माहेरवाशीण चैत्रगौरी

0
552

–  सौ. दीपा जयंत मिरींगकर

चैत्र महिना म्हणजे वसंतोत्सव. झाडांवेलींवर येणारी पोपटी पालवी, जवळूनच ऐकू येणारी कोकिळेची कुहुकुहु, तर कुठे लेकुरवाळा फणस. जंगलातील चारा आणि चुन्नांचा, काळ्या मैनेचा म्हणजे करवंदांचा मेवा. सगळा निसर्ग आपले नवरंग, नवचैतन्य फुलवत जणू नव्या सृष्टीसाठी तयार होत असतो. याच वेळी रस्त्यावर फुललेला सोनपिवळा सोनबहावा आणि लालूस पलाश, त्याचबरोबर लाल केशरी गुलमोहर असा सारा रंगपसारा लेऊन धरा वाट पाहते ती आपल्या लेकीची म्हणजे प्रत्यक्ष गौरीची. काही घरात हिची अन्नपूर्णा म्हणूनही पूजा केली जाते. ही या अशा वेळी माहेरपणाला येते आणि चक्क तेहतीस दिवस घराघरात आनंद, सुख, समृद्धीची बरसात करते. प्रत्यक्ष गौरीला माहेरी यावेसे वाटते एवढा या ऋतुराज वसंताचा महिमा. याच महिन्याला ‘मधुमास’ असे आणखी आणि समर्पक असे नावही आहे.

एकीकडे जाई-जुई, चमेली आणि मोगरा आपल्या पांढर्‍या शुभ्र रंगाने आणि मनभावन सुगंधाने आसमंत बहरून टाकत असतात. समृद्धीची स्वप्ने झाडाझाडांवर फळा-फुलांच्या रूपाने येत असतात. अगदी चिमुकल्या झाडापासून ते वठलेल्या वृक्षापर्यंत सगळे आपली प्राणशक्ती जागृत करत पशू, पक्षी, मानव या सार्‍यांसाठी आपला मेवा सादर करतात. बाहेरच्या रणरणत्या उन्हात ही पालवी, नवोन्मेषाची, उल्हासाची बरसात निसर्ग कोणत्या हेतूने करतो तर निर्मितीच्या. अवघी सृष्टी बहरते फुलते फळते ती याच भावनेने. आपल्या हिंदू वर्षात प्रत्येक महिन्याचे एक एक वैशिष्ट्य असते. त्यात चैत्र हा पहिला महिना. श्रावण महिना हिरवागार मानला जातो आणि असतोही. पण तो वरुण राजाच्या कृपेनंतर. पावसाच्या थेंबाशिवाय मातीतील अंगीभूत ओलाव्यातून बहरणारा निसर्ग चैत्रातच पाहावा. डॉ. सरोजिनी बाबर यांनी आपल्या ‘गावाकडचे सण’ या पुस्तकात या महिन्यासाठी ‘सृजनवेळ’ असा अगदी सार्थ शब्द वापरला आहे. याच महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याला ब्रह्मदेवाने सूर्योदयाला सृष्टी निर्माण केली असे मानतात.

अशा या सुगंधी, रम्य वातावरणात माहेरवाशीण येते ती प्रत्यक्ष गौरी! सार्‍या माता भगिनींची सखी. आपल्या लेकीसारख्या या देवतेलाही आपल्या घरी माहेरपण करणारी आपली भारतीय संस्कृती. आजही कालमानानुसार बदलत्या स्वरूपात का होईना पण काही प्रथांचे पालन केले जाते. पूर्वापार ब्राह्मण समाजातील घरात एक छोटा झोका आणि गौरीचा मुखवटा असतो. हिरव्यागार साडीत तिची स्थापना केली जाते. तिला घरातील नथ, वाकी, लक्ष्मीहार इ दागिने घातले जातात.आणि नटून सजून झोक्यावर बसून ही माहेरवाशीण आपल्या सख्यांची वाट पाहते. तिच्या केसात माळलेली मोगरीची वेणी किंवा जाईजुईचा गजरा म्हणजे हिरव्या साडीशी खुलणारी रंग संगती. गळ्यात अबोलीचा हार, आजूबाजूला जांभळी, गुलसर, पिवळी कोरांटी, गुलाबी पांढरी मधुमालती आणि अशीच अनेक रंगीबेरंगी फुलांची सजावट. या रंगोत्सवात गौरीला माहेरपण वाटले तर नवल ते काय? आणि तिच्या नैवेद्याचे वर्णन ते काय करावे ? पिवळी पोपटी आंबा डाळ, लालचुटुक कलिंगडाची फोड, काळी करवंदे, आतून गुलाबी असलेल्या पोपटी पेरूची फोड, पिस्ता रंगाची चुन्ने, तपकिरी काळी चारे, केशरी आंब्याची शीर, पिवळे रसरशीत गरे आणि सोबतीला केशरी आंब्याचे किंवा कोकम रंगी रातांब्याचे पन्हे. या पन्ह्यातही गूळ, जिरे वेलची असे सारे चवीसाठी, वासासाठी, आणि आरोग्यासाठी घातलेले असते. या पन्ह्याच्या नुसत्या आठवणींनीही जिभेला पाणी सुटते. या रानमेव्याची रंग आणि सुगंध संगती अगदी पाहण्यासारखी. त्यात आंबट, तिखट, खोबरे घातलेली आणि झणझणीत हिंगाची फोडणी दिलेली आंबा डाळ हिरव्यागार पानावरून समोर आली की पाहतच राहावे असे वाटते. आमच्या लहानपणी आम्ही पाहिलेले, भोगलेले हे सुख आजकालच्या पिढीला मिळत नाही याची खंत आणि पुष्कळ वेळा अगतिकता वाटते.

अंगणात शोभणारे चैत्रांगण
याच्याच जोडीला अंगण सजते ते चैत्रांगणाने. आजकाल अंगण राहिले नाही. अंगणाचे सुखही नाही, पण चैत्र गौरीच्या हळदी कुंकवाला एक दिवस तरी त्या घरात, अंगणात ही रांगोळी आजही पाहायला मिळते. दोन गौरी मध्यभागी, तिच्या बाळांना एक पाळणा, आजूबाजूला चंद्र सूर्य, चांदणी, करंडा, फणी, मंगळसूत्र, अशी सौभाग्याची प्रतीके, गौरीला वारा घालणारे दोन पंखे, याचबरोबर शंख, चक्र, गदा, पद्म, गोपद्म, कमळ या पारंपरिक शुभचिन्हांसाठी ठरावीक जागा असते. शंकराची त्रिशूळ, डमरू ही आयुधे आणि खाली तुळशी वृंदावन, नाग, गरुड, ऐश्वर्य दाखविणारा हत्ती, याचबरोबर गौरीच्या ओटी भरण्यासाठी खण नारळ, केळी असेही काढले जाते. देवीसाठी समई, आंब्याची कुयरी आणि ममतेचे प्रतीक ते गाय वासरू. कासव, स्वस्तिक, लक्ष्मीची पावले, गणपती, सरस्वती, छोटी पणती असे सारे शुभ चिन्हे मिरवणारे ते चैत्रांगण. स्वच्छ सारवलेल्या अंगणात जर चैत्रांगण रेखलेले दिसेल तर पाहणार्‍याची पावले नकळत थबकलीच पाहिजेत. या रांगोळीत प्रदेशानुसार रितीभाती प्रथेप्रमाणे या शुभ चिन्हांची जागा बदलते, काही वाढतात, कमी होतात पण तरीही चैत्रांगण सुंदर दिसतेच.

शेजार पाजारच्या माता भगिनी उन्हे उतरताना नटून सजून निवांतपणे हळदी कुंकवाला येत असत. येणारी भगिनी बाहेर लागलेल्या उन्हाच्या झळा विसरून रांगोळीचा अंगणातील रंग लेऊन येते ती गौरीपुढे. माहेरवाशीण गौरी अगदी प्रेमळ नजरेने पहात त्यांचे स्वागत करते. झुल्यावर झुलत नजरेनेच ख्याली खुशाली घेते. शांतपणे बसल्यावर समोर येते आंबाडाळ, रानमेवा आणि थंडगार पन्हे. शांतपणे आस्वाद घेईतो गृहिणी मानाचे हळदी कुंकू लावते, केसात माळायला सुगंधी फुले देते आणि मग ओल्या हरभर्‍याची ओटी भरते.

चैतन्यमयी वसंत
चैतन्यमयी वसंत ऋतू आणि बहरलेल्या आम्रमंजिर्‍या, जोडीला कोकीळ कूजन हे म्हणजे स्वर्गाचे वर्णन असावे असे वाटते. आंब्याच्या झाडाखाली पडलेला तो गुलाबी तुरा असलेला चिमुकल्या मंजिर्‍यांचा सडा. तो गुलाबी रंग आजवर मला मानवनिर्मितीत कोठेही पाहायला मिळाला नाही. ना चित्रात ना कपड्यात. मऊसर मखमली असा तो गुलाबी रंग आणि आजूबाजूला परीक्षा संपल्यामुळे फिरत उनाडक्या करीत, काजूचे बोंडू खाऊन त्याचे डाग कपड्यावर ओघळून घेत, आंब्याच्या झाडावर दगड मारीत पाडून त्या कच्च्या कैर्‍या मिटक्या मारीत खात फिरणारी मुलांची टोळकी हे आजकाल दुर्मीळ असे दृश्य झाले आहे.
गेले ते दिन..

उन्हाळी सुट्‌ट्या, अंगणात सडा सारवण, पापड, कुरड्या, सांडगे, फणसाची आंब्याची साटे, ते वाळवण राखण्यासाठी मुलांची फौज, हळूच नजर चुकवून चव पाहण्यासाठी न राहवून एखाद्या पापडाचा मोडलेला तुकडा, त्यासाठी आईचा ओरडा आणि आजीचा ‘खाऊ दे नाऽऽऽ लहानच तर आहे. पुरे… नको रागावू!’ अशी नातवाची बाजू घेणे. हे सारे आता कालौघात वाहून गेले असे वाटू लागले आहे. खूप पूर्वी, लहानपणी आम्ही उन्हाळी सुट्टीत वालावल (सिंधुदुर्ग, कुडाळ तालुका) येथे असायचो. तिथे घरात आणि आजूबाजूला आंबे, फणस सगळे भरगच्च. आणि रोज कोणाकडे तरी चैत्रातील हळदीकुंकू. मग आई, काकू आणि बाकीची बच्चे कंपनी असे सारे डोंगरावरून, तळ्याच्या काठाने, शेताच्या बांधावरून, अग्निहोत्री, पुजारी, उपाध्ये, पुराणिक, स्वरमंडळी, कशाळीकर अशा अनेक घरात जायचो. साधी सुधी मातीच्या जमिनीची ती घरे, सुंदर रेखीव गौरीची आरास, समोर पानावर आंबट तिखट आंबाडाळ, आंबा गरे, आणि मुख्य म्हणजे थंडगार पन्हे. अंगणात आणि गौरीसमोर काढलेली सुबक साधी रांगोळी आणि चैत्रांगण. यात कोणती आकृती कमी आहे, वेगळी आहे, ते पहायचे आणि हळूच एकमेकींना दाखवायचे. मग काकू, आई डोळे मोठे करून गप्प बसवायच्या. आमच्या घरापासून ही सारी घरे खूप दूर होती. ते अंतर किती होते ते आज आठवते आहे. कित्येक किलोमीटर चढाव, उतार, खडबडीत रस्ता, बांधघाटी, असे अंतर सहज चालत बोलत मजेत जात असू. हे सारे पुढच्या पिढीला दाखवू शकलो नाही ही आमच्या पिढीची मोठी खंत आणि ती कायमचीच राहील.

गेट टुगेदर..?
आपल्या सगळ्या रिती भाती पर्यावरण पूरक होत्या आणि आहेतही. त्यासाठी मुद्दाम काही करायची गरज पूर्वजांना वाटत नव्हती. इतके हे सहज होत असे. सगळे कसे अगदी निसर्गाशी नाते सांगणारे. आपल्या पर्यावरणाशी आपले नाते अगदी पूर्वापार होते, म्हणूनच हा फराळ केळीच्या पानावरून किंवा पानाच्या द्रोणातून येतो. या हळदी कुंकवाला कसले वाण नाही, भेटवस्तू नाही, कुठलाच बडेजाव नाही. आपल्या परिसरात मिळणारी फुले, पाने आणि फळे. त्याचाच फराळात समावेश. पूर्वीच्या घरात महिलांचे बाहेर जाणे होत नसे. या निमित्ताने एकमेकींना भेटायचे, बोलायचे, हसायचे. शिवाय माहेरी जायला एक संधी. खरे तर त्याकाळचे आजचे गेट टुगेदरच होते ते…आजकाल आजूबाजूला सारे कसे वेगात चालले आहे. या वेगात आपल्याला जमवून घेताना दमछाक होते तर यासारख्या प्रथा कोण पाळणार?? पण एखाद्या रविवारी चारच मैत्रिणींना बोलवून जर आपण असे हळदी कुंकू केले तर पुढच्या पिढीला त्या कळतील. अनुभवता येतील.

मातीच्या अंगणाबरोबर चैत्रांगण सुद्धा गेले असे वाटतानाच एका फ्लॅटच्या दारात पाहिले आणि मनातील चैत्र जागा झाला. अखेर मनात हे सारे जागे ठेवायलाच हवे. कारण गौरीला माहेरपण करणे हे एक निमित्त. निसर्गातील फळा-फुला-पानांचे रंग, रूप, चवी अनुभवायला आणि लेकी बाळीना दाखवायला की या आपल्या परंपरा अगदी पर्यावरणपूरक- प्रेमी आहेत. कुठे प्लास्टिक नाही, प्रदूषण नाही. सारे कसे मातीतून येते आणि मातीलाच मिळते !!!!!!!!!