बंदोबस्तात ‘दाबोळीवर’ मॅक्सी कॅब सुरू

0
177

कडक पोलीस बंदोबस्तात दाबोळी विमानतळावर कालपासून कार रेंटल, मॅक्सी कॅब सेवा सुरू करण्यात आली. युनायटेड टॅक्सीमॅन युनियनतर्फे दाबोळी विमानतळावर उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक तसेच इतर संबंधित अधिकार्‍यांना गराडा घालून कार रेंटलच्या नावाखाली पॉईंट टू पॉईंट प्रवासी वाहतूक करण्यास आमचा विरोध कायम असणार याचा पुनरुच्चार या युनियनतर्फे करण्यात आला. दिवसभरात १० रेंटल कार दाबोळी विमानतळावरून सोडल्याचे सांगण्यात आले. कोणत्याही अनुचित घटनेविना ही सेवा सुरू झाली.

गेल्या तीन महिन्यांपूर्वी टॅक्सी व्यवसायिकांनी विरोध केलेल्या दाबोळी विमानतळावरील ‘रेंट अ कार’ हा ताज इंडिया टूरचा मॅक्सी कॅब कार रेंटल काऊंन्टर कालपासून कडक पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आला. या काऊंटरला शनिवारी मुरगावचे उपजिल्हाधिकारी महादेव आरोंदेकर यांनी युनायटेड टॅक्सीमेन युनियनचे पदाधिकारी तसेच इतर शासकीय अधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेऊन या काऊंटरला टॅक्सी व्यावसायिकांनी विरोध करू नये यासाठी प्रशासकीय पातळीवर ठोस पावले उचलली. त्यानुसार काल सकाळपासून दाबोळी विमानतळावर सुमारे ३०० पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता.

दरम्यान, दुपारी १२ वाजता दाबोळी विमानतळावर विमाने उतरायला सुरुवात झाल्यानंतर कार रेंटलची पहिली गाडी एकाच प्रवाशाला घेऊन गेल्याने काळ्या पिवळ्या टॅक्सी युनियनतर्फे काही वेळ येथे उपस्थित असलेल्या उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक तसेच आरटीओ यांच्याशी याविषयी बातचीत करून कायद्याने मॅक्सी कॅब ७+१ अशा प्रवाशांना घेऊन जाणे सोयीस्कर असते. पण हा व्यवसाय सरळ आमच्या पोटावर येण्याचा ठरतोय असे सांगितले असता याविषयी लेखी तक्रार देण्याचे उपजिल्हाधिकार्‍यांनी युनियनला सुचविले. तसेच सदर काऊंटर बेकायदेशीररित्या प्रवासी वाहतूक करत असल्यास त्यांच्यावर कारवाई करू व सदर काऊंटर बंद पाडू असे आश्‍वासन यावेळी दिले. यावेळी टॅक्सी युनियनचे शासकीय अधिकार्‍यांना गराडा घालत असल्याचे पाहून पोलीस उपअधीक्षक सुनिता सावंत यांनी त्यांना पांगवण्याचा आदेश दिला.