पुरे झाले पुतळे!

0
175

गोवा विधानसभा संकुलामध्ये सध्याच्या भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुतळ्या व्यतिरिक्त अन्य कोणताही पुतळा बसवू नये असा ठराव भारतीय जनता पक्षाने केल्याने सरकारमधील एक घटक असलेल्या गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी पुढे केलेल्या त्या मागणीतील हवा निघून गेली आहे. विद्यमान सरकारचे प्रमुख अंग असलेल्या भाजप आणि मगो ह्यांनी आपापली भूमिका स्पष्ट केल्याने पुतळ्याचा हा विषय आता येथेच संपायला हरकत नाही. विधानसभा संकुलाचे आवार हे सभापतींचे अधिकारक्षेत्र असते. त्यामुळे सरदेसाईंच्या या मागणीला कितपत महत्त्व द्यायचे ते सभापती ठरवतीलच, परंतु पुतळ्याचे निमित्त साधून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्नात सरदेसाईच एकाकी पडले आहेत. भाजप आमदारांपैकी मायकल लोबो वगळता अन्य कोणालाही त्या मागणीत स्वारस्य दिसत नाही. मुळात एखाद्या व्यक्तीची स्मृती केवळ निर्जीव पुतळे उभारून जपण्याची कल्पनाच उथळ आहे. त्या व्यक्तीची जीवनधारणा, तिचे विचार समजून उमजून घेण्यापेक्षा आणि ते आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा नुसत्या निरर्थक प्रतिमापूजनातून काहीही साध्य होत नसते, परंतु पुतळे उभारून वर्षातून एक-दोनदा जयंती – मयंतीला हार घातले म्हणजे आपले कर्तव्य पार पाडले असा काहींचा समज असतो. बाकी वर्षभर त्या पुतळ्यांकडे कोणी ढुंकूनही पाहात नाही. गोव्यात राजधानी पणजीसह ठिकठिकाणी असे अनेक पुतळे उपेक्षित व दुर्लक्षित स्थितीत आहेत. खुद्द पणजीमधील काही पुतळे तर कोणाचे आहेत हेही जनतेला ठाऊक नाही. उदाहरणार्थ, पणजीच्या मुख्य टपाल कचेरीसमोरचा अर्धपुतळा हा जनरल मिंगेल कायतान डायस यांचा आहे. पोर्तुगीज काळात गोव्यात असलेल्या आशियातील पहिल्यावहिल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे म्हणजे ‘इस्कोला मेडिको सर्जिका दा गोवा’ चे ते प्रमुख होते. गोव्यातून प्लेगच्या साथीचे उच्चाटन करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या परिसरातच पिंटोंच्या बंडातील पंधरा वीरांना जाहीररीत्या फाशी दिली गेली होती असे सांगतात. जुन्या सचिवालयाच्या बाजूचा गोमंतकीय संमोहनतज्ज्ञ आबे फारियाचा पुतळा पाठ्यपुस्तकांतील उल्लेखामुळे थोडाफार ज्ञात झाला आहे. कांपालच्या बालोद्यानासमोर एकोणिसाव्या शतकातील एक विद्वान डॉ. फ्रान्सिस्क लुईस गोमीश यांचा पुतळा आहे. लिस्बनच्या संसदेमध्ये त्यांनी गोव्याचे प्रतिनिधित्व केले होते आणि तेथे गोव्याच्या जनतेचा आवाज बुलंद केला होता. मिरामारला हिंदू आणि ख्रिस्ती एकतेचे प्रतीक असलेला दोन मशालधारी व्यक्तींचा पुतळा आहे. सत्तरच्या दशकात तो बसवला गेला होता. त्यावरील मशाल कित्येक वर्षे गायब होती. म्हापशात बसस्थानकाजवळ गांधीजींचा पुतळा आहे. शहरात काही सण – समारंभ असला की त्या गांधीजींच्या कानांना पताकांच्या दोरीची टोके बांधली जायचे. शेवटी पालिकेला त्याला कुंपणबंद करावे लागले. जुन्या गोव्याचा गांधी पुतळा तर सदैव कावळ्यांना देहधर्म उरकण्याचे स्थान बनून राहिला आहे. फर्मागुढीचा अश्वारूढ शिवपुतळा किल्ल्याच्या बुुरुजांतील प्रेमीजनांचे चाळे पाहात उभा असतो. ठिकठिकाणच्या पुतळ्यांची ही अशी स्थिती असताना आणखी पुतळे हवेतच कशाला? डॉ. जॅक सिक्वेरांच्या जन्मशताब्दीच्या वेळी त्यांचे पुतळे एक – दोन ठिकाणी उभारले गेले होते. आता जनमत कौलाचा सुवर्णमहोत्सव उलटून एक वर्ष गेल्यावर अन्य काहीही विशेष औचित्य नसताना त्यांचा पुतळा विधानसभा संकुलात भाऊसाहेबांच्या पुतळ्याच्या शेजारी उभा करण्याची मागणी ही केवळ तुष्टीकरणाच्या राजकारणाखातर पुढे केली गेली आहे, हे जनता पुरेपूर जाणून आहे. या मागणीमागील हेतू स्वच्छ दिसत नाहीत. डॉ. सिक्वेरांना ‘गोमंतकीय अस्मितेचे प्रतीक’ बनवणे म्हणजे भाऊसाहेबांसारख्या बहुजनांच्या लोकोत्तर नेत्याचे महत्त्व आणि जनमानसातील स्थान केवळ त्यांच्या विलीनीकरणवादी भूमिकेमुळे कमी करण्याचे कारस्थान आहे आणि त्याला गोमंतकीय जनता कधीही सफल होऊ देणार नाही. जॅक सिक्वेरांवरील विकीपीडियावरील नोंद पाहा. गोवा मुक्तीविरुद्ध तीन दिवस सत्याग्रह करणार्‍या रॉक सांतानला तेथे ‘फादर ऑफ गोवन डेमोक्रसी’ ठरवण्यात आले आहे हे कोणत्या वृत्तीचे निदर्शक आहे? अशा प्रवृत्तींना या निमित्ताने डोके वर काढण्याची संधी कदापि मिळता नये. बहुजन समाजाच्या जखमेवरची खपली काढण्याचा काहींचा प्रयत्न सरकारच्या दोन प्रमुख घटकपक्षांनी ठाम भूमिका घेतल्याने आता फसल्यात जमा आहे. जॅक सिक्वेरांच्या नावे मागील सरकारच्या कार्यकाळात टपाल तिकीट जारी झालेले आहेच. त्यामुळे पुतळ्याच्या मागणीला अधिक महत्त्व न देता आणि कोणाला तुष्टीकरणाचे राजकारण करण्याची संधी मिळवून न देता या विषयाची इतिश्री येथेच करणे श्रेयस्कर ठरेल.