
एफसी गोवा संघाची हीरो इंडियन सुपर लीगमध्ये आज बुधवारी नेहरू स्टेडियमवर गतविजेत्या एटीकेविरुद्ध लढत होत आहे. चौथ्या मोसमात बाद फेरीचे आव्हान राखण्यासाठी निर्णायक विजयाचा गोव्याचा निर्धार आहे. जिंकल्यास गोवा चौथे स्थान गाठू शकेल. जमशेदपूरएफसीविरुद्ध त्यांना एका गुणाची आघाडी मिळालेली असेल.
यंदा सर्वाधिक आकर्षक खेळ करणार्या संघांमध्ये गोव्याचा समावेश आहे. मोहीम पुन्हा रुळावर आणण्यासाठी त्यांना तीन गुणांची गरज आहे. दुसरीकडे एटीकेला गेल्या सात सामन्यांत विजय मिळविण्यात अपयश आले असून त्यांना सहा पराभव पत्करावे लागले आहेत. ते केवळ एक बरोबरी साधू शकले. एटीके जास्तीत जास्त आठवा क्रमांक मिळवू शकते. त्यासाठी त्यांना उरलेले दोन्ही सामने जिंकावे लागतील. त्याचवेळी त्यांच्या खालील संघांचेही निकाल असे असून चालणार नाही. एटीकेसमोर रायन टेलर याचा अपवाद वगळता खेळाडूंच्या दुखापतीची समस्या नाही, पण मनोधैर्य नक्कीच कमी आहे. असे असले तरी गमावण्यासारखे काहीच नसून सहाय्यक प्रशिक्षक बस्ताब रॉय यांनी खेळ पाहण्यासारखा होईल असे सांगितले.
ते म्हणाले की, मनोधैर्याच्या संदर्भात आमचे पारडे जड नाही. वास्तविक परिस्थिती आमच्या बाजूने नाही, पण प्रेक्षकांना चांगला खेळ पाहायला मिळेल.
संघासाठी काय चुकले, या तपशीलात जाण्याची रॉय यांची तयारी नाही. त्यांनी स्पष्ट केले की, काय चुकले याची चर्चा करण्याची ही योग्य वेळ नाही. मोसम संपल्यानंतर ते होईल. शेवटच्या १५-२० मिनिटांत काहीतरी चुकीचे घडते. एफसी गोवा संघ संतुलित आहे. ते बाद फेरीच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे आव्हान अवघड असेल. आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करू.
गोव्याने पुण्यावर ४-० असा दणदणीत विजय मिळविला. त्यामुळे त्यांचा संघ फॉर्मात आहे. त्यांचे बहुतेक प्रमुख खेळाडू योग्य वेळी फॉर्मात आले आहेत. फेरॅन कोरोमीनास याने दोन गोलांचे योगदान दिले, तर मॅन्युएल लँझारोटे आणि ह्युगो बौमौस यांनी प्रत्येकी एक गोल केला.
गोव्याचे मुख्य प्रशिक्षक सर्जिओ लॉबेरा म्हणाले की, मागील सामन्याप्रमाणे खेळ झाला तर ते भारीच होईल. जिंकण्यासाठी आम्हाला काही क्षेत्रांत योग्य खेळ करावा लागेल. आम्हाला चांगला खेळ करून क्लीन शीट राखण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. अनेक गोष्टी अचूक कराव्या लागतील. आम्हाला कशाही प्रकारे जिंकायचे नाही. आमच्या स्थितीनुसार हा सामना फार महत्त्वाचा आहे. एवढी मजल मारण्यासाठी आम्ही बराच संघर्ष केला. आमची आगेकूच पूर्णपणे आमच्या हातात आहे. पुढील दोन सामने झाले असतीर तेव्हा आपला संघ उपांत्य फेरीत गेल्याचा आनंद आमच्या चाहत्यांना मिळालेला असेल.
बुधवारी खेळ सुरु होईल तेव्हा आधीचे रेकॉर्ड आणि कामगिरीला काहीच अर्थ नसेल. सामन्यातील स्थिती नवी असेल, हे आपल्या संघाने लक्षात घ्यावे असेही लॉबेरा यांनी नमूद केले.