गोसुमंतर्फे शहांना काळे झेंडे

0
110

म्हादई प्रश्‍नी केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना गोवा सुरक्षा मंचाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला. या निषेधाच्या वेळी भाजपच्या काही समर्थकांनी गोसुमंच्या कार्यकर्त्यांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. तथापि, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.

गोसुमंच्या कार्यकर्त्यांनी ताळगाव येथे भाजपच्या मेळाव्याच्या ठिकाणापासून काही अंतरावर मुख्य रस्त्याच्या बाजूला भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कर्नाटकात निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी केलेल्या म्हादईसंबंधीच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी निदर्शने आयोजित केली होती. अमित शहा वाहनातून जात असताना गोसुमंच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शहा यांच्या विरोधात करण्यात आलेल्या जोरदार घोषणाबाजीने भाजप समर्थक नाराज बनले. शहा यांच्या मागून जाणार्‍या काही भाजप समर्थकांनी गोसुमंच्या कार्यकर्त्यांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यावेळी गोसुमं व भाजप समर्थक यांच्यात आरोप – प्रत्यारोप सुरू झाले. प्रकरण हातघाईवर येण्याची शक्यता निर्माण झाली होती. पोलिसांनी बाचाबाची करणार्‍या भाजपच्या समर्थकांना बाजूला जाण्याची सूचना केली. अखेर पोलीस अधिकार्‍यांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना जबरदस्तीने बाजूला करून वादावर पडदा टाकला.