भारताचा युकी भांब्री ८३व्या स्थानी

0
119

भारताच्या युकी भांब्री याने काल सोमवारी जाहीर झालेल्या ताज्या एटीपी क्रमवारीत पुरुष एकेरीमघ्ये ‘अव्वल १००’ खेळाडूंत स्थान मिळविले आहे. २०१६ साली फेब्रुवारी महिन्यात युकी शेवटच्या वेळी आघाडीच्या शंभर खेळाडूंत होता. रविवारी तायपै चॅलेंजर स्पर्धा जिंकल्याचा फायदा त्याला झाला आहे. त्याने २२ क्रमांकांची मोठी उडी घेत थेट ८३वे स्थान मिळविले आहे.

एटीपी क्रमवारीत पुरुष एकेरीमध्ये भारतीय खेळाडूने मिळविलेले हे दुसर्‍या क्रमांकाचे सर्वोत्तम स्थान आहे. २०११ साली जुलै महिन्यात सोमदेव देववर्मनने कारकिर्दीतील सर्वोत्तम ६२व्या स्थानापर्यंत मजल मारली होती. २०१५ साली सर्वप्रथम युकीने अव्वल शंभरात स्थान मिळविले होते. परंतु, या कॅलेंडर वर्षांत दुखापतींमुळे त्याला अधिक मोठी मजल मारणे शक्य झाले नव्हते. २५ वर्षीय युकीने ‘टॉप १००’मधील आपले स्थान राखल्यास ग्रँडस्लॅम व एटीपी १००० सीरिज मास्टर्स सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये त्याला थेट प्रवेश मिळू शकतो.

‘अव्वल १००’मधील प्रवेशानंतर बोलताना युकीने याचे श्रेय सातत्यपूर्ण कामगिरीला दिले. ‘टॉप ५०’ हे खूप दूरचे लक्ष्य असून सातत्य राखले तरच शंभरात राहणे शक्य होणार असल्यचे तो म्हणाला. युकीने मागील वर्षभरात आपली कामगिरी उंचावली असून वर्ल्ड नंबर १२ लुकास पॉली (इंडियन वेल्स, मार्च २०१८) व वर्ल्ड नंबर २२ गेल मोनफिल्स (वॉशिंग्टन, ऑगस्ट २०१७) यांना इंगा दाखवला आहे. युकीचा डेव्हिड कप सहकारी रामकुमार रामनाथन याने कारकिर्दीतील सर्वोत्तम ११६वे स्थान प्राप्त केले आहे. तैपेईतील स्पर्धेत उपविजेतेपद प्राप्त केल्याने त्याला ही भरारी घेणे शक्य झाले. सुमीत नागल (२१५वे स्थान,- २) याला नुकसान झाले असून यानंतर प्रज्ञेश गुणेश्‍वरन (२६६) व अर्जुन काढे (३९४) यांचा क्रम लागतो.

दुहेरीत दिविज शरण याने आपला चढता आलेख कायम ठेवला आहे. एका क्रमाने वर सरकताना त्याने ४१वे स्थान आपल्या नावे केले आहे. डेव्हिस चषकातील दुहेरीतील सर्वांत यशस्वी खेळाडू लिएंडर पेस याला मात्र चार स्थानांचा फटका बसला आहे. त्याची ४९व्या स्थानी घसरण झाली आहे. १९व्या स्थानावर असलेला रोहन बोपण्णा भारताचा दुहेरीतील आघाडीचा खेळाडू आहे. दुसरीकडे महिला एकेरीत अंकिता रैनाने तीन क्रमांकांची उडी घेत १९४वे स्थान प्राप्त केले आहे. करमन कौर थंडी हिची २६८व्या स्थानी घसरण झाली आहे. दुहेरीत सानिया मिर्झा २४व्या क्रमांकावर जैसे थे आहे.