– प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट
पुढे आठ-दहा दिवस कार्यक्रम-अधिकारी, त्यांना सहकार्य करणारे अध्यापक, स्वयंसेवक यांनी श्रम घेतले, घाम गाळला आणि एका जिद्दीनं घराचं बांधकाम पूर्णत्वाकडे नेण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. दरदिवशी त्यांच्यामध्ये दिसणारं मानसिक समाधान आणि काहीतरी कायमस्वरूपी निर्माण करण्याची जिद्द मनाला सुखावून जात होती.
ज्ञानप्रसारक मंडळाच्या उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यपदाची धुरा सांभाळतानाही सामाजिक ऋणाची भावना मी सतत मनात बाळगली. सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन म्हणून आणि समाजाचे उत्थान घडवणारे माध्यम म्हणून आदर्श शैक्षणिक संस्थांना अनन्यसाधारण महत्त्व आहे, याची जाण ठेवून शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच इतर समाजाभिमुख कार्यक्रमही राबवण्याचा प्रयत्न केला. विद्यालयीन अभ्यासक्रम शिकवत असताना ज्या समाजात जन्मलो, वाढलो त्या समाजाचं आपण काही देणंही लागतो याची जाणीव मुलांना व्हावी या उद्देशाने अनेक विधायक कार्यक्रमही विद्यार्थी, पालक, सहकारी, अध्यापक, व्यवस्थापन मंडळ, शासन यांच्या सहकार्याने राबवण्याचा प्रयत्न केला. नवीन पिढी घडवण्याच्या बाबतीत आमची संस्था अग्रेसर असावी, समाजाच्या नवनिर्माणात आमच्याही संस्थेचा खारीचा वाटा असावा, हा सद्हेतू यामागे आहे हे सविनय विशद करू इच्छितो!
दरवर्षी आमच्या उच्च माध्यमिक विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक/स्वयंसेविका खास वार्षिक शिबिरासाठी एखादं गाव निवडून परिसर साफसफाई, रस्ते, कच्च्या पायवाटा यांची दुरुस्ती आदी किरकोळ कामांबरोबरच ग्रामस्थांशी स्नेहसंबंध प्रस्तापित करणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं, एखाद्या विषयावर सर्वेक्षण करणं, आरोग्य शिबिरं आयोजित करणं आदी कार्येही हाती घेत असतात. आठ-दहा दिवसांच्या या शिबिरात श्रमाचं महत्त्व आणि समाजकल्याण यांचे धडे दिले जातात. सामाजिक जबाबदारीची जाणीव त्यांना करून दिली जाते. त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला पूर्ण वाव दिला जातो. समाजाप्रती पार पाडावयाच्या त्यांच्या कर्तव्याची शिकवण त्यांना या शिबिरातून मिळत असते.
सद्ययुगात नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती मानवी जीवनाचा अविभाज्य घटक होऊन राहिली आहे. नियती आपला खेळ खेळत असते. ती कोणावर कधी रुसेल सांगता येत नाही. आपत्तीच्या वणव्यात होरपळणार्या एखाद्या कुटुंबाला सावरणंही अनेकवेळा कठीण होऊन बसतं. मग तुमची सारी सहानुभूती, माणुसकी, परोपकारी आणि सेवाभावी वृत्ती सारं सारं तोकडं पडतं. असहायपणे ते पाहात राहण्यापलीकडे माणूसही काही करू शकत नाही यांची खंत मात्र मनात सलत राहते, मनाला बोचत राहते. तरीदेखील चार हात एकत्र आले तर ओढवलेल्या आपत्तीशीही श्रमदानानेही कशी टक्कर देता येते, नियतीशीही कसा संघर्ष करता येतो, आलेल्या संकटाला कसं तोंड देता येतं याचे धडेही मुलांना दिले पाहिजेत याची जाणीव शिक्षक म्हणून मी सतत मनात बाळगत आलो आहे. त्यामुळे असेल कदाचित, उगवे, पेडणे, बस्तोडा- बार्देस पंचायत क्षेत्रात उंचावरील डोंगराळ भागात असलेल्या स्मशानभूमीपर्यंत पायर्या बांधून देण्यापर्यंत स्वयंसेवकांच्या सहकार्याने कार्य हाती घेतले आहे.
असेच एकदा इ.स. २००४ मध्ये आमच्या उच्च माध्यमिक विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे आसगाव पंचायत क्षेत्रात शिबिर आयोजित करण्यात आले होते. आसगाव येथील युनियन हायकूलच्या इमारतीत स्वयंसेवक शिबिरार्थींचा तळ पडला होता. उच्च माध्यमिक विद्यालयात वाणिज्य, कला, शास्त्र, व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम सुरू झाल्यामुळे आणि उत्कृष्ट निकालांच्या परंपरेमुळे मुलांची संख्या हजारावर पोचली होती. उच्च माध्यमिक विद्यालयाने खास शिबिरात हाती घेतलेल्या प्रकल्पांवर युवा व्यवहार संचालनालय समाधानी असल्यामुळे राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत शिबिरात साडेतीनशे स्वयंसेवकांना सहभागी करून घेण्याची अनुभूती संचालनालयाने आम्हाला दिली होती. शिबिरार्थींच्या वाढीव संख्येमुळे एखादा आगळा-वेगळा प्रकल्प हाती घेण्याचा विचार कार्यक्रम-अधिकार्यांच्या सहमतीने मनात पक्का केला.
खास शिबिरापूर्वी मी कार्यक्रम-अधिकार्यांची बैठक घेतली. या शिबिरात एखादा भरीव आणि साधारणतः कायमस्वरुपी असा प्रकल्प हाती घ्यावा आणि त्यासाठी लोकप्रतिनिधी व नागरिकांचे सहकार्य मिळवावे असा विचार व्यक्त केला. आसगाव पंचायत क्षेत्रातील रहिवासी असलेल्या एका निराधार व गरीब विधवा महिलेचे राहते घर पाऊस व वादळी वार्यामुळे मोडले असून ती आपल्या लहानग्या दोन मुलांसह एक छोटीशी झोपडी उभारून वास्तव्य करीत असल्याचे त्याच पंचायत क्षेत्रात वास्तव्य करणारे प्रकल्पाधिकारी प्रा. रुईल्डो डिसौझा यांनी सांगितले असता सदर महिलेला पक्के घर बांधून देण्याची माझी कल्पना मी कार्यक्रम-अधिकारी व इतर अध्यापक सहकार्यांसमोर मांडली व तसा प्रस्तावही त्यांच्यासमोर ठेवला. माझी कल्पना व प्रस्ताव सर्वांनाच आवडला आणि त्यादृष्टीने शिबिरापूर्वीपासूनच आम्ही आमची तयारी सुरू केली. आमच्या उच्च माध्यमिक विद्यालयाचे वैशिष्ट्य म्हणजे फक्त कार्यक्रम अधिकारीच नव्हे तर इतर अध्यापकदेखील त्यांना सहकार्याचा हात पुढे करून कार्यरत राहतात. त्यामुळे स्वयंसेवकांवर नियंत्रण ठेवणे शक्य होते. सर्वजण जबाबदारी वाटून घेत असल्यामुळे कार्यक्रम अधिकार्यांवरील बोजाही कमी होतो. प्रकल्पाना चालना मिळते. सर्व कार्यक्रम सुरळीतपणे पार पडतात. ‘एकमेकां करू साहाय्य, अवघे धरू सुपंथ’ या उक्तीनुसार अध्यापकांमधील सामंजस्य, सहकार्य, संस्थेच्या उत्कर्षाची तळमळ आणि एकूण जबाबदारीची जाणीव त्यांना असल्यामुळेच काही विधायक गोष्टी घडत असतात. त्यातच संस्थेच्या व्यवस्थापनाचे सहकार्य मिळाले तर दुग्धशर्करा योग! ज्ञानप्रसारक मंडळाच्या व्यवस्थापन समितीचा सहकार्याचा हात सतत पुढे असल्यानेच अनेक समाजोपयोगी प्रकल्प आम्हाला हाती घेऊन पूर्ण करता आले हे निर्विवाद!
लगेच आमचे कार्यक्रम अधिकारी आणि अध्यापक आपल्या कामाला लागले. सरपंच आणि पंचायत सदस्य यांच्या सहकार्याने श्रीमती लक्ष्मी हळदणकर या निराधार आणि गरीब विधवा महिलेसाठी घर बांधून देण्याचं निश्चित झालं. कायदेशीर सोपस्कारांवरही विचार झाला. आमच्या विनंतीवरून माजी मुख्यमंत्री ख्रि. डॉ. विल्फ्रेड डिसौझा यांचे बंधू आणि शिक्षण क्षेत्रातील एक प्राचार्य, सुहृदयी मायकल डिसौझा यांनी मुंडकार कायद्याखाली सदर महिलेच्या घरासाठी जमीन मोफत दिल्याचं लिहून दिलं. त्यामुळे प्रकल्पासंबंधीचं आमचं काम अधिक सोपं झालं.
शिबिराच्या पहिल्याच दिवशी सशक्त, श्रम करण्याची तयारी असलेल्या स्वयंसेवकांचा गट तयार करण्यात आला. सुदैवाने त्यांतील दोन-तीन स्वयंसेवक गवंडी व्यवसाय करणार्या कुटुंबातील होते. त्यांच्या अनुभवाचा फायदा घेण्याचं ठरलं. घरात मानवी वास्तव्य राहणार असल्याने बांधकामात कोणताही दोष राहू नये यासाठी काळजी घेणं आवश्यक होतं. त्यामुळे अनुभवी गवंड्यांचे मार्गदर्शन घेण्याचा निर्णय झाला. आसगाव पठारावरील संस्थेच्या ‘कुशेनगर’ संकुलातील इमारतीचं बांधकाम करणारे एक कंत्राटदार श्री. सूर्या नाईक यांनी याकामी सहकार्य देण्याचं आश्वासन दिलं आणि त्यांचे पुत्र श्री. शेखर नाईक यांनी जातीने लक्ष घालून स्वयंसेवकांना मार्गदर्शन केलं.
पुढे मग आठ-दहा दिवस कार्यक्रम-अधिकारी, त्यांना सहकार्य करणारे अध्यापक, स्वयंसेवक यांनी श्रम घेतले, घाम गाळला, रक्त आटवलं आणि एका जिद्दीनं घराचं बांधकाम पूर्णत्वाकडे नेण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. दरदिवशी त्यांच्यामध्ये दिसणारं मानसिक समाधान आणि काहीतरी कायमस्वरूपी निर्माण करण्याची जिद्द मनाला सुखावून जात होती. कारण त्यातील काही मुलं वात्रट होती, खोडकर होती, विध्वंसक वृत्तीची होती. पण मला खात्री होती की या प्रकल्पामुळे त्या मुलांमध्ये आमूलाग्र बदल घडून येईल, विध्वंसक वृत्ती नाहीशी होईल. निर्मिती आणि विध्वंस यांतील फरक त्यांना या प्रकल्पामुळे कळेल. परोपकारी वृत्ती त्यांच्यामध्ये रुजेल, सामाजिक जाणीव आणि कर्तव्ये मूळ धरतील.
दररोज मी शिबिराला हजेरी लावत होतो. घराचा पाया खोदण्यापासून दगडावर दगड उभा राहताना प्रत्यक्ष पाहत होतो. सेवकांच्या हाता-पायांना होणार्या जखमा आणि वाहणारं रक्त यांना मी साक्षीदार होतो. विश्रांतीचा सल्ला नाकारून ‘जिद्द’ म्हणजे काय याचा धडा आम्हालाच शिकवण्याच्या इराद्यानं अधिक जोम लावून काम करीत होते आणि हे सारं पाहून मी थक्क होत होतो. जखमीना प्रथमोपचार करून डॉक्टरकडे पाठवत होते. झालेली जखम सामान्य आहे असं म्हणत पुन्हा हाती पिकास-फावडं घेणार्या स्वयंसेवकांची हाती घेतलेलं काम जीवाचीही पर्वा न करता पूर्णत्वाकडे नेण्याची वृत्ती अनुभवत होतो.
इतर मुलं रस्ता दुरुस्त करीत होती. वृद्धाश्रमामध्ये वृद्धांना रिझवीत होती. बालकाश्रमामध्ये छोट्या मुलांचे मनोरंजन करीत होती. रस्त्याच्या कडेकडील झाडं-झुडपं छाटीत होती. चर्च परिसर स्वच्छ करीत होती आणि घराचे बांधकाम करणारा स्वयंसेवकांचा ‘कृतीदल’ आपल्या धुंदीत घराचे बांधकाम पूर्णत्वाकडे नेण्याच्या कार्यात गुंतला होता.