भारतीय पुरुष व महिला संघांनी आकर्षक कामगिरी करताना आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत २१व्या राष्ट्रकुल खेळातील हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील आपला प्रवेेश निश्चित केला. गोल्ड कोस्ट हॉकी स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात भारतीय पुरुष हॉकी संघाने मलेशियावर २-१ अशी मात केली. तर महिलांनी दक्षिण आफ्रिकेला १-० असे पराभूत केले.
उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चितीसाठी भारताला काल मलेशियाविरुद्ध विजय अत्यावश्यक होता. त्यानुसार भारतीय संघाने आक्रमक सुरुवात करताना ३र्याच मिनिटाला आघाडी घेतली. पेनाल्टी कॉर्नरवर हरमनप्रीत सिंगने हा गोल नोंदवित भारताचे खाते खोलले (१-०). पहिल्या क्वॉर्टरमध्ये भारताने आपली आघाडी राखले.
दुसर्या क्वॉर्टरमध्ये मात्र भारताचा बचाव भेदण्यात मलेशियाला यश आले. १६व्या मिनिटाला फैजल सारीने भारतीय गोलरक्षक श्रीजयला चकवित शानदार मैदानी गोल नोंंदवित मलेशियाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. तिसर्या क्वॉर्टरच्या अंतिम क्षणात भारताला पेनाल्टी कॉर्नर मिळाला आणि त्यात हरमनप्रीत सिंगने भारताच्या २-१ अशा विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल नोंदविला. भारताचा आता साखळी फेरीतल अजून एक सामना बाकी आहे. परंतु २ विजय आणि १ बरोबरीसह त्यांनी उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे.
दरम्यान, भारतीय पुरुषांपाठोपाठ महिला हॉकी संघानेही उपांत्य फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. काल त्यांनी दक्षिण आफ्रिकेवर १-० अशी निसटती मात केली. सामन्याच्या चौथ्या क्वॉर्टरमध्ये ४८व्या मिनिटाला राणी रामपालने भारताला महत्त्वपूर्ण विजय मिळवून देणारा हा एकमेव गोल केला. विजयाबरोबर भारताने ऑलिम्पिक चॅम्पियन इंग्लंडपाठोपाठ ब गटात दुसरे स्थान मिळविले असून आता उपांत्य फेरीत १२ रोजी त्यांची लढत जास्तकरून यजमान ऑस्ट्रेलियाशी पडण्याची शक्यता आहे.