बायोगॅसवर चालणार्या ५० बसेस् कदंब महामंडळ खरेदी करणार असून त्यासाठी महामंडळाच्या पर्वरी येथील डेपोत बायोगॅससाठीची टाकी उभारण्यात येणार असल्याची माहिती कदंब महामंडळाचे चेअरमन कार्लुस आल्मेदा यांनी काल दिली. या बायोगॅसवरील बसेस् खरेदी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून निधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वरील निधी मिळाल्यानंतर ह्या बसेससाठी निविदा काढण्यात येणार आहेत. महामंडळाकडे बायोगॅसवर चालणारी एक बस सध्या आहे. स्कार्निया ह्या कंपनीने ती प्रायोगिक तत्त्वावर चालवण्यासाठी महामंडळाला दिली होती. मात्र, ह्या बसेस्साठी लागणारा बायोगॅस मुंबईहून आणावा लागत असल्याने महामंडळाची अडचण होऊ लागलेली असून त्यामुळे सध्या सदर बस बंद आहे. बायोगॅसवर चालणार्या बसेस्मुळे वायू प्रदूषण होत नसल्याने त्या खरेदी केल्या जाव्यात अशी सूचना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी महामंडळाला केली असल्याचे आल्मेदा म्हणाले. दरम्यान, महामंडळाने पर्वरी डेपोत बायोगॅससाठीची टाकी उभारण्याचा निर्णय घेतलेला असला तरी त्यासाठीचा परवाना अद्याप मिळालेला नाही. त्यासाठी महामंडळाने संबंधीत अधिकार्यांकडे अर्ज केलेला आहे. येत्या १० फेब्रुवारीपर्यंत परवाना मिळण्याची शक्यता असल्याचे आल्मेदा यांनी सांगितले.
दरम्यान, महामंडळाला खासगी कंपनीने दिलेल्या इलेक्ट्रिक बसचा येत्या ३० रोजी शुभारंभ होणार आहे. या इलेक्ट्रिक बसचा प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यात इलेक्ट्रिक बसेस्ही खरेदी करण्यात येणार असल्याचे आल्मेदा यांनी सांगितले.