– शंभू भाऊ बांदेकर
‘तुका झालासे कळस’ पुस्तकाचे प्रकाशन आज कला अकादमीचे अध्यक्ष आमदार विष्णू सुर्या वाघ यांच्या हस्ते आणि माजी खासदार ऍड. अमृत कांसार यांच्या अध्यक्षतेखालील एका सोहळ्यात होत आहे. त्या निमित्त या पुस्तकाविषयी थोडेसे ः-
गोव्यातील पुरोगामी लेखक तथा विचारवंत अर्जुन जयराम परब यांचे संत तुकाराम यांच्या वास्तव जीवनावर आधारित ‘तुका झालासे कळस’ हे पुस्तक अभ्यासपूर्ण आणि रोखठोक लेखनाचे ज्वलंत उदाहरण म्हणावे लागेल.
या पुस्तकाला ज्येष्ठ पुरोगामी साहित्यिक व विचारवंत डॉ. आ.ह. साळुंखे यांची प्रस्तावना लाभलेली आहे. आपल्या प्रस्तावनेत डॉ. साळुंखे म्हणतात, ‘साडेतीनशे वर्षांहून अधिक काळ लोटला, तरी संत तुकारामांची आपल्या मनावरची मोहिनी अजून कमी झालेली नाही. त्यांचे अभंग असंख्य पिढ्यांना प्रेरणादायक ठरलेले आहेत. प्रत्येक पिढीतील कवी आणि लेखकांना, कलावंत आणि चिंतकांना ते आकृष्ट करीत आलेले आहेत. प्रत्येकाला त्यांचा वेगळा पैलू भावलेला आहे. प्रत्येकाला त्यांच्या अभंगातून काहीतरी असाधारण असे गवसले आहे. गोव्यातील सिद्धहस्त लेखक अर्जुन जयराम परब हेही असेच त्याला अपवाद नाहीत. त्यांचे ‘तुका झालासे कळस’ हा या सत्याचा पुरावा होय. श्री. परब या पुस्तकातील ‘अभंगाच्या पारायणापूर्वी’ मधील ‘मनोगत’मध्ये लिहितात, ‘तुकारामांचा संबंध देव, धर्म, वेद, वेदांगे, जातीवर्ण व्यवस्था, भोंदुगीरी या अधर्म संस्कृती, विकृती व प्रवृत्तींशी आला. त्यातून त्यांनी पुरस्कारलेल्या क्रांतिकारक, विज्ञाननिष्ठ विद्रोही विचारांचा आढावा घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे’
संत तुकारामांनी परखड, घणाघाती, बुद्धिवादी आणि विज्ञाननिष्ठ विचारांची आयुष्यभर बरसात केली. त्यांच्या लोकशिक्षण, लोकप्रबोधनरूपी सिंचन करणार्या विचारांच्या संदर्भात त्यांचे ते विमान, त्यांचे ते वैकुंठ, त्यांचे ते वैकुंठगमन अशी अर्थहिन वाचाळ वाणी उच्चारणे, भाषा करणे म्हणजे त्यांनी आयुष्यभर जपलेल्या त्या बुद्धिनिष्ठ विचरांचा खूनच करणे ना? पर्यायाने त्यांच्या विचारांची ती हत्या म्हणजे त्यांचीच हत्या ना? असे प्रश्न विचारीत संत तुकारामांच्या अस्सल विचारांवर ते प्रत्येक प्रकरणात प्रकाशझोत टाकीत खराखुरा तुकाराम आपल्या समोर उभा करतात.
एकूण आठ प्रकरणे या पुस्तकात आहेत. ती अनुक्रमेः- ‘संत विरूद्ध सनातनी’, ‘देव पाहा रे देहात, का रे जाता देऊळात?’, ‘संतांचा कल्पनारम्य आत्माविष्कार’, ‘देव ते कल्पित, वेद ते कल्पित इति वदती संत’, ‘संतच वेदविरोधी त्याचे काय?’, ‘बुडती हे जन न देखवे डोळां, येतो हा कळवळा म्हणोनी’, ‘मूलभूत धर्मस्वातंत्र्यासाठी संघर्ष करणारे संत’, ‘वैदिक धर्म नाकारणारे संत’ अशी ती प्रकरणे होत.
संत तुकारामाचे अभंग व संत नामदेवाचा अभंग अशी दोन परिशिष्ट्येही या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहेत. या सर्व प्रकरणांमधून संत तुकारामांच्या क्रांतिकारक व विज्ञाननिष्ठ विचारांचा आढावा घेता घेता हे ‘जगद्गुरू’ कसे झाले हेही श्री. परब यांनी या पुस्तकातून दाखवून दिलेले आहे. ते म्हणतात, ‘संत तुकारामांच्या विचारांचे महत्व आज जागतिक पातळीवर प्रस्थापित होत आहे. त्यांच्या ‘गाथा’ नामक अभंगांचे भाषांतर आज जसे आपल्या देशातील बहुतेक सर्वच भाषांत भाषांतरित झाले आहे, त्याचप्रमाणे ते जगातल्या अनेक देशात जसे चीन, जपान, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, इटली आदी अनेक देशात त्यांच्या अभंगांची भाषांतरे करण्यात आली आहेत आणि होतही आहेत. एवढेच नव्हे तर, त्यांच्या अभंगांचा अनुवाद इंग्रजीत करून संपूर्ण जगाला त्याचा लाभ व्हवा या उद्देशाने संयुक्त राष्ट्र महासंघाने तो नुकताच प्रकाशित केला आणि खर्या अर्थाने संत तुकारामाचे अभंग हे जगाच्या दृष्टीनेही कसे ‘अभंग’- कधीही न भंगणारे आहेत, व जगाला मार्गदर्शन करणारे आहेत, हेच सिद्ध केले आहे. म्हणून संत तुकाराम हे जसे ‘जगद्गुरू’ आहेत, संतश्रेष्ठ आहेत त्याचप्रमाणे ते सर्वकालिक चिरंतनही आहेत, हेही सिद्ध होते.
वेदांवरची डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पु.ग.सहस्त्रबुद्धे, महात्मा ज्योतीबा फुले यांची संशोधनपर मते या पुस्तकातून मांडतानाच लेखकाने संत तुकारामांनी वेदावर झोड कशी उठवली हे सांगितले आहे. अनेक नामवंत आणि विचारवंत लेखकांचे दाखले देत संत तुकाराम हे सर्वकालिक चिरंतन सत्य सांगणारे व त्याचप्रमाणे आपले आचरण ठेवणारे संतश्रेष्ठ कसे होते, हे लेखकाने पानोपानी दिलेल्या उदाहरणांवरून प्रत्ययास येते. संत तुकारामांचे वास्तव जीवनकार्य जाणून घेऊ इच्छिणार्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे.
तुका झालासे कळस
लेखक ः- अर्जुन जयराम परब
प्रकाशक ः- निलेश बुगडे, सुप्रमानस ग्रंथमाला
पृष्ठसंख्या ः- ७९, मूल्य ः- १०० रू.