भारताची इंग्लंडवर मात

0
130

तिरंगी मालिकेतील अखेरच्या साखळी सामन्यात भारताने इंग्लंडला ८ गड्यांनी नमवून मालिकेतील पहिला विजय संपादन केला. इंग्लंडने विजयासाठी ठेवलेले १०८ धावांचे लक्ष्य भारताने २६ चेंडू राखून गाठले. इंग्लंडने यापूर्वीच स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला असून भारताचे आव्हान या सामन्यापूर्वीच आटोपले होते. त्यामुळे आत्मविश्‍वास उंचावण्याखेरीज या विजयाचा टीम इंडियाला अपेक्षित फायदा झालेला नाही.

सलामीवीर स्मृती मंधानाने मालिकेतील आपला झकास फॉर्म कायम राखताना ४१ चेंडूंत नाबाद ६२ धावांची खेळी केली. वैयक्तिक १३ धावांवर टॅमी ब्युमॉंटने मिडविकेटवर जीवदान दिल्यानंतर स्मृतीने याचा पुरेपूर लाभ उठवला. मिताली राज (६) व जेमिमा रॉड्रिगीस (७) यांच्या पतनानंतर मंधाना व कौर यांनी तिसर्‍या गड्यासाठी ६० धावांची अविभक्त भागीदारी रचली. भारताच्या फिरकीपटूंनी मालिकेत प्रथमच प्रभावी कामगिरी करत ९ गडी बाद केले. सामनावीर ठरलेल्या अनुजा पाटीलने ३, तर राधा यादव, दीप्ती शर्मा व पूनम यादवने प्रत्येकी २ बळी घेतले. शनिवार ३१ रोजी ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यात मालिकेचा अंतिम सामना होणार आहे.

धावफलक
इंग्लंड ः डॅनियल वायट झे. व गो. शर्मा ३१, ऍमी जोन्स झे. राज गो. वस्राकर १५, टॅमी ब्युमॉंट झे. गोस्वामी गो. पूनम १०, नॅट सिवर झे. भाटिया गो. पाटील १५, हिथर नाईट झे. भाटिया गो. राधा ११, फ्रान विल्सन यष्टिचीत भाटिया गो. शर्मा १२, ऍलिस डेव्हिडसन झे. गोस्वामी गो. पूनम ३, केटी जॉर्ज पायचीत गो. राधा ०, डॅनियल हेझल झे. कौर गो. पाटील ३, टॅश फेर्रांट पायचीत गो. पाटील २, आलेक्झांड्रा हार्टले नाबाद २, अवांतर ३, एकूण १८.५ षटकांत सर्वबाद १०७
गोलंदाजी ः झुलन गोस्वामी २-१-११-०, पूजा वस्राकर २-०-१७-१, अनुजा पाटील ३.५-०-२१-३, राधा यादव ३-०-१६-२, दीप्ती शर्मा ४-०-२४-२, पूनम यादव ४-०-१७-२
भारत ः मिताली राज झे. डेव्हिडसन गो. हेझल ६, स्मृती मंधाना नाबाद ६२ (४१ चेंडू, ८ चौकार, १ षटकार), जेमिमा रॉड्रिगीस झे. फेर्रांट गो. हेझल ७, हरमनप्रीत कौर नाबाद २०, अवांतर १३, एकूण १५.४ षटकांत २ बाद १०८
गोलंदाजी ः टॅश फेर्रांट २-०-१४-०, केटी जॉर्ज १-०-१६-०, डॅनियल हेझल ३-०-१७-२, हिथर नाईट १-०-९-०, आलेक्स हार्टले ३.४-०-२३-०, नॅट सिवर २-०-१०-०, ऍलिस डेव्हिडसन १-०-१०-०, डॅनियल वायट २-०-९-०