
भारताच्या महिला हॉकी संघाने काल शुक्रवारी यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील आपल्या पहिल्या विजयाची नोंद करताना ‘अ’ गटातील लढतीत मलेशियाला ४-१ असा धक्का दिला. भारताकडून गुरजीत कौर (सहावे व ३९वे मिनिट) हिने दोन तर कर्णधार राणी (५६वे मिनिट) व लालरेमसियामी (५९वे मिनिट) यांनी प्रत्येकी १ गोल नोंदविला. मलेशियाचा एकमेव गोल नुरेनी राशिद हिने ३८व्या मिनिटाला केला.
भारताने सामन्याच्या पहिल्याच सत्रात वेगवान सुरुवात केली व संधी निर्माण केल्या. चेंडूवर अधिकवेळ ताबा राखतानाच भारताने मलेशियाच्या गोलक्षेत्रात सातत्याने हल्ले चढविले. या सत्रात भारताला तीन पेनल्टी कॉर्नर लाभले. यातील शेवटचा कॉर्नर सत्कारणी लावत गुरजीतने भारताला सहाव्या मिनिटाला आघाडीवर नेले.
पहिल्या सत्राच्या अंतिम मिनिटांत मलेशियाने प्रतिआक्रमणाचा प्रयत्न केला. परंतु, भारताच्या दक्ष बचावफळीने त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरविले. दुसर्या सत्रात मलेशियाने बरोबरीचा तर भारताने आघाडीसाठी मेहनत घेतली. परंतु, या सत्रात गोल होऊ शकला नाही. मघ्यंतरापर्यंत भारतीय संघ १-० असा आघाडीवर होता.
मध्यंतरानंतरच्या सत्रात नेहा गोयल हिचा गोल पंचांनी नाकारला. चेंडू गोलजाळीत जाताना पूनम राणीच्या पायाला लागल्याने पंचांनी हा गोल अवैध ठरवला. भारतीय संघ गोल नांेंदविण्याच्या प्रयत्नात असताना ३८व्या मिनिटाला मलेशियाला पेनल्टी कॉर्नरचा लाभ झाला. हा कॉर्नर सत्कारणी लावताना मलेशियाने गोल नोंदवून बरोबरी साधली. बरोबरीचा आनंद मलेशियाला अधिक वेळ उपभोगता आला नाही. गुरजीत कौरने आपल्या दुसर्या पेनल्टी कॉर्नरवर गोल करचाना मलेशियाच्या गोलरक्षकाच्या डोक्यावरून चेंडूला जाळीची दिशा दाखवली.
तिसर्या सत्रात अखेर भारतीय संघ २-१ असा आघाडीवर होता. चौथ्या व शेवटच्या सत्रात सामना पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकला. जागतिक क्रमवारीत १०व्या स्थानावरील भारताने या सत्रात मलेशियाच्या बचावफळीच्या ठिकर्या उडवताना दोन गोल केले. भारताचा पुढील सामना रविवारी इंग्लंडविरुद्ध होणार आहे.