
भारताच्या सुशील कुमारने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. ७४ किलो वजनी गटात सुशील कुमारने आपला दक्षिण आफ्रिकन प्रतिस्पर्धी जोहान्स बोथावर अवघ्या १ मिनिट २० सेकंदात १०-० अशी मात करत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. सुशीलचे पदक अपेक्षित होते. परंतु, मराठमोळ्या राहुल आवारेने अनेपक्षित निकालाची नोंद करताना पुरुषांच्या ५७ किलो फ्रीस्टाईल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. अंतिम सामन्यात देदीप्यमान कामगिरी करत त्याने कॅनडाच्या स्टीवन ताकाहाशी याला १५-७ असे लोळविले. राहुलची शरिरयष्टी स्टीव्हन ताकाहाशीच्या तुलनेत किरकोळ होती. राहुल ही कुस्ती मारणार का असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र राहुलने पहिल्यापासूनच चित्त्यासारखी चपळाई दाखवली.
भारताचा अनुभवी कुस्तीपटू सुशील कुमारने २०१० मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत ६६ किलो वजनी गटात, तर २०१४ मध्ये ७४ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्यानंतर सुशीलने काल ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये गोल्ड मेडल जिंकत त्याने हॅट्ट्रिक साजरी केली. उपांत्य फेरीत सुशीलने ऑस्ट्रेलियाच्या कोनोर इव्हान्स याला एकतर्फी लढतीत ४-० असे हरवून दिमाखात अंतिम फेरी गाठली होती. अंतिम सामन्यातही हाच धडाका कायम राखत त्याने देशवासीयांची अपेक्षापूर्ती केली. पाकिस्तानच्या मोहम्मद असद बटवर उपांत्यपूर्व फेरीत सुशीलने मिळविलेला विजय खास ठरला. पाकच्या बटवर सुशीलने १०-० अशी मात करत सर्वांनाच अचंबित केले. पाकिस्तानी खेळाडूची हतबलता पाहून भारतीय पाठिराखेदेखील खूश झाले. तत्पूर्वी, सुशीलने कॅनडाच्या जेवोन बेल्फॉरवर ११-० अशी मात करत आपल्या मोहिमेची सुरुवात केली होती. दुसरीकडे राहुलने आपल्या अंतिम फेरीपर्यंतच्या वाटचालीत इंग्लंडच्या राहुल रॅम (११-०), इंग्लंडच्या थॉमस किचिनी (१०-०), पाकिस्तानच्या मोहम्मद बिलाल (१२-८) यांना पराजित केले होते.
किरण बिश्नोईला कांस्य
महिलांच्या ७६ किलो वजनी गटात भारताची युवा कुस्तीपटू किरण बिश्नोईने कांस्यपदक पटकावले. उपांत्य फेरीत नायजेरियाच्या ब्लेसिंग ओनयेबुची हिच्याविरुद्ध ०-१० असे पराजित झाल्याने सुवर्णपदकाच्या शर्यतीतून किरण बाहेर झाली होती. कांस्यपदकाच्या लढतीत तिने मॉरिशस देशाच्या कातोसकिया परियाधवेन हिला १०-० असे एकतर्फी हरवून पदकावर शिक्कामोर्तब केले. पहिल्या फेरीत किरणने कॅमेरूनच्या डॅनियला सिनो गुएदमे हिला ११-१ असे पराजित करत आपल्या मोहिमेची चांगली सुरुवात केली होती.
बबिता फोगाटला रौप्यपदक
महिला कुस्तीपटू बबिता फोगाटने भारताच्या पारड्यात रौप्यपदकाची भर टाकली. महिलांच्या ५३ किलो गटातील अंतिम फेरीत तिला कॅनडाच्या डायना विकर हिच्याकडून ५-२ असा पराभव स्वीकारावा लागला. बबीताकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती. त्यामुळे तिची हार धक्कादायक ठरली. बबिताने सुरुवातीला आघाडी मिळवलेल्या बबितावर पलटवार करत डायनाने सलग तीन गुणांची आघाडी मिळवत सामना आपल्या खिशात घातला आणि बबिताला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. बबिताने पहिल्या फेरीत नायजेरियाच्या सॅम्युअल बोस हिला २-१ असे पराजित करून चांगली सुरुवात केली. दुसर्या फेरीत तिने श्रीलंकेच्या दीपिका दिलहानी हिला ४-० असे एकतर्फी नमवून आगेकूच कायम ठेवली. आपल्या तिसर्या सामन्यात बबिताने ऑस्ट्रेलियाच्या कॅरिसा हॉलंडला चार गुणांच्या फरकाने नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला. शेवटचा अडथळा पार करण्यात मात्र ती अपयशी ठरली.