Home बातम्या अभिमानास्पद!

अभिमानास्पद!

0

कुशाग्र भारतीय बुद्धिमत्तेची आणखी एक पताका काल आकाशात दिमाखात फडफडली. अग्नी – ५ क्षेपणास्त्राच्या यशस्वी प्रक्षेपणाने दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनिशी सज्ज असलेल्या जागतिक महासत्तांच्या पंक्तीत भारत जाऊन बसला आहे. आजवर जगातील केवळ पाच राष्ट्रांपाशी अशी दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत आणि भारताने त्यांच्या जोडीत जाऊन बसणे केवळ गौरवाचेच आहे असे नव्हे, तर चीनसारख्या देशाकडून असलेल्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना आम्हीही सज्ज आहोत हा इशारा देणारेही आहे. अग्नी – ५ सुमारे पाच हजार कि. मी. अंतर पार करून लक्ष्यभेद करू शकेल. म्हणजेच आपण चीन, आफ्रिका आणि युरोपीय देशांपर्यंत या क्षेपणास्त्रांच्या आधारे अण्वस्त्रांचा मारा करू शकतो. एक टन भार वाहण्याची त्याची क्षमता आहे आणि अग्नी ५ वर मल्टीपल इंडेपेंडेन्सी टार्गेटेबल री-एन्ट्री वेहिकलही बसवता येते, म्हणजेच एका क्षेपणास्त्राद्वारे एकाचवेळी दहा लक्ष्यांवर अण्वस्त्र हल्ला चढवण्याचीही त्याची क्षमता आहे. हे करीत असताना रिअल टाईम ट्रॅजेक्टरीद्वारे त्याचा सारा प्रवास पाहण्याची सोयही आहे. ऐंशीच्या दशकात डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रयत्नांनी भारताने जेव्हा क्षेपणास्त्रनिर्मितीकडे लक्ष पुरवायला सुरूवात केली, तेव्हा तयार झालेली पृथ्वी आणि अग्नी क्षेपणास्त्रे ही पाकिस्तानचा धोका डोळ्यांपुढे ठेवून तयार केली गेली होती.

आज आपल्याला चीनपासून धोका संभवतो आहे. आपल्या सीमांपलीकडे चीन आपली लष्करी जमवाजमव वाढवत चालले आहे. हे लक्षात घेता कसोटीच्या क्षणी आपली सज्जता असणे गरजेचेच आहे. त्या दृष्टीने अग्नी ५ हा एक महत्त्वाचा मैलाचा दगड आपण काल पार केलेला आहे. चीनपाशी सध्या डॉंग फेंग – ३१ ए यासारखी अकरा हजार मैल अंतर पार करून लक्ष्यभेद करू शकणारी क्षेपणास्त्रे आहेत आणि तेवढी मजल आपल्याला अजून गाठायची आहे. तरीही केवळ ७०० मैलांचे अंतर पार करू शकणार्‍या अग्नी – १ क्षेपणास्त्रापासून अग्नी – ५ पर्यंत पाच हजार मैलांचा टप्पा आपण गाठलेला आहे हे यशही काही कमी नाही. आपल्यापाशी आज जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी ‘पृथ्वी’ तसेच ‘अग्नी’ मालिका आहे, जमिनीवरून आकाशात मारा करणारी ‘आकाश’ आहेत, ‘ब्राह्मोस’ १ आणि २ सारखी सुपरसॉनिक क्रूझ आणि ‘नाग’ सारखी रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे आहेत. त्याशिवाय ‘धनुष’, ‘शौर्य’, ‘निर्भय’ सारखी क्षेपणास्त्रे विकसित केली जात आहेत. प्रस्तावित अग्नी – ६ मध्ये दहा हजार मैलांचे अंतर पार करण्याचे लक्ष्य आहे. त्याशिवाय शत्रूच्या क्षेपणास्त्रांना अटकाव करणारी पृथ्वी एअर डिफेन्स किंवा ऍडव्हान्स्ड एअर डिफेन्स यांची ढालही आपण उभी केलेली आहे. भारताकडे वाकडी नजर वळवताना चीनसारख्या देशाला दहा वेळा विचार करायला लावण्यासाठी भारताने शस्त्रसज्ज असणे अत्यावश्यक ठरते. दुर्बलांना जगात काही किंमत नसते. भारतासारख्या महासत्ता होण्याचे स्वप्न पाहणार्‍या आणि शत्रूराष्ट्रे आणि दहशतवादाची टांगती तलवार सतत माथ्यावर असलेल्या देशाला तर कमकुवत राहून चालणारच नाही. यंदा संरक्षण खर्चात केली गेलेली सतरा टक्के वाढ असो किंवा क्षेपणास्त्रे, अण्वस्त्रे यांचा विकास असो, या सगळ्या गोष्टी जगामध्ये आपला दरारा कायम राखण्यासाठी आवश्यक आहेत. कोरियासारख्या देशानेही गेल्याच आठवड्यात लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची फसलेली चाचणी घेतली, त्यावर चहूबाजूंनी टीका झाली, पण भारताच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत ‘नाटो’ ने संयत प्रतिक्रिया दिली. भारत आक्रमक देश नाही. तो कधी कोणावर स्वतःहून आक्रमण करणार नाही, परंतु कोणी ललकारले तर स्वस्थही बसणार नाही हा धाक निर्माण व्हायलाच हवा. कारगीलच्या युद्धात आपल्या मर्यादा साफ उघड्या पडल्या. आता अरुणाचलच्या सीमेवर चीनने कुरापत काढली तर थेट बीजिंगवर धडक देण्याची आपली ताकद ‘अग्नी ५’ मुळे निर्माण होणार आहे. ज्या धडाडीने कलामांच्या पावलांवर पाऊल टाकून डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी अग्नी ५ ची निर्मिती केली तिला देशवासीयांनी सलाम करायलाच हवा. भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमात नाना अडथळे आणण्याचे प्रयत्न सातत्याने होत असताना गाठलेले हे यश अभिमानास्पद आहे, जगाला उभरत्या भारताची ताकद दाखवणारे आहे.