‘मोपा’च्या जमीन मालकांना खूपच कमी भरपाई रक्कम

0
145

>> प्रती चौ. मी. ६ हजार द्यावे ः कॉंग्रेस

सरकारने मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमिनी ताब्यात घेतलेल्या जमीनदारांना कमीत कमी प्रति चौरस मीटर ६ हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, असा दावा गोवा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक यांनी पत्रकार परिषदेत केला.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोपा विमानतळ जमीनग्रस्तासाठी तीनपट नुकसान भरपाईचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर बोलताना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाईक म्हणाले की, राज्य सरकारने मोपा विमानतळासाठी जमिनी नाममात्र दरात ताब्यात घेतल्या आहेत. आता जमीन मालकांना तीनपट नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारकडून जमीन मालकांना देण्यात येणारी नुकसान भरपाई खूपच कमी आहे. आजच्या घडीला मोपा येथील जमिनीचा बाजार दर कमीत कमी १५०० रुपये प्रति चौरस मीटर एवढा आहे. त्यामुळे जमीनदारांना प्रति चौरस मीटर ६ हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, असेही नाईक यांनी सांगितले.
मोपा विमानतळाच्या जागेतील २१ हजार झाडे कापण्यासाठी योग्य प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नाही. कापण्यात येणार्‍या प्रथम झाडावर क्रमांक नोंद करण्याचे बंधन आहे. परंतु, वन अधिकार्‍यांनी कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष केले आहे. झाडे कापण्याबाबतची तक्रार ऐकून घेण्यास सुध्दा संबंधित वन अधिकार्‍याने नकार दिला, असेही नाईक यांनी सांगितले.
कोंकण रेल्वे महामंडळाच्या धर्तीवर मोपा विमानतळ जमीनग्रस्तासाठी जीएमआर कंपनीने कायम स्वरूपी नोकर्‍या दिल्या पाहिजेत. तसेच जमीनग्रस्तासाठी आवश्यक साधन सुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत, असेही नाईक यांनी सांगितले.