पर्यायी मुख्यमंत्र्यांसाठी कॉंग्रेसचे धरणे आंदोलन

0
133

>> राजभवनवर धडक देणार : गिरीश चोडणकर

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या गोवा भेटीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस पक्षाने काल सकाळी मिरामार येथे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या समाधीजवळ धरणे आयोजित करून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत राज्यात पर्यायी मुख्यमंत्री उपलब्ध करण्याची मागणी केली. पर्यायी नेता निवडण्यासाठी राजभवनावर धडक दिली जाणार आहे, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली.

या धरणे कार्यक्रमानिमित्त कॉंग्रेसच्या नेते व पदाधिकार्‍यांनी भाऊसाहेब बांदोडकर यांना श्रद्धांजली वाहिली. धरणे कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर, माजी मुख्यमंत्री तथा आमदार दिगंबर कामत, आमदार दयानंद सोपटे, नीळकंठ हळर्णकर, विल्फ्रेड डिसा, क्लाफासियो डायस, फ्रान्सिस सिल्वेरा, ऍन्थोेनी फर्नांडिस, फिलीप नेरी रॉड्रिग्स, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप व इतरांनी सहभाग घेतला.

कॉंग्रेस पक्ष मुख्यमंत्र्याच्या अनुपस्थित घेण्यात येणार्‍या प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयाचा आढावा घेणार आहे. फाईल्सवरील मुख्यमंत्र्यांच्या सहीबाबत शहानिशा केली जाणार आहे. सरकारी कामकाजात गैरव्यवहार करणार्‍या अधिकार्‍यांची गय केली जाणार नाही, असा इशारा चोडणकर यांनी दिला.
भाजपच्या आमदारांमध्ये सरकारी पातळीवर विकासकामे व इतर कामे होत नसल्याने असंतोषाचे वातावरण पसरले आहे. भाजपच्या आमदारांना दबावाखाली ठेवण्यासाठी कॉंग्रेसचे आमदार संपर्कात असल्याची अफवा भाजपकडून पसरविण्यात येत आहे, असा दावा कवळेकर यांनी केला.

आपण विकाऊ नाही : सोपटे
आपण कॉंग्रेस पक्ष कदापि सोडणार नाही, असे प्रतिपादन मांद्रेचे कॉंग्रेसचे आमदार सोपटे यांनी केले. आपण विकाऊ नाही आणि आपणाला कुणीही विकत घेऊ शकत नाही. मांद्रे मतदारसंघातील लोकांनी दाखविलेल्या विश्‍वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही, असेही आमदार सोपटे यांनी सांगितले.
राज्यात घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करण्याची गरज आहे. पंतप्रधान सुध्दा दौर्‍यावर विदेशात जाताना तात्पुरता कारभार सुपूर्द करून जातात. परंतु, मुख्यमंत्र्यांनी कुणाकडेही पदभार सुपूर्द केलेला नाही, असे आमदार कामत म्हणाले.