>> पर्यटक टॅक्सींसाठी लवकरच खास ऍप : मुख्यमंत्री
गोवा पर्यटन विकास महामंडळाकडून दाबोळी येथील विमानतळावरील टॅक्सी काउंटर हाताळला जाणार आहे. कदंब महामंडळातर्फे विमानतळावरून पणजी, मडगाव, कळंगुट व इतर ठिकाणी बससेवा वाढविली जाणार आहे. जीटीडीसीकडून पर्यटक टॅक्सीसाठी खास ऍप विकसीत केला जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री पर्रीकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल केली.
विमानतळावर पर्यटकांना योग्य सेवा मिळवून देण्याच्या उद्देशाने जीटीडीसीकडून टॅक्सी काउंटर सेवा हाताळली जाणार असून दोन किंवा जास्त काउंटरची सोय केली जाणार आहे. सध्याच्या काळ्या पिवळ्या टॅक्सींची संख्या अपुरी असल्याने काळ्या पिवळ्या टॅक्सींच्या संख्येत वाढ केली जाणार आहे. तसेच पर्यटकांकडून टॅक्सी सेवेसाठी ई पेमेंटद्वारे शुल्क स्वीकारले जाणार आहे. कदंब अतिरिक्त बससेवा कांदोळी, म्हापसा, मडगाव, पणजी या मार्गावर सुरू करणार असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.
राज्यात येणार्या पर्यटकांना तक्रारींसाठी खास ऍप विकसित केला जाणार आहे. पर्यटक या ऍपच्या माध्यमातून टॅक्सी सेवा, हॉटेल, पोलीस व इतर बाबतीत तक्रारी नोंदवू शकतात. टॅक्सी सेवेसाठी जादा शुल्क, हॉटेलच्या सेवेच्या तक्रारी केल्या जाऊ शकतात. राज्यातील काही मोठ्या हॉटेलमध्ये खासगी वाहन नेण्यास मज्जाव केला जातो. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असेही पर्रीकर यांनी सांगितले.
जीटीडीसीतर्फे ओला, उबेरच्या धर्तीवर नवीन पर्यटक टॅक्सी सेवेसाठी जीटीडीसी खास ऍप विकसित करणार आहे. चार महिन्यात ऍप कार्यवाही होऊ शकते. सर्वांना विश्वासात घेऊन ऍपची कार्यवाही केली जाणार आहे.
टॅक्सी मालकाला दरदिवशी कमीत कमी ७०० रुपये देण्याची हमी दिली जाणार आहे. या सेवेसाठी टॅक्सी चालकांनी जीटीडीसीकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. साधारण चार – पाच महिन्यांत अशा प्रकारची सेवा प्रत्यक्षात येऊ शकते, असे पर्रीकर यांनी सांगितले. पर्यटकांच्या वाहतुकीसाठी होणार्या खासगी वाहनाच्या वापरावर कडक कारवाई केली जाणार आहे. खासगी वाहनाकडून होणार्या बेकायदा वाहतुकीवर कडक कारवाई करण्याची सूचना वाहतूक खात्याला करण्यात आली आहे. वाहनांची नोंदणी निलंबित केली जाणार आहे, असेही पर्रीकर यांनी सांगितले. सरकारी खात्यांनी वाहतूक सेवेसाठी करारबद्ध केलेल्या १२ टॅक्सी मालकांनी कराराचे उल्लंघन केल्याचे आत्तापर्यंत स्पष्ट झाले असून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे पर्रीकर म्हणाले.
चार-पाच महिन्यांत डिजिटल मीटर : पर्रीकर
राज्यात डिजिटल मीटरची अंमलबजावणी येत्या ४ – ५ महिन्यात केली जाणार आहे. डिजिटल मीटरच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रक्रिया सुरू आहे. टॅक्सी मालकांनी अर्ज केल्यानंतर स्पीड गर्व्हनरसाठी मुदत वाढवून देण्याबाबत सरकारी पातळीवरून कार्यवाही केली जाणार आहे. स्पीड गर्व्हनर बसविण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. परंतु, राज्यात आवश्यक प्रमाणात स्पीड गर्व्हनर उपलब्ध नसल्याने मुदतवाढ दिली जाऊ शकते. पर्यटक टॅक्सी मालकांनी संप करताना कायद्याचे पालन केले नाही. अचानक संप सुरू केला. त्यामुळे टॅक्सी मालकांनी संप मागे घेणे हिताचे असल्याचे शिष्टमंडळाला समजावून सांगितले, असेही मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले. राज्यात पर्यटक टॅक्सींच्या अपघातांचे प्रमाण कमी आहे, असेही मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले.