्रमांचा व आपल्या कामाचा केव्हाही गाजावाजा त्यांनी केला नाही. शांतपणे काम करीत राहणे हा त्यांचा स्वभाव. ५४ वर्षे समाजकार्याच्या वाटचालीत विद्यार्थी व शिक्षकांना प्रोत्साहित करून कथामालेच्या कार्यासाठी निःस्वार्थी भावनेने कार्य करणारे अनेक कार्यकर्ते त्यांनी तयार केलेत.
सन १९७१ साली वैशाली ही सुविद्य पत्नी त्यांना लाभली. त्यांच्याच विचारांची व सामाजिक कार्याची आवड असलेली सहचारिणी मिळाल्यामुळे अर्थातच कामाचा व्याप व वेग वाढला. शिक्षकी पेशात ३२ वर्षे व्रतस्थ भावनेने कार्य करणार्या, आदर्श मूल्यांना जपत स्वतःचे व्यक्तिमत्त्व तितकेच आदर्श ठेवणार्या व वाणीने व कृतीने सर्वांना मंगलमय विचार देणार्या वैशाली यांनी आपल्या पतीच्या प्रेरणेनेच १९७२ पासून कथामालेच्या कार्यात स्वतःला वाहून घेतले. कथामालेत सौ. वैशाली यांनी कोषाध्यक्ष, डिचोली केंद्रात कार्यवाह व कार्याध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. मुळगाव येथे भरलेल्या अ.भा. कथामाला संमेलन-२००२ यशस्वी करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. स्वतःच्या हिंमतीवर ४५ हजारांचा निधी जमा केला. ११ जून ते १४ जून २००८ या कालावधीत ११ कार्यक्रमांचे आयोजन केले. तेच शेवटचे ठरले. अशा सातत्याने कार्यशील असणार्या कार्यकर्त्या अकाली निघून गेल्या. त्यामुळे गोवा कथामालेत एक पोकळी निर्माण झाली. श्री. अरविंद नेवगींसाठी हा फार मोठा धक्का होता. ते मनाने खचले पण त्यांच्यातील कार्यकर्ता त्यांना स्वस्थ बसू देईना. थोड्याच दिवसांनंतर व्यक्तिगत दुःख दूर ठेवून कथामालेच्या कार्यात ते सक्रिय झाले. अ.भा. साने गुरूजी कथामालेचे काही काळ त्यांनी संघटक पदी कार्य केले. आजही श्री. नेवगी अ.भा. साने गुरूजी कथामालेच्या कार्यकारिणीवर सदस्य आहेत.
श्री. नेवगींनी तन-मन-धनाने कथामालेच्या बालकांना बालब्रह्म मानून सेवा केली. कित्येक सामाजिक कार्य करणार्या संस्थांना आर्थिक मदत केली. अडल्या-नडलेल्यांना मदत केली. त्यांच्या कार्याची नोंद घेऊन गोव्यातील तसेच महाराष्ट्रातील संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे. दापोली येथे संपन्न झालेल्या ४५ व्या (२०१२) अ.भा. कथामालेच्या अधिवेशनात बाल सेवा पुरस्कार त्यांना देण्यात आला. पुरस्कार रक्कम रु.२५,०००/- मिळाले. त्यात रु.५०००/-ची भर घालून एकूण रु.३०,०००/- त्यांनी गोवा कथामालेला देणगी दिली. या रकमेच्या व्याजातून दरवर्षी दोन कार्यकर्त्यांना रु.१०००/-चा कार्यकर्ता पुरस्कार देण्यात येतो. साने गुरूजींच्या साहित्यातून निवडक सुविचारांचे संकलन करून एक छोटी पुस्तिका तयार करण्यात आली. त्याचा संपूर्ण खर्च कै. सौ. वैशाली नेवगी यांच्या स्मरणार्थ हुतात्मा रामचंद्र नेवगी ट्रस्टतर्फे पुरस्कृत केला. मंगल गीतांजली या गीतांच्या पुस्तिकेत त्यांनी मुलांना व शिक्षकांना शिकवलेली गीते समाविष्ट केली आहेत. या पुस्तकाच्या छपाईसाठी त्यांनी रु.८०००/-ची मदत दिली आहे. तसेच साने गुरूजींचे विचार सर्वांपर्यंत पोचावेत म्हणून श्यामची आई या पुस्तकांच्या जवळजवळ ७००० प्रती त्यांनी अल्प दरात वितरित केल्या.
आपल्या कार्यकाळात सर्वश्री कथामालेचे संस्थापक प्रकाशभाई मोहाडीकर, मधु नाशिककर, बाबा आमटे, यदुनाथ थत्ते, नानासाहेब गोरे, एस.एम.जोशी, प्रा. वसंत बापट, राजा मंगळवेढेकर, मेधा पाटकर, भाऊसाहेब रानडे, ग.प. प्रधान, वा.ना. दांडेकर, माधव गडकरी, प्रभाकर भुसारी, नारायण आठवले, सौ. अनुराधा आठवले त्याचप्रमाणे गोव्यात देखील अनेक मान्यवर कार्यकर्त्यांचा सहवास त्यांना लाभला. विचारस्वातंत्र्य, विचारांचे संस्कार त्यांच्या मनावर झालेत. यातून आपल्याला या कार्याची प्रेरणा मिळाली असे अभिमानाने आजही सांगतात. या दरम्यान जगाचा प्रवासदेखील त्यांनी केला. अनेक देश, अनेक लोक पाहिलेत. तेथील सौंदर्य, शिस्त, नियम, आदर्श गोष्टी, स्वच्छता, पर्यावरणसंबंधी माहिती आपल्या कार्यक्रमातून मुलांना, पालक-शिक्षकांना सांगत असतात. आपला भारत देशदेखील असाच आदर्श व्हावा हीच तळमळ त्यांना आहे.
यंदा त्यांनी वयाच्या ७५व्या वर्षात पदार्पण केले आहे. आजसुद्धा त्यांची कार्य करण्याची पद्धत ही तरुणांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल. या सुवर्णमहोत्सवी अधिवेशनात त्यांचा खास सन्मान करण्यात येणार आहे. श्री. अरविंद नेवगी यांना दीर्घायुष्य लाभो. कथामालेवरील त्यांचा ऋणानुबंध दिवसेंदिवस वृद्धिंगत होवो हीच ईशचरणी प्रार्थना!!
कथेद्वारे मुलांना सुसंस्कारित करता येते, हे सिद्ध करणारी साने गुरूजी कथामाला अखिल भारतीय पातळीवरील लोकप्रिय चळवळ आहे. गेली ६७ वर्षे कथामालेचे कार्यकर्ते निष्ठेने, निरपेक्ष भावनेने कथाकथनाची दिंडी पुढे नेण्याचे कार्य करीत आहेत. स्वातंत्र्योत्तर काळातील वाढता चंगळवाद व विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील मुक्त अर्थव्यवस्था यामुळे भारतीय समाजातील युवावर्ग व विद्यार्थिवर्गाचे नैतिक अधःपतन झाले. संवेदनशीलता लोप पावली. या पार्श्वभूमीवर साने गुरूजी कथामाला व साने गुरूजींच्या साहित्याने मुलांमधील संवेदनशीलता जोपासण्याचे कार्य संथ पण अखंड तेवणार्या पणतीप्रमाणे केले आहे. आताही करत आहेत.
ज्ञानेश्वरांच्या पसायदानानंतर ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’, अशी आर्त हाक समाजाला साने गुरूजींनी घातली. विठ्ठलाला संत मंडळी माउली म्हणतात, ज्ञानेश्वरांनादेखील माउली हे संबोधन आहे. पंढरपूरचे विठ्ठल मंदीर अस्पृश्यांना खुले व्हावे म्हणून उपोषण करणार्या साने गुरूजींनाही माउली म्हणतात. आपली शिकवण, साहित्यातून व कथाकथनातून जनसामान्यांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न साने गुरूजींनी जीवनाच्या अखेरपर्यंत केला. आचार्य अत्रेंच्या म्हणण्याप्रमाणे साने गुरूजींच्या गोड गोष्टी मराठी साहित्यात अनंतकाळपर्यंत टिकतील.
११ जून १९५० रोजी साने गुरूजींनी जगाचा निरोप घेतला. साने गुरूजी गेले तरी त्यांचे विचार, त्यांचे साहित्य आपल्याजवळ होते. ‘करी मनोरंजन मुलांचे जडेल नाते तयाशी’ हे साने गुरूजींच्या जीवनाचे सूत्र होते. गुरूजींना मुलांना गोष्टी सांगण्याची आवड होती. हीच आवड जोपासून मुलांना गोष्टी सांगण्याचा उपक्रम सुरू करणे हेच गुरूजींचे खरे स्मारक होईल ही संकल्पना गुरूजींचे प्रिय शिष्य स्व. प्रकाशभाई मोहाडीकर यांच्या मनात आली.
२४ डिसेंबर १९५१ रोजी गुरूजींच्या जन्मदिनी दादर येथील सभागृहात पहिला कथाकथनाचा कार्यक्रम झाला. महाराष्ट्रातील थोर गांधीवादी, विचारवंत, साने गुरूजींचे ज्येष्ठ हितचिंतक, स्नेही आचार्य स.ज. भागवत यांनी हे पुष्प गुंफले. त्यांनी यावेळी महाभारतातील सुंदर कथा सांगितल्या. कथामालेची हीच गंगोत्री म्हणावयास हवी.
तेव्हापासून आजतागायत संपूर्ण महाराष्ट्रात कथामालेचा प्रसार प्रचार झाला.
साने गुरूजी कथामाला या उपक्रमशील संस्थेच्या कार्याला गोवामुक्तीनंतर १९६२ मध्ये गोव्यातील मडगाव शहरात प्रारंभ झाला. स्वातंत्र्यसैनिक माधव पंडित यांनी कथामालेची मुहूर्तमेढ गोव्यात रोवली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. थोर समाज सेवक कै. केशव अनंत नाईक यांच्या प्रोत्साहनाने महिला नूतन मराठी विद्यालयात कथामालेचे कार्य सुरू झाले. कविवर्य दा. अ. कारे यांच्या हस्ते १ ऑगस्ट १९६२ रोजी गोव्यात पहिली कथामाला सुरू झाली. पण खर्या अर्थाने गोव्यात कथामालेचा प्रचार व प्रसार १९६३ पासून डिचोलीत कथामालेचे केंद्र सुरू झाल्यापासून झाला. तिला संघटनात्मक रूप मिळाले. सदाशिव देसाई, मधुकर नवाथे, अरविंद नेवगी, प्रभाकर भुसारी, लक्ष्मीदास बोरकर, सुनंदाबाई बांदोडकर, कृष्णा मराठे, बबनराव पवार, रमेश कुळकर्णी, पांडुरंग नाडकर्णी, अरुण कोटगी, किशोर कोलगे, नरेंद्र हेगडे देसाई, हंडे गुरूजी, कृष्णा संझगिरी, द.भा. वाघ त्याचप्रमाणे अनेक जुन्या व नव्या कार्यकर्त्यांनी कथामालेचा वटवृक्ष वाढवला, फुलवला.
गोव्यात आज १८ केंद्रे सक्रिय आहेत. गुरूजींचे विचार घराघरांत पोचावेत, विद्यार्थ्यांमध्ये आदर्श मूल्यांची रुजवण व्हावी, ते संस्कारसंपन्न व्हावेत, त्यांचे जीवन प्रेम, ज्ञान व बळ या गुणांनी सुंदर यशस्वी व्हावे या भावनेने गोवा प्रदेश साने गुरूजी कथामाला अनेक संस्कारक्षम उपक्रम राबवीत असते.
गोवा शासन, तसेच शिक्षण खात्याने कथामालेला मान्यता दिली असून गेली अनेक वर्षे व्यवस्थापकीय अनुदान तर गेली पाच वर्षे कला व संस्कृती खात्याकडून विद्यार्थी कथाकथन स्पर्धेसाठी भरीव अनुदान मिळत आहे. कथामालेच्या विविध उपक्रमांना अनेक दात्यांनी उदार हस्ते मदत केली आहे व करीत आहेत. विद्यार्थ्यांवर मूल्यसंस्कार करणारी संस्था म्हणून कथामालेला जनमानसात फार मोठा आदर आहे.
१. विद्यार्थी कथाकथन स्पर्धा ः प्रतिवर्षी ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत गोव्याच्या विविध भागातील १८ केंद्रांतून ही स्पर्धा प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक गटातून घेण्यात येते. प्रत्येक गटातून प्रथम व द्वितीय क्रमांकाचे विद्यार्थी प्रतिवर्षी २४ डिसेंबरला होणार्या राज्य पातळीवरील स्पर्धेत सहभागी होतात. एकूण १८ केंद्रांतून ८०० ते ९०० विद्यार्थी या स्पर्धेत भाग घेतात. गेली ४० वर्षे सातत्याने ही स्पर्धा घेतली जात आहे.
२. उच्च माध्यमिक विद्यार्थी कथाकथन स्पर्धा ः गत ९ वर्षांपासून उच्च माध्यमिक (११वी व १२वी) स्तरावर कथाकथन स्पर्धा दक्षिण गोवा व उत्तर गोवा अशी दोन जिल्हास्तरावर घेतली जाते. राज्यस्पर्धा २४ डिसेंबरला अन्य विद्यार्थ्यांसोबत घेतली जाते.
३. राज्यस्तरीय विद्यार्थी कथाकथन स्पर्धा ः प्रतिवर्षी साने गुरूजी जयंतीदिनी २४ डिसेंबरला ही स्पर्धा १८ केंद्रांपैकी एका केंद्रावर आयोजित केली जाते. प्राथ., उच्च प्राथ., माध्य. अशा तीन गटातील केंद्रांवर १०८ विजयी स्पर्धक, उच्च माध्य. गटातील १० स्पर्धक. एकूण ११८ स्पर्धक व त्यांचे पालक-शिक्षक. संपूर्ण गोव्यातील कथामालेचे कार्यकर्ते, आयोजन समितीतील स्थानिक कार्यकर्ते असा ४०० व्यक्तींचा भव्यदिव्य असा शिस्तबद्ध एक दिवशीय आनंद मेळावाच असतो.
४. शिक्षक-पालक कथाकथन स्पर्धा ः गेली एकोणतीस वर्षे सातत्याने ही स्पर्धा दक्षिण गोवा व उत्तर गोवा दोन जिल्हा स्तरावर व १६ डिसेंबरला राज्य स्पर्धा या तिन्ही स्पर्धा वेगवेगळ्या केंद्रात घेण्यात येतात.
५. साने गुरूजी पुण्यतिथी ः प्रतिवर्षी ११ जून रोजी पुण्यतिथीचा कार्यक्रम वेगवेगळ्या कथामाला केंद्रात आयोजित केला जातो. या दिवशी केंद्राच्या परिसरातील कथामालेचे कार्यकर्ते १५ ते २० शाळांमधून एकाच वेळी साने गुरूजींचे जीवनकार्य व कथाकथन करतात. कथामालेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला प्रमुख वक्ता म्हणून आमंत्रित केले जाते. वक्त्यांची गोव्याच्या विविध भागांतील शाळा व अन्य संस्थांतून गुरूजींच्या जीवनकार्यावर आधारित व्याख्याने होतात.
६. विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास शिबिर ः दिवाळीच्या सुट्टीत कथामाला विद्यार्थ्यांसाठी ३-४ दिवशीय निवासी शिबिराचे आयोजन करते. या शिबिरामध्ये अनेक उपक्रमशील मार्गदर्शकांना आमंत्रित करून अन्य विविध सत्रांबरोबर कथाकथन तंत्रमंत्र व कथा लेखन यावर मार्गदर्शन केले जाते. गोवा शासनाच्या राज्य कला व संस्कृती संचालनालय अथवा राजभाषा संचालनालय तर्फे अनुदान मिळते. हे शिबिर म्हणजे आयोजनाचा एक उत्कृष्ट केंद्रबिंदू मानला जातो.
७. कथाकथन तंत्रमंत्र शिबिर ः गेली अनेक वर्षे १-३ दिवसांची शिबिरे शिक्षक-पालकांसाठी आयोजित केली जातात. अनेक शाळांमधून कार्यशाळा घेण्यात येतात. कथामालेतर्फे सर्वशिक्षा अभियान गोवा व गोवा शिक्षण विकास महामंडळातर्फे कथाकथन तंत्रमंत्र विषयावर कार्यशाळा घेण्यात येतात.
८. कथाकथन गीत गायन ः गोवा कथामालेतर्फे प्रतिवर्षी २० ते २५ शाळांमधून ३-५ तासांचा कथाकथन व गीत गायनाचा कार्यक्रम घेतला जातो.
९. साहित्य निर्मिती व विक्री ः गोवा कथामालेतर्फे राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेतील विजयी स्पर्धकांच्या कथा संकलित करून पुस्तकरूपाने प्रकाशित करून त्याची विक्री करण्यात येते. कथामालेच्या विविध गीतांचे संकलन करून पुस्तिका, तसेच साने गुरुजींच्या सुविचारांचे संकलन करून पुस्तिका तयार करण्यात आल्या व गोव्यातील सर्व शिक्षक-विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘श्यामची आई’ या पुस्तकाची विक्रीदेखील मोठ्या प्रमाणात करण्यात आली.
१०. अधिवेशनांचे आयोजन ः गोवा कथामालेतर्फे १९६४ मध्ये मडगांव येथे अखिल भारतीय अधिवेशन, १९८७ मध्ये मंगेशी येथे गोवा येथे विभागीय अधिवेशन व २००२मध्ये मुळगाव-डिचोली येथे व २०१७ मध्ये रामनाथी-गोवा येथे अखिल भारतीय अधिवेशने आयोजित करण्यात आली.
११. कार्यकर्ता पुरस्कार ः गोवा कथामालेचे अनेक कार्यकर्ते तन-मन-धन देऊन कार्य करीत असतात. अशा ध्येयनिष्ठ कार्यकर्त्यामुळे कथामालेचा प्रचार-प्रसार व विस्तार झाला आहे. कार्यकर्त्यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी श्री. अरविंद नेवगी यांनी दिलेल्या कायम ठेवीतून प्रतिवर्षी दोन ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा व केंद्र स्तरावर कार्य करणार्या कार्यकर्त्यांचा श्री. श्रीधर वेरेकर यांनी ठेवलेल्या ठेवीतून पुरस्कार देऊन गौरव केला जातो.
आज मध्यमवर्ग/उच्च मध्यमवर्गात मुलांवर सुखाचा मारा होतो. त्यातून त्यांच्या संवेदना तरल राहत नाहीत. अभाव वाट्याला न आल्याने गरिबी वंचितता याची वेदना कळत नाही किंवा आजुबाजूचे जग हे ही सुखवस्तू असल्याने या गरिबांच्या जगण्याचा परिघच परिचित होत नाही. पुन्हा वाचन, संगीत, निसर्ग्र असे अनुभव बहुतेक घरात न दिल्याने मुले टीव्ही, मोबाइल, कार्टून, दंगामस्ती असले स्वस्त आनंदाचे मार्ग शोधतात व त्यातून त्यांची विचारशक्ती व संवेदनाच विकसित होत नाही.
पालकांची स्वयंव्यग्रता ही पुन्हा समस्या बनली आहे. पालक दिवसभर् काम आणि घरी आल्यावर टीव्ही, फोन आणि सोशल मिडियात रमून गेलेत. याला मुलांच्या आईही अपवाद नाहीत. यातून मुलांशी संवाद बंद झालेत. घरात वस्तू मिळताहेत पण प्रेम आणि संवाद मिळत नाहीये. यातून मुले प्रेम दुसरीकडून मिळवतात आणि संवादही चुकीचा करू लागतात.
इथेच नेमकी साने गुरूजींची आई – यशोदा सदाशिव साने – म्हणजेच श्यामची आई मला महत्त्वाची वाटते. ती मुलाशी सतत बोलत राहते. न चिडता त्याला समजून घेते. छोट्या छोट्या प्रसंगातून त्याला मूल्य परिचित करून देते. केवळ शब्दाने संस्कार करण्यापेक्षा आपल्या अपरिमित कष्टाने आणि मायेने संस्कार करते. मुलांशी बोलावे कसे एवढे शिकण्यासाठी या स्मृतीवर्षात ‘श्यामची आई’ आपण प्रत्येक पालकाने वाचावी.
– हेरंभ कुलकर्णी