वंध्यत्वामध्ये योगाभ्यास

0
308

डॉ. मनाली महेश पवार
(गणेशपुरी, म्हापसा-गोवा)

वंध्यत्वामध्ये औषधोपचार, पंचकर्म चिकित्सा, संतुलित आहार-विहार, समुपदेशन, मानसिक आधाराबरोबरच महत्त्वाचा आहे तो योगाभ्यास. हॉर्मोन्सचे संतुलन योग्य प्रकारे रहावे, यासाठी योगातील अनुलोम – विलोम प्राणायामाचा नित्य अभ्यास उपयुक्त ठरतो. शरीरात फार उष्णता असल्यास शीतली-सीतकारी यासारखे प्राणायाम नियमितपणे करावेत. त्याचबरोबर पवनमुक्तासन, शलश्‍वासन, योगमुद्रा, जानुवक्षासन, अश्‍विनी मुद्रा, इत्यादी आसनांचा नियमित अभ्यास विशेष करून ओटीपोटातील अवयवांचे आरोग्य अनुकूल ठेवण्यास मदत करतो. तेथील महत्त्वाच्या ग्रंथीचे कार्य मुळे व्यवस्थित चालते. तेथील रक्ताभिसरणाला चालना मिळून जननसंस्थेचे कार्य सुधारते.

१. प्राणायाम ः
एका श्‍वास आत घेण्याच्या क्रियेपासून (प्राण) पुढील श्‍वास घेण्याच्या कालामधील अंतर शक्य तितके वाढवीत जावे. (आयाम). याला प्राणायाम म्हणतात. हवा, पाणी, अन्न, ज्ञानेंद्रियांचे विषय या बाह्यघटकांचे शरीराकडे ग्रहण करणे हे प्राणाचे कार्य आहे. हे कार्य नियंत्रित केले तर त्यांच्या विनियोगासाठी शक्ती खर्च पडणे, सर्वच वायूंची गती वाढणे व त्यामुळे होणार धातुनाभ यावर आपोआपच नियंत्रण येते. अशाप्रकारे वायूचा निग्रह साधल्यामुळे धात्वाशयांना चिकटलेले, अधिक वेळा जलद श्‍वसनामुळे शाखामार्गी झालेले दोष सुटे होऊन कोष्टांगांकडे येतात व उत्सर्जनाच्या मार्गाला लागतात. त्यामुळे स्रोतसाची शुद्धी होते. मनाचा व प्राणवायूचा अन्योन्यसंबंध असल्यामुळे प्राणनियंत्रणाबरोबर आपोआप मनोनियंत्रण साधते व या सर्वांचा उचित असा स्वास्थ्यपोषक परिणाम मिळतो.
विधी ः
अनुलोम – विलोमसाठी अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीत सावकाश श्‍वास आत घ्यावा. डावी नाकपुडी बंद करून काही क्षण स्वस्थ राहावे. नंतर उजव्या नाकपुडीने श्‍वास सावकाशपणे बाहेर काढावा. काही क्षण बाहेर रोखून परत उजव्याच नाकपुडीने आत घ्यावा. परत काही क्षण आत येऊन डाव्या नाकपुडीने हळूहळू बाहेर सोडावा. हे एक आवर्तन झाले. अशा प्रकारे निदान दहा प्राणायाम रोज करावे.
२. शीतली –
विधी ः ध्यानात्मक आसनात बसून या प्राणायामासाठी जीभ दोन-तीन इंच बाहेर काढून, दोन्ही बाजूंनी दुमडून तिला पक्ष्याच्या चोचीप्रमाणे आकार द्यावा म्हणजे ती लांब नळी पन्हाळीसारखी होईल. तोंडाचा चंबू करून त्यात ती व्यवस्थितपणे बसलेली असावी. अर्थात, पूरक करताना हवा फक्त जिभेवरूनच जावी, तिच्या आजूबाजूने जाऊ नये. आता जिभेने विधिवत पूरक करावा. नंतर जीभ आत घेऊन कुंभक व नंतर दोन्ही नाकपुड्यांनी रेचक करावा. परत जीभ बाहेर काढली. की दुसरे आवर्तन सुरू, हा प्राणायाम थंड वेळी आणि थंड जागी करावा. तरच त्याचे शीत परिणाम दिसून येतील.
उष्णतेच्या विकारात, पित्त प्रकोप झाला असता या प्राणायामाचा अतिशय चांगला उपयोग होतो.

३. सीत्कारी
या प्राणायाम प्रकारात ‘सीत्’ असा तोंडातून आवाज येत असल्यामुळे आणि तेच त्याचे मुख्य लक्षण असल्यामुळे ‘सीत्कारी’ असे अनुरूप नाव दिले आहे.
विधी –
तोंडातील वरच्या व खालच्या दोन्ही दंतपंक्ती व्यवस्थित एकमेकांवर ठेवाव्यात. जिभेचा अग्रभाग खालील दंतपंक्तीच्या मुळाशी ठेवावा. काहींच्या मते दोन्ही दंतपंक्तींच्या मधोमध अथवा खालील दंतपंक्तीच्या रेषेत असावा. तोंड उघडून सावकाशपणे विधिवत पूरक करावा. असे करताना ‘सीऽऽ’ असा आवाज येतो व पूरकांनी ‘त’ असा आवाज होतो.
या अभ्यासाने कामदेवासारखी कांती – तेज प्राप्त होते.
४) योगमुद्रा –
पद्मासनात सरळ बसून दोन्ही हात पाठीमागे नेऊन उजव्या हाताने डाव्या हाताचे मनगट पकडावे. हाताची कोपरे व खांदे मागे घेऊन, कमरेपासून डोक्यापर्यंतचा भाग ताठ ठेवून कमरेतून हळूहळू खाली झुकावे. नंतर डोके जमिनीवर आणून कपाळ जमिनीवर टेकवावे. आता सर्व शरीर सैल सोडून श्‍वासोच्छ्‌वास शांतपणे होऊ द्यावा. तीन ते पाच श्‍वास या स्थितीत थांबून आसन सोडावे. सोडताना कपाळ व डोके वर उचलून परत पाठ ताठ करून तसेच खांदे व कोपर मागे घेऊन ध्वनी वर घ्यावी, नंतर पोट, नंतर छाती असे क्रमाने वर जावे आणि शरीर सरळ स्थितीत आल्यावर हात सोडून गुडघ्यांवर ठेवावेत.

या मुद्रेमुळे मुख्यत्वे पोटातील अवयव, स्नायू यांची हालचाल चांगली होऊन कोठा साफ राहण्यास मदत होते. पचनाचे कार्य चांगले होते. पोटावरील अनावश्यक चरबी कमी होण्यास मदत होते. या आसनात पाठीचा कणाही खेचला जात असल्यामुळे कणा तसेच मज्जासंस्थेच्या आरोग्यासाठीही याचा उपयोग होतो.
५. अश्‍विनी मुद्रा
या प्रकारात घोड्याच्या गुदद्वाराच्या आकुंचन – प्रसरणासारखी हालचाल केली जात असल्याने याला ‘अश्‍विनी मुद्रा’ असे म्हणतात.
विधी –
यासाठी उताणे झोपावे. पाय गुडघ्यात दुमडून ठेवावेत. पायात साधारण दीड ते दोन फूट अंतर असावे. हात शरीरालगत ठेवावेत. आपले मन श्‍वासावर केंद्रित करावे. त्याचवेळी पोटाच्या हालचालीकडेही लक्ष द्यावे. थोड्याच वेळात लक्षात येईल, की प्रत्येक वेळी आत येणार्‍या श्‍वासाबरोबर आपले पोट वर जाते आणि बाहेर जाणार्‍या श्‍वासाबरोबर पोट खाली जाते. हळूहळू ओटीपोटाचा संपूर्ण परिघ लक्षात घेऊन त्यातील हालचाल पहावी.

नंतर गुदद्वार, आतील भाग, शिवणीचा भाग या ठिकाणी लक्ष द्यावे. हळूहळू दीर्घ श्‍वसन करावे. श्‍वास आत घेत-घेत गुदद्वार – शिवणी – जननेंद्रिये हा सर्व भाग त्याबरोबरच बाहेर ढकलावा. साधारण पाच ते दहा सेकंद तसेच थांबून हळूहळू श्‍वास बाहेर टाकण्यास सुरुवात करावी. त्याचवेळी गुदद्वार व आजूबाजूचा भाग हळूहळू आकुंचित करीत जावे. परत पूर्वीप्रमाणेच ही अंतिम स्थितीही पाच ते दहा सेकंद धारण करावी. सुरुवातीला एक-दोन आवर्तने करावीत. रोजच्या सरावाने पाच-सात आवर्तने करता येतात.

– या मुद्रेच्या अभ्यासाने ओटीपोटाच्या स्नायूंची ताकद वाढते. त्यामुळे गर्भाशय किंवा आतड्याचा भ्रंश (प्रोलॅप्स) होणे टाळता येते.
– मासिक पाळीच्या तक्रारी, अनियमित पाळी, पोटात कंबर दुखणे दूर होतात.
– गर्भाशयाचे कार्य सुधारते. संपूर्ण जननयंत्रणा अधिक मजबूत होते.
– या संपूर्ण भागाती रक्तपुरवठा सुधारतो. त्यामुळे संततिप्राप्तीसाठी करण्यात येणार्‍या इतर उपचारांना ‘अश्‍विनी मुद्रेची’ चांगली जोड मिळू शकते.
६. पवनमुक्तासन –
पवन म्हणजे वायूपासून मुक्ती मिळते म्हणून पवनमुक्तासन.
विधी –
हे आसन उताणे झोपलेल्या स्थितीत करतात. उताणे झोपून पाय सरळ व एकत्र ठेवावेत. हात शरीरालगत ठेवावेत. एक पाय दुमडून आपल्या पोटावर आणावा, गुडघा छातीकडे जास्तीत जास्त जवळ आणावा. नंतर दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंतवून त्या पकडीने गुडघ्याखाली धरून पाय पोटावर दाबून धरावा. कोपर जमिनीकडे असावेत. त्यानंतर हळूहळू मान उचलून आपले नाक किंवा कपाळ यांनी गुडघ्याला स्पर्श करावा. हे सर्व करताना जमिनीवर असलेला पाय कोणत्याही प्रकारे उचलला जाणार नाही याची काळजी घ्यावी. सावकाश व दीर्घ असा श्‍वासोच्छ्‌वास तीन ते पाच वेळा करावा. नंतर उलट क्रमाने आसन सोडावे. श्‍वास घेताना पोट फुगले पाहिजे, प्रसरण पावले पाहिजे आणि उच्छ्‌वास सोडताना पोटाचे आकुंचन झाले पाहिजे. श्‍वासोच्छ्‌वास व पोटाची हालचाल यांच्यात चांगली लय असली पाहिजे.
अशाप्रकारे दुसर्‍या पायाने करावे आणि नंतर दोन्ही पाय एकत्र दुमडून करावे. दोन्ही पायांनी पवनमुक्तासन केले की अंतिम स्थितीत पोटाची वर-खाली अशी हालचाल होऊ शकत नाही. श्‍वासाच्या लयीत गुदद्वाराच्या परिसरात प्रसरण व श्‍वास बाहेर सोडताना आकुंचन अशी हालचाल केली तर श्‍वासोच्छ्‌वास करण्यास कठीण होत नाही.

– दाब व हालचाली एकत्रितपणे होत असल्याने आत कोंडलेल्या वायूला चालना मिळते. पोट हलके होते.
– गर्भाशयाचे कार्य सुधारण्यासाठी या आसनाची मदत होते. विशेषतः मासिक पाळीत पोटात दुखणे, रक्तस्राव व्यवस्थित न होणे इत्यादी तक्रारी या आसनाच्या नियमित अभ्यासाने दूर होतात.
वंध्यत्वामध्ये वाताची स्थिती योग्य असणे व कार्ये निर्विघ्नपणे पार पाडण्याची गरज असते, म्हणूनच वरील काही आसनांची औषधी चिकित्सेबरोबर सांगड घालून अवलंबल्यास यश लवकर मिळू शकते.
आधुनिक ‘आययूआय’ ‘आयव्हीएफ’ यासारखे उपाय हे महाग तर आहेतच, शिवाय त्यातील यशाची टक्केवारी खूपच कमी आहे. हे उपाय किती वेळा करणार यालाही मर्यादा आहेत. म्हणून प्राधान्य देऊन सर्वप्रथम अत्यंत परिणामकारक असे आयुर्वेदिक औषधोपचार व योगसाधना असे संयुक्त उपचार घेणे हे जास्त सयुक्तिक ठरते.