ग्रेटर पणजीतून पंचायतक्षेत्र वगळण्याविषयी आज बैठक

0
90

ग्रेटर पीडीए पणजीच्या मंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठक आज १९ रोजी होणार आहे. सांतआंद्रें व सांताक्रुझ मतदारसंघातील १० ग्रामपंचायतींचा ह्या नव्या पीडीएत समावेश करण्यास स्थानिक लोकांनी जोरदार विरोध केलेला असून त्या प्रश्‍नावर आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे.

नगर आणि नियोजन खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांना काल बैठकीसंबंधी विचारले असता ते म्हणाले की, सांताक्रुझ व सांतआंद्रे मतदारसंघातील ग्रामस्थांचे जे म्हणणे आहे ते आपण मंडळाच्या बैठकीत मांडणार आहे. १० पंचायतींतील ग्रामस्थांनी आपल्या पंचायती ग्रेटर पीडीएतून वगळण्याच्या मागणीवर मंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.

सांतआंद्रे मतदारसंघाचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा व सांताक्रुझ मतदारसंघाचे आमदार आंतोनियो फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखालील विविध पंचायतींचे सरपंच, पंच व ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी पर्वरी येथील मंत्रालयात जाऊन नगर आणि नियोजन खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांची भेट घेऊन सांताक्रुझ व सांतआंद्रे मतदारसंघ ग्रेटर पीडीए पणजीतून वगळण्याची मागणी केली होती. ह्यावेळी सरदेसाई यांनी ह्या ग्रामस्थांना ह्या पीडीएमुळे दोन्ही अविकसित मतदारसंघांचा कसा विकास होणार आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र, ग्रामस्थ ऐकायला तयार नसल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी त्यांचे जे काही म्हणणे आहे ते १९ रोजी पीडीए मंडळाच्या बैठकीत मांडण्याचे आश्‍वासन दिले होते. दरम्यान, दोन्ही मतदारसंघातील ग्रामस्थांनी येत्या ६ एप्रिल रोजी पणजीत एक भव्य मोर्चा आणण्याचा यापूर्वीच निर्णय घेतलेला आहे. सांतआंद्रें मतदारसंघाचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा व सांताक्रुझ मतदारसंघाचे आमदार आंतोनियो फर्नांडिस यांनी ग्रेटर पीडीए पणजीला विरोध करीत ह्या पीडीएच्या समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.