डॅरेन लेहमन यांचा राजीनामा

0
123

डॅरेन लेहमन यांनी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. डॅरेन लेहमन यांनी राजीनामा दिला असून दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा चौथा आणि अंतिम कसोटी सामना हा त्यांचा अखेरचा सामना असेल. विशेष म्हणजे चेंडूशी छेडछाड प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून क्लीन चिट मिळालेली असतानाही त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला.

ऑस्ट्रेलियाला नवा प्रशिक्षक मिळण्याची हीच योग्य वेळ असल्याची प्रतिक्रिया त्यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली आहे. खेळाडूंना निरोप देणे हे सर्वात कठीण काम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राजीनाम्याचा आपला वैयक्तिक निर्णय असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मिकी आर्थर यांना बडतर्फ केल्यानंतर लेहमन २०१३ साली ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक झाले होते. त्याच्याच मार्गदर्शनाखाली २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियाने चौथ्यांदा विश्‍वचषक जिंकला होता.

लेहमनच्या जागी ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटी सलामीवीर जस्टीन लँगरचे नाव प्रशिक्षकपदासाठी आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगचे नावही यासाठी चर्चेत आहे.