>> केंद्रीय मंत्री आठवलेंची पंतप्रधानांना सूचना
महाराष्ट्रातील मराठा समाज, गुजरातमधील पटेल व पटिदार, पंजाबमधील व हरियाणातील जाट आदी आरक्षणाची मागणी करणार्या समाजांना २५ टक्के आरक्षण देऊन आरक्षणाची एकूण टक्केवारी ७५ टक्क्यांवर न्यावी, अशी सूचना आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री रामदास आठवले यांनी काल पर्वरी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. वरील समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबियांना आरक्षण देण्यास हरकत नाही, असे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे म्हणणे आहे, असे आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले. वरील समाजातील ज्या कुटुंबांचे वार्षिक आर्थिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबांना आरक्षणाचा फायदा देण्यात यावा, अशी सूचना आपण केलेली असून तसे केल्यास सगळ्याच ज्ञातीतील गरीब लोकांचा विकास साधण्यास मदत होणार असल्याचे आपण मोदी यांना सांगितले असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, अन्य राज्यांतून १९६८ पूर्वी येऊन गोव्यात स्थायिक झालेल्या अनुसूचित जाती, जमाती व ओबीसींना आरक्षणाचा फायदा मिळायला हवा. पण गोव्यात तो मिळत नसल्याचे सांगून तो मिळावा यासाठी आपण गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पत्र लिहिणार असल्याचे आठवले यांनी यावेळी सांगितले. अनुसूचित जाती, जमाती व ओबीसी आरक्षणाची टक्केवारी कमी न करता वरील जातींना आरक्षण देण्यास भारतीय रिपब्लिकन पार्टीचा पाठिंबा आहे, असेही यावेळी बोलताना आठवले यांनी स्पष्ट केले.
भाजपला मते दिल्यास आरक्षण मिळेल
येत्या लोकसभा निवडणुकीत जर पटिदार, पटेल, जाट, मराठा आदी जातीतील लोकांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार जर सत्तेवर आणले तर वरील सर्व जातींना आरक्षण मिळवून देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.