ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे आजपासून २१व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला प्रारंभ होत आहे. १५ एप्रिलपर्यंत चालणार्या या स्पर्धेत अनेक देशांचे खेळाडू आपले कौशल्य पणाला लावण्यासाठी सज्ज झाले आहेत. आज दुपारी ३.३० वाजल्यापासून स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात होणार असून स्पर्धेतील सामने गुरुवापासून प्रारंभ होतील.ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर गेलेल्या भारतीय चमूकडून यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत धमाकेदार कामगिरीची आशा आहे. या स्पर्धेत भारताने २२७ खेळाडूंचे पथक पाठविले असून यात २७ नेमबाजांचा समावेश आहे. नेमबाजीसह बॉक्सिंग, बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी व ऍथलेटिकमध्ये भारतीय खेळाडूंना पदकाचे दावेदार मानले जात आहे. भारतीय पथकामध्ये नेमबाज जीतू राय, बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल, एचएस प्रणॉय, पी. व्ही. सिंधू, नेमबाज मनू भाकर व कुस्तीपटू सुशील कुमार, साक्षी मलिक या स्टार खेळाडूंचा समावेश आहे.
भारतामध्ये २०१० मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत यजमान या नात्याने ६१९ खेळाडूंचे जम्बो पथक उतरविले होते. त्यावेळी भारताने ३८ सुवर्णांसह १०१ पदकांची कमाई केली होती. त्यानंतर २०१४ च्या ग्लास्गोतील राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने २१५ खेळाडूंचे पथक पाठविले होते. त्यावेळी १५ सुवर्णांसह ६४ पदके भारताने पटकावली होती.
स्पर्धेविषयी थोडक्यात
यंदाच्या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा, समारोप सोहळा व ऍथलेटिक क्रीडाप्रकार गोल्ड कोस्टमधील कारेरा स्टेडियमवर होणार आहेत. ट्रॅक सायकलिंग व शूटिंग क्रीडाप्रकार ब्रिस्बेनमध्ये तर बास्केटबॉलमधील प्राथमिक फेर्या क्वीन्सलँडमधील टाऊन्सविल व केर्न्स येथे होणार आहेत. एकूण १८ क्रीडाप्रकारांचा या स्पर्धेत समावेश आहे. यात ऍथलेटिक, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, लॉन बॉल, नेटबॉल, रग्बी सेव्हन्स, स्क्वॉश, जलतरण व वेटलिफ्टिंग या १० प्रमुख प्रकारांचा तर बास्केटबॉल, बीच व्हॉलिबॉल, सायकलिंग, जिम्नॅस्टिक, शूटिंग, टेबल टेनिस, ट्रायथ्लॉन व कुस्ती या ८ ऐच्छिक क्रीडाप्रकारांचा समावेश आहे. ७१ देश व प्रदेशातील ६६०० पेक्षा जास्त क्रीडापटू २७५ सुवर्णपदकांसाठी झुंजताना दिसणार आहेत.