मुख्यमंत्री पर्रीकरांच्या प्रकृतीत सुधारणा

0
146

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार्‍या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.

रविवारी रात्री मुख्यमंत्री पर्रीकर यांना डिहायड्रेशनचा त्रास जाणवू लागल्याने गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री पर्रीकर उपचारांना योग्य प्रतिसाद देत आहेत. मुख्यमंत्री पर्रीकर यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यांना हॉस्पिटलमधून लवकरच डिस्चार्ज मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्री पर्रीकर यांना बांबोळी येथील गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती राज्यभर पसरल्याने भाजप नेते, तसेच इतर पक्षाचे नेते, आमदार आणि हितचिंतकांनी हॉस्पितळमध्ये सोमवारी एकच गर्दी केली. सभापती डॉ. प्रमोद सावंत, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, आमदार प्रवीण झांट्ये, माजी आमदार दामू नाईक, आरोग्य मंत्री विश्‍वजीत राणे व इतरांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.

मुख्यमंत्री पर्रीकर यांना पुन्हा एकदा हॉस्पितळमध्ये दाखल करण्यात आल्याने हितचिंतकात चिंतेचे वातावरण पसरले आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून राज्यातील हितचिंतकाकडून जप, हवन, प्रार्थना केली जात आहे.

मुख्यमंत्री पर्रीकर मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये पोट दुखीवर सात दिवस वैद्यकीय उपचार घेऊन अचानक गुरूवारी गोव्यात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. मुख्यमंत्री पर्रीकर यांना आजारातून बरे होण्यासाठी विश्रांतीची गरज आहे, असे मत राजकीय व्यक्ती आणि हितचिंतकाकडून व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी विश्रांती न घेता पुन्हा कामकाजाला सुरूवात केल्याने प्रकृतीवर ताण आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.