नदाल उपांत्यपूर्व फेरीत

0
216

>> मिश्र दुहेरीत बोपण्णाची विजयी सलामी

स्पेनच्या राफेल नदालने अर्जेंटिनाच्या दिएगो श्‍वाटर्‌‌झमन याचा चौथ्या फेरीच्या सामन्यात कडवा प्रतिकार मोडून काढत ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानी असलेल्या नदालने रॉड लेवर एरिनावप जवळपास चार तास चाललेल्या सामन्यात ६-३, ६-७ (४-७), ६-३, ६-३ असा विजय प्राप्त केला. दिएगोने मागील वर्षी युएस ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याची नदालची ही दहावी वेळ आहे. ‘अंतिम ८’मध्ये नदालचा सामना क्रोएशियाच्या मरिन चिलिच याच्याशी होणार आहे. चिलिचविरुद्ध नदालचा रेकॉर्ड ५-१ असा आहे.

दुसरीकडे जागतिक क्रमवारीत तृतीय असलेल्या बुल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव याने १७व्या स्थानावरील ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गियोस याला मॅरेथॉन लढतीत ७-६ (७-३), ७-६ (७-४), ४-६, ७-६ (७-४) असे पाणी पाजले. तीन तास २६ मिनिटे चाललेल्या या लढतीत विजय मिळविलेल्या दिमित्रोवचा पुढील सामना ब्रिटनच्या काईल एडमंड याच्याशी होणार आहे. भारताचा अनुभवी खेळाडू लिएंडर पेस व नवोदित पूरव राजा या भारतीय जोडीला मात्र पुरुष दुहेरीच्या तिसर्‍या फेरीत एकतर्फी पराभवासह स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला.

युआन काबल व रॉबर्ट फराह या कोलंबियाच्या जोडीने भारतीय जोडीला ६-१, ६-२ असे सहज हरविले. हंगेरीची टिमिया बाबोस व भारताचा रोहन बोपण्णा या पाचव्या मानांकित जोडीने मिश्र दुहेरीत विजयी सलामी देत इलिन पेरेझ व अँडी विटिंगटन या ऑस्ट्रेलियन जोडीचा ६-२, ६-४ असा फडशा पाडला. अव्वल मानांकित लतिशा छान (तैवान) व जेमी मरे (इंग्लंड) या जोडीनेदेखील विजयी सलामी दिली. त्यांनी स्लोवोनियाच्या आंद्रेया क्लेपेक व अमेरिकेच्या राजीव राम यांना ४-६, ७-५, ११-९ असे पराभूत केले. आज पुरुष एकेरीतील चौथ्या फेरीत द्वितीय मानांकित रॉजर फेडरचा सामना हंगेरीच्या मार्टोन फुसकोविच याच्याशी होणार आहे.

निकाल – चौथी फेरी ः पुरुष एकेरी ः पाब्लो कारेनो बुस्टा (१०) पराभूत वि. मरिन चिलिच (६) ७-६, ३-६, ६-७, ६-७, काईल एडमंड वि. वि. आंद्रेयास सिप्पी ६-७, ७-५, ६-२, ६-३, महिला एकेरी ः ऍनेट कोंटावेट (३२) पराभूत वि. कार्ला सुआरेझ नवारो ६-४, ४-६, ६-८, कॅरोलिन वॉझनियाकी (२) वि. वि. माग्दालेना रिबरिकोवा (१९) ६-३, ६-०, इलिना स्वितोलिना (४) वि. वि. डेनिसा आलेर्टोवा ६-३, ६-०, एलिस मर्टेन्स वि. वि. पेट्रा मार्टिक ७-६, ६-५