बहुचर्चित ‘पद्मावत’ वास्कोत प्रदर्शित

0
92

संजय लीला भन्साळींचा सध्या देशभरात वादग्रस्त ठरलेला चित्रपट ‘पद्मावत’ गोव्यात सर्वप्रथम वास्को येथील ‘१९३० वास्को’ या चित्रपटगृहामध्ये काल चित्रपटरसिकांच्या भरगच्च उपस्थितीत प्रदर्शित झाला. काल बुधवारी संध्याकाळी सात वाजता या चित्रपटाचा पहिला खेळ झाला, तर दुसरा खेळ रात्री १० वाजता होता. या दोन्ही खेळांना बहुतेक सर्व तिकिटे विकली गेल्याची माहिती थिएटर व्यवस्थापनाकडून देण्यात आली.

या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी कोणताही वाद झाला नसल्याचे सांगण्यात आले. वास्कोतील सदर चित्रपटगृहामधील तिकीटांचे आरक्षण बुक माय शो वर उपलब्ध होते. १९३० हे वास्कोतील छोटे चित्रपटगृह असून तेथे थ्रीडी रॉयल रिक्लायनर आणि थ्रीडी रिक्लायनर आसनांचा तिकीट दर अनुक्रमे रू. ३७० व रू. ३२० आहे. आजपासून या चित्रपटाचे सकाळी १०, दुपारी १, संध्याकाळी ४, ७ व रात्री १० असे खेळही होणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, गोव्यात आज ‘पद्मावत’ प्रदर्शित होत असून देशभरात त्या विरोधात वणवा पेटला असला तरी गोव्यात मात्र शांततेत तो प्रदर्शित होत आहे.

गोव्यातही मल्टिप्लेक्समध्ये
‘पद्मावत’चे प्रदर्शन नाही
गोव्यातील मल्टिप्लेक्समध्ये ‘पद्मावत’ चित्रपटाचे प्रदर्शन केले जाणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. गोव्यासह राज्यस्थान, गुजरात, मध्यप्रदेशमधील मल्टिप्लेक्स संघटनेने ‘पद्मावत’ या चित्रपटाचे सुरक्षेच्या कारणास्तव प्रदर्शन न करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात विविध भागात ‘पद्मावत’चे प्रदर्शन केले जात आहे. वास्को येथे पद्मावताचे प्रदर्शन करण्यात आले आहे. ‘पद्मावती’ या चित्रपटाला विरोध करण्यात आला होता. विरोधानंतर चित्रपटाचे नाव बदलण्यात आले आहे. तरीही चित्रपटाला विरोध होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.